Bookstruck

समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
अशा माणसाला आपली आईबापेही प्रतिबंधक होत नसतात, मग कुलगोत्राची गोष्ट सांगावयासच नको.  तथापि सामान्य माणसाला आपल्या कुलगोत्रापासून दूर अंतरावर राहिल्याने समाधी साधणे सुलभ जाते.

तिसरा प्रतिबंध लाभ, भिक्षु प्रसिद्ध असला तर बड्या बड्या लोकांकडून त्याला आमंत्रणे येतात व त्यामुळे तो सदोदित व्यावृत होतो.  डॉक्टरी किंवा वकिली करणारा गृहस्थ आपल्या धंद्यात गढून गेल्यामुळे व्यावृत होतो.  म्हणजे अशा प्रकारे लोकांकडून मिळणारा मान किंवा लाभ समाधीला अंतराय करतो.  तेव्हा काही काल त्या सर्व भानगडी सोडून देऊन जेथे आपणास सामान्य लोक ओळखत नाहीत अशा ठिकाणी एकांतवासात जाऊन राहणे योग्य आहे.

गण म्हणजे शिष्यगण.  आपणाला काही शिष्यांला शिकवायचे असेल, तर त्यामुळेही चित्तवक्षेप होण्याचा संभव असतो.  त्यासाठी शिष्यशाखेला दुसर्‍या गुरुच्या हवाली करून आपण मुक्त व्हावे; व एकांतवास पत्करावा.

कम्म किंवा कर्म म्हणजे बांधकाम किंवा इतर कोणतेहि नवीन काम त्याला सुरुवात केली असता ते संपेपर्यंत आपणाला चैन पडत नाही.  तेव्हा ते जर अल्पावकाशात संपण्यासारखे असेल तर पुरे करावे; जर संपण्यासारखे नसेल, तर दुसर्‍या कोणातरी आप्‍तमित्राच्या स्वाधीन करून आपण मोकळे व्हावे.

अद्धान (अन्वा) म्हणजे प्रवास.  आपल्या मनातून कोणत्याहि ठिकाणी प्रवास करण्याचे असले, किंवा इतर ठिकाणी काही काम असले, तर ते केल्यावाचून आपणाला चैन पडत नाही.  म्हणून ते एकदाचे आटपून मोकळे व्हावे, व समाधिमार्गाला लागावे.

ञाति (ज्ञाति) म्हणजे आपले जवळचे आप्‍त.  त्यापैकी कोणी आजारी असला व त्यांची शुश्रूषा करण्याला दुसरा कोणी नसला तर योगाभ्यास करू इच्छिणार्‍या माणसाने समाधिमार्गात त्वरा न करता त्यांची आमरण सेवा करावी.  त्यांना सोडून जाणे म्हणजे आपल्या कर्तव्याला मुकणे होय.  पण दुसरा कोणी शुश्रूषक असला, तर आपण रजा घेऊन एकांतवासात जावे.

आबाध म्हणजे रोग.  तो जर औषधाने बरा होण्यासारखा असला, तर बरा करावा; बरा होण्यासारखा नसला, तर त्याला म्हणावे की, 'बा रोगा, मी तुझा काही दास नाही.  तुझ्या ताब्यात माझे शरीर आहे पण आत्मा नाही.  तेव्हा आत्म्यावर विजय मिळवून मी आता समाधिमार्गाला लागतो.'

गन्ध (ग्रन्थ) म्हणजे कोणतेहि पाठय पुस्तक.  ते जर आपणास शिकावयाचे किंवा पाठ करावयाचे असेल, तर त्यामुळे समाधीला विक्षेप होतो.  तेव्हा, समाधि साध्य झाल्यावर अशा पुस्तकांचा अभ्यास त्वरेने होणे शक्य आहे, हे जाणून तेवढ्या वेळेपुरती पुस्तके बाजूस ठेवावी.  व समाधीकडे वळावे.

इद्धि (ॠद्धि) म्हणजे योगसिद्धि.  अशा योगसिद्धीच्या नादाला कधीच लागू नये.  त्या खर्‍या समाधीला अंतरायकारक आहेत; आणि प्राप्‍त झाल्या तरी एखाद्या जादूगरापेक्षा विशेष फायदा होणे शक्य नाही.  म्हणून अशा खोट्या मार्गात न शिरता सरळ मार्गाने समाधि साधण्याचा प्रयत्‍न करावा.

याप्रमाणे,

आवासो च कुलं लाभो गणो कम्मं च पंचमं ।
अद्धानं ञाति आबाधो गन्थो इद्धीति ते दस

या दहा अंतरायकारक गोष्टींचा नीट विचार करून चित्त एकाग्र होईल अशा परिस्थितीत समाधीला आरंभ करावा.  परिस्थिती अनुकूल असली, तरी जोपर्यंत बुद्धीची पाच आवरणे नष्ट झाली नाहीत तोपर्यंत समाधिमार्गात एकहि पाऊल पुढे पडणे शक्य नाही.
« PreviousChapter ListNext »