Bookstruck

बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
दुसर्‍या दिवशीं सकाळीं वेस्संतर मद्दीला म्हणाला “मद्दी, तूं मुलांबद्दल शोक करूं नकोस. तुझीं मुलें खुशाल आहेत. काल येथें एक याचक ब्राह्मण आला, व त्यानें त्यांची याचना केली; तेव्हां मीं त्या ब्राह्मणाला त्यांचें दान केलें. तूं माझ्या या कृत्याला अनुमोदन दे. व पुण्याची वांटेकरीण हो!”

मद्दी म्हणाली “आपण मुलांचें दान केलें, याबद्दल मला बिलकूल वाईट वाटत नाहीं. आपण जें केलें, त्याला माझी पूर्ण अनुमति आहे; परंतु ही गोष्ट आपण मला कालच कां सांगितली नाहीं?”

वेस्संतर म्हणाला “मद्दी, ही गोष्ट जर मीं तुला काल सांगितली असती, तर मुलांचें दान केल्याबद्दल तुला अत्यंत वाईट वाटलें असतें, व तूं पुण्यभागिनी झाली नसतीस.” यावर मद्दीदेवी कांहीं बोलली नाहीं.

वेस्संतरबोद्धिसत्वाचें हें दानशौर्य पाहून इंद्राला मोठी भीति वाटली, कीं, एकाद्या वेळेस हा आपल्या पतिव्रता पत्नीचें देखील दान करील. तेव्हां तापसवेष घेऊन इंद्र वेस्संतराच्या आश्रमांत आला व वेस्संतराला म्हणाला “आपणाजवळ आतां कांहीं राहिलें नाहीं; तथापि ही एवढी गुणवत्ती स्त्री आहे. तिचें मला दान कराल, तर मी मोठा आभारी होईन!”

वेस्संतरानें तत्क्षणींच तापसवेषधारी इंद्राच्या हातावर पाणी सोडलें! इंद्रानें तापसवेष टाकून आपलें स्वरूप प्रकट केलें व तो वेस्संतराला म्हणाला “महाराज, आतां ही वस्तु-मद्दीदेवी-माझी झाली. परंतु ठेव या नात्यानें मी ती तुमच्याजवळ ठेवीत आहें. तिचें तुम्ही पूर्ववत् परिपालन करावें. मात्र ही वस्तु दुसर्‍याला देण्याचा अधिकार तुम्हाला राहिला नाहीं.”

याप्रमाणें भाषण करून आणि वेस्संतराला वर देऊन इंद्र स्वर्गलोकीं निघून गेला.

जूजकब्राह्मण वेस्संतराच्या मुलाला घेऊन जात असतां वाट चुकून शिबीच्या राज्यांत शिरला. तेव्हां एका राजपुरुषानें वेस्संतराच्या मुलांनां ओळखिलें, व ब्राह्मणाला पकडून मुलांसह त्याला संजयराजासमोर नेऊन उभें केलें. संजयराजानें, हीं मुलें तुम्हांला कशीं मिळालीं, असा प्रश्न केला असतां जूजकानें घडलेला सर्व वृत्तांत निवेदित केला. संजयराजानें त्याजवर न रागावतां पुष्कळ नोकरचाकर आणि धन देऊन त्याची बोळवण केली. आपल्या मुलाला वनांतराला पाठविल्याबद्दल राजाला अत्यंत पश्चात्ताप झाला. शिबिराष्ट्रवासी लोकांनां देखील सच्छील वेस्संतराला अरण्यवासाचीं दु:खें भोगावयाला लावल्याबद्दल अनुताप होत चालला होता. संजयराजानें शिबीच्या पुढार्‍यांची सभा बोलवून वेस्संतराला परत आणण्याचा ठराव केला, व आपल्या प्रधानासह वंकपर्वतावर जाऊन त्यानें मुलाला आणि सुनेला घरीं आणिलें. शिबीच्या संमतीनें वेस्संतराची पुन: युवराजाच्या जागीं नेमणूक करण्यांत आली.

याप्रमाणें वेस्संतरबोधिसत्वानें आपल्या आवडत्या मुलांचें व पत्नीचें दान करून दानपारमितेचा अभ्यास केला.
« PreviousChapter ListNext »