Bookstruck

कसिणे 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
कासिणे

कसिण हा पालि शब्द कृत्स्न या शब्दापासून आला आहे.  संस्कृत अत्यंत बिकट व त्या मानाने पालि सोपा वाटल्यावरून या भागात कसिण हाच शब्द वापरण्यात येत आहे.  कसिणांची उत्पत्ति महापरिनिब्बानसुत्तांत सांगितलेल्या आठ अभिभायतनांपासून झाले असावी.  ही आयतने दीघनिकायात तीन ठिकाणी व अंगुत्तरनिकायांत तीन ठिकाणी सापडतात;१  त्यावरून एका काळी या आयतनांना फार महत्त्व होते असे वाटते.  धम्मसंगणीच्या कर्त्याने कसिणे प्रथमतः घातली आहेत, तरी ही आठ आयतने वगळली नाहीत.  कसिणांमागोमाग त्याने यांचाही निर्देश केला आहे.  बुद्धघोषाचा याच्या वेळी मात्र ही आयतने मागे पडून कसिणे पुढे आली असावी.  असा प्रकार का घडला याचा विचार करण्यापूर्वी अभिभायतने कोणती व त्यांचे विधान काय याचा निर्देश करणे योग्य आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१  दीघनिकायांत महापरिनिब्बानसुत्त, संगीतिसुत्त, व दसुत्तरसुत्त या तीन सुत्तांत, आणि अंगुत्तर निकायांत एककनिपात, अट्टकनिपान व दसकनिपात या तीन निपातांत ही आठ आयतने सापडतात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१.  अज्झत्तं रूपसञ्ञी एको बहिद्धा रुपानि पस्सति परित्तानि सुवण्णदुब्बण्णानि, तानि अभिभुय्य जानामि पस्सामीति एवंसञ्ञी होति, इदं पठमं अभिभायतनं ।

आभ्यंतरी रूप आहे असा विचार करून एखादा मनुष्य बाह्यसृष्टीतील सुवर्ण किंवा दुर्वर्ण परिमित रूपे पहातो आणि त्यांचे अभिभवन करून मी जाणतो आणि पाहतो अशा बुद्धीने वागतो हे पहिले अभिभ्वायतन होय.

२.  अज्झत्तं रूपसञ्ञी एको बहिद्धा रूपानि पस्सति अप्पमाणानि सुवण्णदुब्बण्णाणि, तानि अभिभुय्य जानामि पस्सामीति एवसञ्ञी होति, इदं दुतियं अभिभायतनं ।

आभ्यंतरी रूप आहे असा विचार करून एखादा मनुष्य बाह्यसृष्टीतील सुवर्ण किंवा दुर्बर्ण अपरिमित रूपे पहातो, आणि त्यांचे अभिभवन करून मी जाणतो आणि पहातो अशा बुद्धीने वागतो.  हे दुसरे अभिभ्वायतन होय.

३.  अज्झत्तं अरूसञ्ञी एको वहिद्धा रूपानि पस्सांत परित्तानि सुवण्णदुब्बण्णानि, तानि अभिभुय्य जानामि पस्सामीति एवंसञ्ञी होती, इदं ततियं अभिभायतनं ।

आभ्यंतरी रूपाचा विचार न करता एखादा मनुष्य बाह्यसृष्टीतील सुवर्ण किंवा दुर्वर्ण परिमित रूपे पहातो, आणि त्यांचे अभिभवन करून मी जाणतो आणि पहातो अशा बुद्धीने वागतो.  हे तिसरे अभिभ्वायतन होय.

४.  अज्झतं अरूपसञ्ञी एको बहिद्धा रूपानि पस्सति अप्पमाणानि सुवण्णदुब्बणानि, तानि अभिभुय्य जानामि पस्सामीति एवंसञ्ञी होति, इदं चतुत्थं अभिभायतन ।

आभ्यंतरी रूपाचा विचार न करता एखादा मनुष्य बाह्यसृष्टीतील सुवर्ण किंवा दुर्वर्ण अपरिमित रूपे पहातोः आणि त्यांचे अभिभवन करून मी जाणतो आणि पहातो अशा बुद्धीने वागतो.  हे चवथे अभिभ्वायतन होय.
« PreviousChapter ListNext »