Bookstruck

भाग ३ रा 49

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
४८
सोणा

“उत्साही भिक्षुणीश्राविकांत सोणा श्रेष्ठ आहे,”

ही श्रावस्ती येथें एका कुटुंबांत जन्मली. पुढें वयांत आल्यावर लग्न होऊन तिला पुष्कळ मुलें झालीं; व तीं वयांत आल्यावर आपापला प्रपंच थाटून राहूं लागलीं. पण ह्या म्हातारीला कोणीच पुसत नसे. त्यामुळें वैराग्य उत्पन्न होऊन सोणा भिक्षुणी झाली. पुष्कळ मुलें होतीं म्हणून तिला बहुपुत्रिका सोणा असेंहि म्हणत असत. वृद्धपणीं भिक्षुणी झाली असतांहि तिनें मोठ्या उत्साहानें बुद्धोपदेशाचें अनुकरण करून अर्हत्पद मिळविलें. तिच्या थेरीगाथेंत गाथा आहेत, त्यापैकीं दोन येथें देतो :-

दस पुत्ते विजायित्वा अस्मिं रूपसमुस्सये।
ततो हं दुब्बला जिण्णा भिक्खुनिं उपसंकमिं।।
सा मे धम्ममदेसेसि खन्धायतनधातुयो।
तस्सा धम्मं सुणित्वान केसे छेत्वान पब्बजिं।।

अर्थ :- ह्या जन्मीं दहा मुलांना जन्म देऊन म्हातारी झाली असतां मी भिक्षुणीजवळ आलें. तिनें मला धर्मोपदेश केला; स्कन्ध, आयतन आणि धातु काय आहेत, हें सांगितलें. तिचा धर्म ऐकून केशवपन करून मी भिक्षुणी झालें.

४९
सकुला

“दिव्यचक्षु प्राप्त झालेल्या भिक्षुणीश्राविकांत सकुला श्रेष्ठ आहे.”

हिची फारशी माहिती सांपडत नाहीं. श्रावस्तींतील एका कुटुंबांत ती जन्मली व पुढें वयांत आल्यावर भिक्षुणी होऊन ध्यानसमाधीच्या योगें तिनें दिव्यदृष्टि संपादन केली, एवढीच माहिती मनोरथपूरणींत आहे. परंतु थेरीगाथेंच्या अट्ठकथेंत ही ब्राह्मणकुळांत जन्मली, असा उल्लेख १ आहे.  खुद्द थेरीगाथेंत स्वतःच्या संबंधानें तिच्या गाथा आहेत त्या अशा :-
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- थेरी अपदानांतहि ‘पच्छिमे च भवे दानि। जाता विप्पकुले अहं।।’ असें सकुलेचें म्हणणें आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
अगारस्मिं वसन्तीहं धम्मं सुत्वान भिक्खुनो।
अद्दसं विरजं धम्मं निब्बानं पदमच्चुतं।।
साहं पुत्तधीतरञ्च धनधञ्ञं च छड्डिय।
केसे छेदापयित्वान पब्बजिं अनगारिय।।

अर्थ :- मी गृहस्थाश्रमांत रहात असतां एका भिक्षूकडून धर्म ऐकून विशुद्ध अच्युतस्थान निर्वाण जाणलें; आणि मुलामुलींना आणि धनधन्याला सोडून केशवपन करून भिक्षुणी झालें.
« PreviousChapter ListNext »