Bookstruck

समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी

कुशल चित्तवृत्तींत ऐक्य राखण्याचे सामर्थ्य समाधीत यावयास समाधीला प्रतिबंधक गोष्टी कोणत्या आहेत, हे समजून घेतले पाहिजे.  व्यसनाधीतता ही समाधीचा सर्वांत मोठा शत्रु आहे.  दारूबाजी, रंडीबाजी, किंवा जुगार इत्यादिक महाव्यसने बाजूला राहू द्या.  पण माणूस विडीसारख्या लहानसहान व्यसनात सापडला, तरी त्याच्या चित्ताला समाधि लागणे शक्य नाही.  मनाची एकाग्रता साधतो न साधतो, तोच त्याचे मन आपल्या व्यसनाकडे धावेल, व त्याची एकाग्रता तेव्हाच नष्ट होईल.  यासाठी पहिल्या प्रथम निर्व्यसनी होण्याचा योग्याने प्रयत्‍न केला पाहिजे.  कमीतकमी, प्राणघातापासून निवृत्ति, अदत्तादानापासून (चोरीपासून) निवृत्ति, अब्रह्मचर्यापासून निवृत्ति, खोटे बोलण्यापासून निवृत्ति, आणि मादक पदार्थापासून निवृत्ति, या पाच गोष्टी त्याने संभाळल्या पाहिजेत.

अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमाः ।  हे जे पाच यम योगसूत्रात सांगितले आहेत त्यात आणि वरील गोष्टीत फारसा फरक नाही; अपरि ग्रहाबद्दल मादक पदार्थांचे सेवन न करणे एवढाच काय तो फरक आहे.  बौद्ध वाङमयात या पाच गोष्टीला शील म्हणतात.  ज्याला समाधि साध्य करावयाची असेल त्याला शीलाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.  प्राणघातापासून निवृत्त झाला म्हणजे त्याचे मन शिकारीसारख्या व्यसनात दंग होणे शक्य नाही.  अदत्तादानापासून निवृत्त झाला म्हणजे लाचलुचपत, जुगार, सट्टेबाजी इत्यादिक व्यसनांतून तो आपोआप मुक्त होईल.  ब्रह्मचर्य पाळण्याचे सामर्थ्य आले म्हणजे स्त्रीव्यसनात सापडण्याचे त्याला भय नाही.  सत्य बोलण्याचे धैय अंगी आले म्हणजे त्याची तेजस्विता आपोआप वाढत जाईल आणि मादक पदार्थापासून तो दूर राहिला म्हणजे त्याच्या हातून सत्कृत्यात प्रमाद होणार नाही.  अर्थात, व्यसनाधीनतेचे महासंकट टाळण्याविषयी शीलाचे सांगोपांग पालन करणे हे योग्याचे पहिले कर्तव्य होय.

शीलाचे सर्व नियम बरोबर पाळण्यात आले पण योग्य स्थळी किंवा योग्य परिस्थितीत राहण्यास सापडले नाही तर समाधि साध्य होणे कठीण होईल.  त्यासाठी विशुद्धिमार्ग ग्रंथांत,

आवासो च कुलं लाभो गणो कम्भं व पंचमं ।
अद्धानं आति आबाधो गन्थो इद्धीति ते दस ॥


या दहा गोष्टी समाधीला अपायकारक होत असल्या, तर त्या योग्याने तात्काळ कराव्या, असे सांगितले आहे.  आवास म्हणजे राहण्याची जागा ती अपायकारक कशी होते ?  याबद्दल सूत्ररूपी गाथा आहेत, त्या अशाः-

महावासं नवावासं जरावासच्च पन्थनिं ।
सोण्डिं पण्णश्च पुप्फश्च फलं पत्थितमेव च ॥
नगरं दारुना खेत्तं विसभागेन पट्टनं ।
पश्चन्तसीमासप्पायं यत्थ मित्तो न लब्भति ॥
अठ्ठारसेवानि ठानानि इति विञ्ञय पंण्डितो ।
आरका परिवज्जेय्य मग्गं पटिभ यं यथा ॥


या गाथांचा अर्थ विशुद्धिमार्गात भिक्षूंला उपयोगी असाच केला आहे.  तरी त्यातील मुद्दा सर्व प्रकारच्या योगसाधकाला सारखाच उपयोगी पडण्याचा संभव असल्यामुळे येथे सर्वसामान्य असाच अर्थ लावण्याचा माझा प्रयत्‍न आहे.
« PreviousChapter ListNext »