Bookstruck

भाग ३ रा 44

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
भिक्षुणी
४२

महाप्रजापती गोतमी

“चिरप्रव्रजित भिक्षुणीश्राविकांत महाप्रजापती गोतमी पहिली आहे.”

हिचा जन्म देवदह नगरांत महासुप्पबुद्ध शाक्याच्या घरीं झाला. मायादेवीची ही धाकटी बहीण. ह्या दोघी उपवर झाल्यावर शुद्धोदन शाक्यानें त्यांच्याशीं विवाह केला. बोधीसत्त्व जन्मल्यानंतर कांहीं काळानें हिला नंद नांवाचा एक मुलगा झाला. मायादेवी प्रसूतीनंतर सातव्या दिवशीं मरण पावली, व तेव्हांपासून बोधिसत्त्वाचें लालनपालन करण्याचा सर्व भार हिच्यावर पडला. गोतमीनें आपल्या मुलापेक्षांहि अधिक प्रेमानें बोधिसत्त्वाचा संभाळ केला. ती भिक्षुणी कशी झाली, हा सर्व वृत्तांत चुल्लवग्गांत व अंगुत्तरनिकायाच्या अट्ठकनिपातांत आला आहे. त्याचा सारांश पहिल्या भागांत (कलम ८७) पहावा. अर्हत्पदाला पावल्यावर तिनें म्हटलेल्या म्हणतात अशा सहा गाथा थेरीगाथेंत आहेत; त्यांतील शेवटली गाथा अशी आहे :-

बहूनं वत अत्थाय माया जनयि गोतमं ।
व्याधिमरणातुन्नानं दुक्खक्खन्धं व्यपानुदि ।।


अर्थ :- खरोखर बहुजनांच्या कल्याणासाठीं मायेनें गोतमाला जन्म दिला. व्याधीनें आणि मरणानें पीडित लोकांचा त्यानें दुःखराशि नष्ट केला.                        

४३
खेमा(क्षेमा)

“महाप्रज्ञ भिक्षुणीश्राविकांत खेमा श्रेष्ठ आहे.”

हिचा जन्म मद्दराष्ट्रांत सागल नांवाच्या नगरांत राजकुळांत झाला. ती अत्यंत देखणी होती, व तिचें लग्न मगध देशाच्या बिंबिसार राजाबरोबर झालें होतें. राजगृहाजवळ वेळुवनांत भगवान् रहात असतां बिंबिसार राजा वारंवार त्याच्या दर्शनास जात असे. परंतु ‘रूप अनित्य आहे. रूपावर आसक्त होऊं नका’ असे वैराग्यपर उपदेश भगवान् करीत असतो, असें खेमेच्या ऐकण्यांत आलें असल्यामुळें ती वेळुवनांत जाऊं इच्छीत नव्हती. तिनें तेथें जावें म्हणून राजानें आपल्या पदरच्या कवींकडून वेळुवनांतील वनश्रीवर काव्य रचवून तें तिच्या समोर म्हणावयास लाविलें. उद्यानश्रीचीं तीं रसभरित वर्णनें ऐकून खेमेला तिकडे जाण्याची उत्कट इच्छा झाली, व राजाची तिनें परवानगी मागितली. राजा म्हणाला, “वेळुवनांत जाऊन भगवंताचें दर्शन घेतल्याशिवाय येतां कामा नये.” ती कांहीं बोलली नाहीं. पण राजानें तिच्या बरोबरच्या नोकरांस सांगितलें कीं, जर खेमा भगवंताचें दर्शन घेतल्यावांचून येऊं लागली, तर माझ्या आज्ञेची तिला आठवण द्या.
« PreviousChapter ListNext »