Bookstruck

बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 43

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
सुतसोम आपल्या पित्याचा आग्रहानें निरोप घेऊन नरभक्षक ब्रह्मदत्ताच्या पत्ता काढीत तो ज्या ठिकाणी रहात होता, त्या वडाच्या झाडापाशी गेला, ब्रह्मदत्त मोठे थोरले होमकुंड पेटवून महानरयज्ञाची तयारी करण्यांत गुंतला होता. सुतसोमाला पाहून त्याला त्यांत आश्चर्य वाटलें. तो टक लावून त्याच्याकडे पहात राहिला.

सुतसोम जवळ जाऊन त्याला म्हणाला “हे नरभक्षक! मी ब्राह्मणाला दिलेले वचन पुरे करून आलो आहें. आतां तू मला मारून यज्ञ कर किंवा माझें मांस खा. जे तुला वाटेल ते कर!”

ब्रह्मदत्त म्हणाला “होमकुंड नुकतेंच पेटविले आहे, आणि तूं काही कोठे पळून जात नाहीस; परंतु तूं ब्राह्मणापासून जे श्लोक ऐकिलेस, ते ऐकण्याची माझी फार इच्छा आहे. तेव्हां त्या तुझ्या बहुमोल गाथा (श्लोक) मला म्हणून दाखीव.”

बोधिसत्व म्हणाला “जिव्हालंपट होऊन तूं आपलें राज्य घालविलेस, त्या तुला या धार्मिक गाथांचा उपयोग काय? अत्यंत क्रूर कर्मे करणार्‍या आणि रक्ताने हात माखलेल्या तुझ्यासारख्या अधार्मिक मनुष्यापाशी सत्य कोठून सांपडणार? आणि ज्याच्यापाशी सत्य नाही, त्याला सुभाषिताची काय चाड?”

ब्रह्मदत्त म्हणाला “मी नरमांस खातो, हाच काय तो माझा मोठा गुन्हा आहे; आणि म्हणूनच तूं मला अधार्मिक म्हणत आहेस, परंतु मी तुला असें विचारतो, की, मृगयेला जाऊन गरीब बिचार्‍या श्वापदांना मारून खाणें आणि माणसाला मारून खाणे यांत भेद काय?”

बोधिसत्व म्हणाला “ब्रह्मदत्त, पांच नखे असलेले पांचच प्राणी क्षत्रियानें भक्षण करावे, अशी शास्त्राची अनुज्ञा आहे, पण तुझें हे कर्म शास्त्रनिषिद्ध असल्यामुळे तू अधार्मिक ठरतोस.”

ब्रह्मदत्तानें हा संवाद तसाच सोडून दिला. कारण, आपला गुन्हा कबूल करण्याचे त्याला धाडस नव्हते. तो बोधिसत्वाला म्हणाला “मी धार्मिक आहे, की, अधार्मिक आहे, याबद्दल वाद नको आहे, परंतु मला तू पुन: आलास कसा हे सांग. मला वाटतें की, तूं क्षत्रियनीति विसरलास, नाही तर शत्रूच्या हातांतून येन केन प्रकारें मुक्त झाल्यावर पुन: राजीखुषीनें तूं माझ्या ताब्यांत आला नसतांस!”

बोधिसत्व म्हणाला “राजनीतीपेक्षा सत्य श्रेष्ठ होय! सत्यासारखी दुसरी नीति या जगामध्ये नाही. या सत्याचा भंग होऊ नयें, म्हणून मी राजीखुषीनें या ठिकाणी आलो आहें.”

ब्रह्मदत्त म्हणाला “राजवाड्यामध्ये षड्स अन्नांचे सेवन करण्यास आणि शृंगाररसाचें आकंठ पान करण्यास मिळतें, असें असतां सत्यालाच धरून बसणें केवळ मूर्खपणा होय.!”

बोधिसत्व म्हणाला “या जगामध्ये सत्यासारखा दुसरा मधुर रस नाही. सत्यरसाचा ज्यांनी आस्वाद घेतला, तेच साधुसंत संसारसमुद्र तरून जाण्यास समर्थ होतात.”

ब्रह्मदत्त म्हणाला “पण जीवितभय सर्वांत मोठे आहे! आपल्या जीविताचे रक्षण करण्यासाठी खोटे बोलावें असे राजनीति सांगते. तथापि तूं आपल्या जीविताविषयी अगदीच बेफिकीर दिसतोस; याचें कारण काय?”

बोधिसत्व म्हणाला “मी आजपर्यंत अनेक लोकांवर उपकार केला आहे, अनेक शुभ कर्मे केली आहेत, आईबापांची सेवा केली आहे, आप्तजनांला मदत केली आहे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे गृहस्थाचा जी कर्तव्यें आहेत, त्यात मी कसूर पडू दिली नाही. तेव्हा आता मला पश्चात्ताप होण्याचे काही एक कारण राहिलें नाही. अर्थात मरणभयापासून मी मुक्त आहे, यात नवल नाही.”

ब्रह्मदत्त बोधिसत्वाच्या भाषणाने अत्यंत संतुष्ट झाला. अशा थोर पुरुषाला मारून यज्ञ करणे म्हणजे भरतखंडाची मोठीच हानि करणें होय, अशी त्याची पक्की खात्री झाली. तो म्हणाला “तुझ्यासारख्या सत्पुरुषाला मारून यज्ञ करण्यापेक्षा हलहल विष भक्षण करून प्राण द्यावा हे बरे! परंतु तुझ्या गाथा मला सांग. मी जरी अनधिकारी असलो, तरी तुझ्यासारख्या साधुपुरुषाकडून त्या ऐकिल्या म्हणजे त्यांचा अर्थ मला कळेल.”
« PreviousChapter ListNext »