Bookstruck

भाग ३ रा 30

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
२२
कुण्डधान

“पहिल्यानें शलाका १ (१- सध्या जशा आमंत्रणपत्रिका किंवा तिकिटें पाठवून कांहीं समारंभाला तीं घेऊन येणार्‍यांनांच आंत घेतलें जातें, त्याप्रमाणें पूर्वी निरनिराळ्या रंगाच्या काड्या. देत व त्यात घेऊन येणार्‍यांना आंत घेतलें जात असे. ह्या काड्यांना ‘शलाका’ म्हणत. मतदारांसाठींहि अशा काड्यांचा उपयोग करीत. पृ. १४१ पहा.) घेणार्‍या भिक्षुश्रावकांत कुण्डधान पहिला आहे.”

हा श्रावस्तींतील एका ब्राह्मणकुळांत जन्मला. वेदाध्ययन वगैरे करून विद्वान् झाल्यावर उतारवयांत त्यानें बौद्धसंघांत प्रव्रज्या घेतली. तो भिक्षेसाठीं गांवांत जात असतां त्याच्या मागोमाग एक स्त्रीहि जात असे;  व परत येतांना ती मागोमाग येत असे. त्यामुळें गांवांतील बायकापोरें त्याची थट्टा करूं लागलीं. ‘धान्याचा कोंडा झाला, धान्याचा कोंडा झाला १’ (१- ‘धानो कोण्डो जातो’ हा मूळ पालि शब्द. संस्कृतांत ‘धानाः’ स्त्रीलिंगी असून बहुवचनी आहे. येथें त्याच्या मागोमाग जाणारी स्त्री खरी नसून त्याच्या पूर्वकर्मामुळें उत्पन्न झाली होती, ही गोष्ट विस्तारपूर्वक न देतां संभवनीय तेवढाच अंश स्वीकारला आहे.) असे तीं म्हणत. तेव्हां धानहि ‘तुम्ही कोंडा’ इत्यादि बोलून त्यांना शिव्या देई. त्यामुळें त्याला कुण्डधान हें नांव मिळालें. तो असा लोकांशीं भांडतो, हें भगवंताला समजलें, तेव्हां त्याला बोलावून आणून धम्मपदांतल्या या दोन गाथा भगवन्तानें म्हटल्याः-

मावोच फरुसं कञ्चि वुत्ता पटिवदेय्यु तं ।
दुक्खा हि सारम्भकथा पटिदण्डा फुसेय्यु तं ।।
सचे नेरेसि अत्तानं कंसो उपहतो यथा ।
एस पत्तोसि निब्बानं सारम्भो ते न विज्जति ।।

अर्थ :- दुसर्‍याला अपशब्द बोलूं नसको. तूं बोललास तर लोकहि तुला बोलतील. ह्याप्रमाणें हमरीतुमरी दुःखदायक आहे. त्यायोगें तुझ्यावर प्रत्याघात होतील. पालथ्या घातलेल्या भांड्याप्रमाणें२ (२- ‘कंसो उपहतो’ याचा अर्थ ‘फुटलेलें पितळेचें भांडें’ असा केला आहे. पण ‘पालथें घातलेलें’ असा करणें विशेष सयुक्तिक दिसतें. त्यावर आघात केला असतां आवाज निघत नाहीं. त्याप्रमाणें वाक्प्रहार झाले असतां आपलें मन अंतर्मुख (पालथें) झालें, तर तोंडांतून अपशब्द निघणार नाहीं.) जर तूं मनांतून आवाज बाहेर पडूं दिला नाहींस तर तूं निर्वाणाजवळच आहेस. कारण तुला प्रत्याघातबुद्धि राहिली नाहीं.

पुढें भगवंताच्या उपदेशाप्रमाणें वागून स्वप्रयत्‍नानें धानभिक्षु अर्हत् झाला. तरी कुण्डधान हेंच त्याचें नांव कायम राहिलें. त्याची अशी कांहीं पुण्याई होती कीं, उपासकांनीं आमंत्रणशलाका पाठविल्या असतां बहुधा पहिली शलाका त्याला मिळें; आणि म्हणूनच पहिल्यानें शलाका घेणार्‍या भिक्षूंत त्याला अग्रस्थान मिळालें.
« PreviousChapter ListNext »