Bookstruck

बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 15

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
बोधिसत्व म्हणाला "मला शत्रु उद्भवेल, परंतु तो माझ्या हातून सुटणार नाहीं. महामेघ जसा धुळीला जेथल्या तेथेंच दाबून टाकितो, तद्वत् मी माझ्या शत्रूला जागच्याजागीं गार करून टाकीन!"

हें बोधिसत्वाचें भाषण ऐकून राजा अत्यंत क्रोधायमान झाला आणि आपल्या सेवकांनां म्हणाला "अरे, इकडे या आणि या स्त्रीला धरून माझ्या अंत:पुरांत नेऊन ठेवा. हा बुवा मोठा ढोंगी दिसतो. मी आपल्या शत्रूचा संहार करीन, यंव करीन आणि त्यंव करीन, अशा यानें वल्गना चालविल्या आहेत. आपल्या बायकोला बरोबर घेऊन हिंडण्यास याला लाज वाटत नाहीं. याच्या तपाचें माहात्म्य तरी काय आहे तें मला पाहूं द्या!"

राजसेवकांनीं बोधिसत्वाच्या पत्नीला, तिच्या आक्रोशाला न जुमानतां धरून राजाच्या अंत:पुरांत नेलें. राजानें तिची पुष्कळ विनवणी करून पाहिली, परंतु तिचें मन तो वळवूं शकला नाहीं. तेव्हां राजानें विचार केला, कीं, या तापसीला आपल्या अंत:पुरांत ठेवण्यांत अर्थ नाहीं. इच्यावर बलात्कार केल्यास आपली प्रजा आपणावर क्षुब्ध होईल. शिवाय, हिचा पति खराखराच तपस्वी नसेल कशावरून?

राजाच्या अंत:करणांतून विकाराचे ढग हळूहळू नष्ट झाले, व विवेकसूर्याचा प्रकाश तेथें पडूं लागला. त्याला आपण केलेल्या कृत्याची लाज वाटूं लागली, आणि आपलें कृत्य उघडकीला येऊं न देण्याविषयीं तो प्रयत्न करूं लागला. तो आपल्या परिवारासह उद्यानामध्यें जेथें बोधिसत्व शांतपणें आपली कंथा शिवीत बसला होता, तेथें गेला आणि त्याला म्हणाला "भो तापस! तू मोठमोठाल्या गोष्टी सांगितल्यास. तूं म्हणालास, कीं, मला शत्रु उद्भवेल, परंतु तो माझ्या हातून सुटणार नाहीं; पण मीं जेव्हां तुझ्या स्त्रीला उचलून नेलें, तेव्हां तुझ्यानें माझें कांहीं एक करवलें नाहीं; आणि आतां तूं तोंड खालीं घालून कंथा शिवीत स्वस्थ बसला आहेस!"

बोधिसत्व म्हणाला "महाराज, मीं कांहीं वृथा वल्गना केली नाहीं. मला जो शत्रु उद्भवला होता तो माझ्या हातून सुटला नाहीं. महामेघ जसा धुळीला दडपून टाकतो तसें मीं त्याला तेथल्या तेथें दडपून टाकलें."

राजा म्हणाला "असा तुझा शत्रु कोणता बरें?"

बोधिसत्व म्हणाला "जो उद्भवला असतां मनुष्य यथार्थतया पाहूं शकत नाहीं, जो उपस्थित झाला असतां आपल्या हितशत्रूंनां आनंद होतो, मनुष्य आपलें हित जाणत नाहीं, परलोकाची चाड रहात नाहीं, त्या क्रोधरूपी शत्रूनें आपण माझ्या पत्नीला ओढून नेत असतां माझ्यावर हल्ला केला; परंतु क्षांतीच्या बलानें मीं त्याचा तत्क्षणींच नाश केला! त्या क्रोधरिपूचा मला थोडादेखील उपद्रव झाला नाहीं!"

बोधिसत्वाचें हें भाषण ऐकून राजाला अत्यंत आनंद झाला आणि त्यानें आपल्या अपराधाबद्दल बोधिसत्वाची नम्रपणें क्षमा मागितली. पुढें त्याच उद्यानामध्यें त्या दोघांनां रहाण्यासाठीं राजानें एक सुंदर आश्रम बांधून दिला.

याप्रमाणें चुल्लबोधि तापसाच्या जन्मामध्यें बोधिसत्वानें क्षांतिपारमितेचा अभ्यास करून आत्मपरहित साधिलें.
« PreviousChapter ListNext »