Bookstruck

बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 20

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
तेव्हां सीवलीनें राजाला वळविण्याचा दुसरा एक उपाय शोधून काढला. कांहीं लोकांनां सर्व शहरांत जिकडेतिकडे पळापळ करण्यास सांगितलें. कांहीं लोकांच्या अंगावर लाक्षारस ओतून, जणूं काय त्यांच्या अंगावर रक्तच वाहत आहे, असा देखावा उत्पन्न केला, व त्या लोकांनां राजाजवळ नेऊन ती राजाला म्हणाली "महाराज, ज्या प्रजेचें तुम्हीं पुत्रवत् पालन केलें, त्या प्रजेची ही विपत्ति पहा! आपल्या मिथिला नगरींत सध्या बंडखोर शिरले आहेत, व त्यांनीं या लोकांवर प्रहार केल्यामुळें त्यांची ही स्थिति झाली आहे. हे पहा- तिकडे कांहीं लोक बंडखोरांनीं अतिशय मारल्यामुळें कण्हत पडले आहेत; दुसरे कांहीं नागरिक त्या बाजूला चहूंकडे पळत सुटले आहेत. म्हणून हे दयाळु महाराज, आपण मागें फिरा, व या लोकांचें रक्षण करा!"

जनक म्हणाला "मिथिलेचें रक्षण करण्याचें मिथिलेंतील तरुण लोकांनां मीं शिक्षण दिलें आहे, तेव्हां अशा वेळीं बंडखोरांचें ते दमन करतीलच; पण ते जर इतक्या अल्पावधींतच नामर्द बनले असतील, तर त्यांच्या शहराचें रक्षण मी एकटा कसें करूं शकेन?"

सीवलीदेवीनें आणि मिथिलेच्या नागरिकांनीं जनकराजाला मागें फिरविण्यासाठीं त्याच्या पुष्कळ विनवण्या केल्या, परंतु त्याचा निश्चय ढळला नाहीं. तो म्हणाला "मित्र हो! तुमचें माझ्यावर एवढें प्रेम आहे हें योग्यच आहे. कां कीं, राज्याभिषेक झाल्या दिवसापासून आजपर्यंत मी सतत तुमच्या हितासाठीं झटलों आहें. माझ्या कारकीर्दीत तरुण पिढीला मीं अशा प्रकारचें शिक्षण दिलें आहे, कीं, विदेहराष्ट्र आजला सर्व बाबतींत पुढें आहे. विदेहाची नवीन पिढी शत्रूपासून आपलें रक्षण करण्यास समर्थ आहे. आतां माझें कर्तव्य कांहीं राहिलें नाहीं. माझें हें उत्तरवय धर्मचिंतनांत घालविणें मला अत्यंत इष्ट आहे. सामान्यजनाप्रमाणें धनाची आणि राजसत्तेची तृष्णा न सोडतां मिथिलेच्या राजाला मरण आलें, तर त्यांत तुमचा काय फायदा होणार आहे? परंतु उत्तरवय धर्मचिंतनाकडे लावावें व तृष्णेचा समूळ उच्छेद करीत असतां मरण यावें, असें मीं उदाहरण घालून दिलें असतां वृद्ध आणि तरुण पिढीमध्यें धनाच्या आणि सत्तेच्या तृष्णेनें जे कलह माजतात ते बंद पडतील, व सर्व जनांची इहलोकींची संसारयात्रा सुखावह होईल; तेव्हां तुम्ही आतां माझ्या मागें न लागतां, दीर्घायूला राज्यपद देऊन एकमतानें राज्यकारभार चालवा." असें सांगून जनकराजानें आपल्या लोकांनां मागें फिरविलें व हिमालयाचा मार्ग धरला.

या जन्मामध्यें मोठ्या शौर्यानें समुद्र तरून जाऊन, व तदनंतर आपल्या प्रजेचें मोठ्या दक्षतेनें कल्याण करून, बोधिसत्वानें वीर्यपारमितेचा अभ्यास केला. पुढें राज्याचा त्याग करून, व उतार वयातील लोकांना वैराग्याचें उदाहरण घालून देऊन, नैष्कर्म्यपारमितेचा अभ्यास केला. सीवलीनें मिथिला जळत आहे, मिथिलेंतील लोकांनां बंडखोर लुबाडीत आहेत, असें सांगितलें असतांहि आपली सात्त्विक उपेक्षा ढळूं न देतां बोधिसत्वानें उपेक्षापारमितेचा अभ्यास केला. याच जन्मामध्यें नव्हे, तर आणखी अनेक जन्मांमध्यें बोधिसत्वानें या पारमितांचा अभ्यास केला. आतां बोधिसत्वानें प्रज्ञापारमितेचा अभ्यास कसा केला, याचें एक उदाहरण सांगतों.
« PreviousChapter ListNext »