Bookstruck

बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 33

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
तेव्हांपासून तेमिय कुमारानें वेड्याचें सोंग घेतलें. तो काय बोले, हे कोणालाच समजत नसे. नुसता ‘हा हा हा’ असा शब्द करावा; कधी हातपाय आखडल्यासारखें करून अंथरुणावर पडून रहावे: कांहीएक कारण नसतां ओरडावें; असा त्यानें क्रम चालविला. काशीराजाला आपल्या एकुलत्या एका मुलाविषयी फार काळजी उत्पन्न झाली. आपल्या पदरच्या ज्योतिषी ब्राह्मणांनां त्यानें बोलावून मंत्र, तंत्र, होमहवनादि सर्व काहीं करविलें, परंतु तेमियाची प्रकृति सुधारली नाही! उत्तम वैद्यांना आणवून राजानें आपल्या मुलाला औषधोपचार करण्यास सांगितलें. पण वैद्यांना तेमियांचा रोग कोणता, हेच समजेना!

अशा स्थितीत कांही वर्षे घालविल्यावर तेमियाची बाल्यावस्था पूर्ण होऊन तो तारुण्यदशेंत आला. त्याच्या रूपांत कोणतेंहि व्यंग नव्हतें. तारुण्याच्या भरांत असल्यामुळे तो फारच तेजस्वी दिसत होता. परंतु त्याच्या वेडामुळे तो राजाला आवडेनासा होत चालला. तथापि राजानें त्याला बरा करण्याचे उपाय सोडून दिले नाहीत.

एके दिवशी प्रधानमंडळापैकी एक जण राजाला म्हणाला “महाराज, आमच्या युवराजाचे वेड सुधारण्यासाठी आम्ही अनेक उपाय केलें, पण त्यांना यश आलें नाही. वैद्यांनी, ज्योतिष्यांनी व मांत्रिकांनीहि हात टेकले! आतां मला एक नवीन उपाय सुचला आहे. युवराज तारुण्यांत आले असल्यामुळें त्यांच्या सन्निध पुष्कळशा सुंदर तरुण स्त्रिया ठेवण्यांत आल्या, तर कदाचित त्यांच्या सहवासानें युवराजंचे वेड सुधारण्याचा संभव आहे.”

राजानें ताबडतोब युवराजाच्या सेवेसाठी पुष्कळशा तरुण रूपवती स्त्रियांची योजना केली.

तेमियानें इतर उपायांप्रमाणें या उपायालाहि दाद दिली नाही! त्या तरुण स्त्रियांनी त्याच्याजवळ जाऊन शृंगाररसभरित मनोवेधक भाषणे करावीत, परंतु तेमियाने ‘हाहा’ ‘हूहू’ या पलीकडे दुसरा शब्दच उच्चारू नयें.

राजाला आपल्या मुलाची प्रकृति सुधारण्याची आतां आशा उरली नाही. त्यानें आपल्या ज्योतिषी ब्राह्मणांना बोलावून आणलें आणि विचारले, “ब्राह्मणहो! हा मुलगा जन्मला तेव्हां तुम्ही असें भविष्य वर्तविलें, की, हा मोठा पुण्यशाली होणार आहे; परंतु पुष्कळ वर्षाच्या अनुभवाने आम्हाला असें वाटू लागलें आहे, की, हा मुलगा अगदीच जडमूढ आहे. असल्या या दगडाला राजवाड्यांत ठेवावें की न ठेवावें, याचीच मला शंका आहे!”

ब्राह्मण म्हणाले “महाराज, ज्योति:शास्त्राला अवगत नाही अशी कोणताहि गोष्ट नाही. प्राचीन आचार्यांनी आपल्या दिव्य दृष्टीनें ज्योति:शास्त्राचें सिद्धान्त बांधले आहेत. हा मुलगा वेडगळ होणार, हें आम्हाला पूर्वीच समजले होते! परंतु त्या वेळी आपणाला तसें सांगितले असता पुत्रजन्मापासून होणाऱया आनंदाला आपण मुकाल, असें आम्हांला वाटले. शिवाय, ग्रहांना दाने वगैरें करून हा थोडासा सुधारेल अशी आम्हांला आशा वाटत होती, परंतु याचा ग्रहयोग असा विलक्षण आहे, की, ग्रहशांतीने याची सुधारणा न होता, उलट हा बिघडत जात आहे! आता आमचें आपणाला असें सांगणें आहे, की, या दुर्दैवी प्राण्याला आपण राजवाड्यांत ठेवू नयें. याला जर येथे ठेवला तर आपल्या राज्यावर मोठे संकट येण्याचा संभव आहे!”

काशीराजानें ज्योतिषी ब्राह्मणांच्या आणि प्रधानमंडळाच्या सल्ल्यानें तेमिय कुमाराला अरण्यात पाठवून तेथे गाडून टाकण्यचा बेत निश्चित केला.
« PreviousChapter ListNext »