Bookstruck

अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
आर्यश्रावक देवतानुस्मृतीची भावना करतो - चातुर्माहाराजिक देवता आहेत, तावत्त्रिशत् देवता आहेत, याम देवता आहेत, तुषित देवता आहेत, निर्माणरति देवता आहेत, परनिर्मितवशवर्ती देवता आहेत, ब्रह्मकायिक देवता आहेत, आणि त्याहूनहि वरच्या पायरीच्या देवता आहेत; ज्या प्रकारच्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवता त्या त्या लोकी उत्पन्न झाल्या.  त्या प्रकारची श्रद्धा माझ्या अंगी आहे; ज्या प्रकारच्या शीलाच्यायोगे त्या देवता त्या त्या लोकी उत्पन्न झाल्या तशा प्रकारचे शील माझ्या अंगी आहे; ज्या प्रकारच्या शृताच्यायोगे... ज्या प्रकारच्या त्यागाच्यायोगे... ज्या प्रज्ञेच्या योगे त्या देवता त्या त्या लोकी उत्पन्न झाल्या तशा प्रकारची प्रज्ञा माझ्या अंगी आहे.

श्रद्धा, शील, श्रुत, त्याग, आणि प्रज्ञा हे पाच गुण देवतानुस्मृतीत मुख्य आहेत; ही त्या स्मृतीची कसोटी आहे.  बुद्धधर्म नास्तिक आहे, अशी कित्येकांची समजूत आहे.  'कर्तुमकर्तृमन्यथा कर्तुम्' अशा तर्‍हेची सर्वशक्तिमान् व्यक्ति हे जग चालवीत आहे ही समजून बौद्धाला पसंत नाही.  हे जग नियमाप्रमाणे चालले आहे.  आगीत हात घातला तर तो जळणारच; त्याप्रमाणे पापकर्मे केली असता केवळ देवाच्या प्रार्थनेने त्यापासून मुक्तता होणे शक्य नाही.  त्यांच्या निराकरणार्थ अष्टांगिक मार्गाचाच अवलंब केला पाहिजे.  तरीपण बौद्धाच्या दृष्टीने इष्ट देवतेचे स्मरण त्याज्य नाही.  पण ते ऐहिक लाभासाठी असता कामा नये.  अशा देवतेला समोर ठेवून तिचे चिंतन केले असता जर आपली श्रद्धा,  आपले शील, श्रुत, आपला त्याग आणि आपली प्रज्ञा वृद्धिंगत होत असली, तर त्या देवतेचे चिंतन किंवा अनुस्मरण गृहस्थाने अवश्यमेव करावे.

या सहा अनुस्मृति आरंभी केवळ गृहस्थाश्रमी लोकांसाठी होत्या, हे वरील विवेचनावरुन स्पष्टच दिसून येईल.  पण हळू हळू आनापानस्मृति, कायगतास्मृति किंवा मैत्रीकरुणादिक भावना मागे पडून या अनुस्मृतीलाच महत्त्व देत चालले.  विशेषतः पहिली बुद्धानुस्मृति आणि शेवटली देवतानुस्मृति या दोहोला फारच महत्त्व आले.  महायान पंथांत तर त्यांचा अतिरेक झाला असे म्हणण्यास हरकत नाही.  बुद्धाच्या आणि भिन्न भिन्न देवताच्या नावाचा जप, मंत्र तंत्र, देवतांवर ध्यान, या सर्वांचा उगम आरंभी अत्यंत सरळ दिसणार्‍या या अनुस्मृतीपासून झाला आहो.  होता होता श्रद्धाशीलादिक सद्‍गुण संपादण्याऐवजी जारणमारणादिक आसुरी शक्ति उत्पन्न करण्याच्या कामीहि अशा अनुस्मृतींचा उपयोग होऊ लागला.  मंत्रतंत्राचा उगम अथर्ववेदात आहे.  तरी आधुनिक मंत्रप्रयोगांना जे निराळेच वळण लागले त्याचा उगम या साध्या अनुस्मृतीत असावा अशी माझी समजूत आहे.
« PreviousChapter ListNext »