Bookstruck

बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 13

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
बोधिसत्वाच्या विनंतीला मान देऊन राजानें ग्रामभोजकाला सोडून दिलें.

बोधिसत्वानें त्या जन्माचीं इतिकर्तव्यें संपल्यावर देहविसर्जन केलें, व देवलोकीं तो देवांचा राजा झाला. एके दिवशीं देवांचें आणि दैत्यांचें युद्ध चाललें असतां त्यांत बोधिसत्वाचा पराभव होऊन तो देवांच्या राजधानीकडे आपल्या रथांतून आकाशमार्गानें पळत सुटला. समुद्रकिनार्‍यावर सांवरीच्या झाडांवर लहानसान पक्ष्यांचीं पुष्कळ घरटीं होतीं. बोधिसत्वाचा रथ वेगानें चालला असतां त्याच्या वार्‍यानें तीं झाडें मोडून समुद्रांत पडूं लागलीं, व त्यांवरील घरट्यांतील पांखरांच्या पिलांचा एकच कलकलाट सुरू झाला. तेव्हां बोधिसत्व (इंद्र) मातलि सारथ्याला म्हणाला “हे मातलि, आमच्या वेगानें हीं झाडें उपटलीं जाऊन समुद्रामध्यें पडत आहेत; व त्यामुळें पक्ष्यांच्या पिलांचा संहार होत आहे. असुरांनीं माझे प्राण घेतले तरी हरकत नाहीं, तूं रथ मागें फिरव.”

मातलि सारथ्यानें इंद्राच्या हुकुमाप्रमाणें रथ मागें फिरविला. तेव्हां दैत्यांनां इंद्राच्या मदतीला आणखी देव आले असावे असें वाटून ते दशदिशा पळत सुटले. याप्रमाणें असुरांचा पराजय झाला, व देवांचा जय झाला.

बोधिसत्वानें मघाच्या जन्मामध्यें शीलपारमितेची आणि मैत्रिपारमितेची पूर्तता केली, हें या वर्णनावरून सहज समजण्यासारखें आहे. आणखीहि अनेक जन्मांमध्ये बोधिसत्वानें शीलपारमितेचा आणि मैत्रिपारमितेचा अभ्यास केला; विस्तारभयास्तव या सर्व कथांचें वर्णन येथें देतां येत नाहीं.
« PreviousChapter ListNext »