Bookstruck

बुद्धचरित्र (भाग दुसरा) 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
एका वर्षी या पौणिमेच्या दिवशी मायादेवीनें अंध, पंगु इत्यादि अनाथ लोकांना आणि श्रमणब्राह्मणांना पुष्कळ दानधर्म केला, आणि रात्री बराच वेळ धर्मश्रवणांत घालवून ती निजावयाला गेली.

त्या रात्री तिनें पुढीलप्रमाणें एक स्वप्न पाहिलें:-

चारहि दिशांच्या रक्षक देवांनी उचलून तिला हिमालयावर नेले. तेथें रमणीय भूमिभागी एका भव्य शालवृक्षाखाली तिला ठेवण्यात आलें. नंतर त्या चारहि देंवांच्या स्त्रियांनी येऊन मायादेवीला दिव्य गंधोदकानें स्नान घातलें, व दिव्य वस्त्रालकारांनी तिला शृंगारून एका कनकविमानामध्ये उत्तम पलंगावर पूर्वेला डोके करून निजविले. तेव्हा एक सफेत हत्ती जवळच्या सुवर्णपर्वतावरून खाली उतरून मायादेवी निजली होती त्या ठिकाणी आला, व आपल्या रजतवर्ण शुडेंत एक सफेत कमल घेऊन त्यानें मायादेवीला त्रिवार प्रदक्षिणा केली आणि तिच्या उजव्या कुशीतून तो हळूच उदरात शिरला!

दुसर्‍या दिवशी सकाळी मायादेवीनें प्रफुलित वदनानें आपलें स्वप्न शुद्धोदन राजाला सांगितले. राजानें आपल्या राज्यातील प्रमुख ब्राह्मणांना आमंत्रण करून सभेमध्ये त्यांना या स्वप्नांचा अर्थ विचारिला.

ब्राह्मण म्हणाले “महाराज, हे स्वप्नअत्यंत शुभसूचक आहे. राज्ञीच्या उदरी एक मोठा सत्यपुरुष जन्माला येणार आहे. तो जर गृहस्थाश्रमामध्ये राहील, तर चक्रवर्ती राजा होईल, संन्याशी होईल, तर बुद्ध होऊन जगताचें अज्ञान दूर करील.”

राजानें ब्राह्मणाचें भाषण ऐकून संतुष्ट चित्तानें त्यांचा चांगला गौरव केला, आणि त्या दिवसापासून आपल्या पत्नीची तो विशेष काळजी घेऊ लागला.

मायादेवीचें डोहळे काही विशेष नव्हतें. सर्व प्राणिमात्रांविषयी तिच्या अंत:करणांत आधीच दया वास करीत होती. बोधिसत्व उरांत आल्यापासून तर ती अधिकच वृद्धिंगत होत गेली. मायादेवीच्या मनांतून विषयवासना पार नष्ट झाली. शुद्धोदनराजावर तिचें प्रेम फारच होते, व ते या स्थितीत अधिक वाढलें. परंतु पूर्वी त्या प्रेमात विषयवासना मिसळली होती. या अभिनव प्रेमात ती राहिली नाही. याप्रमाणे मायादेवीला नवमास पूर्ण झाले.

एके दिवशी मायादेवी शुद्धोदनराजाला म्हणाली “महाराज, आतां मी माहेरी जाण्यास उत्कंठित झालें आहें. तेव्हा मला लवकर माझ्या आईच्या घरी पाठविण्याची व्यवस्था करा.”

शुद्धोदनराजे या नऊ महिन्यांत आपल्या पत्नीचें मन कधीहि दुखविले नाही. तिच्या म्हणण्याप्रमाणे वागण्यास सदोदित तत्पर असें, तयानें ताबडतोब एक हजार सैन्य बरोबर देऊन देवदह शहरांत मायादेवीचा पिता रहात असे, तेथे तिला पाठविण्याची व्यवस्था केली. कपिलवस्तूपासून देवदहापर्यंत सर्व रस्ता साफ करवून मायादेवीला एका सुंदर शिबिकेमध्ये बसवून रवाना करण्यात आलें.

कपिलवस्तू आणि देवदह या दोन शहरांच्या दरम्यान लुंबिनी नावांचे एक सुंदर उद्यान होते. कपिलवस्तूचे शाक्य आणि देवदहाचे कोलिप यांनी आपल्या सीमेवर उभयतांच्या करमणुकीसाठी हे उद्यान तयार केले होते. मायादेवी कपिलवस्तूहून निघून जेव्हा या उद्यानाजवळ आली, तेव्हा तिला तेथें काही वेळ विश्रांति घेण्याची उत्कट इच्छा उत्पन्न झाली. तिच्या हुकूमाप्रमाणें तिची शिबिका उद्यानांत नेण्यात आल्यावर ती खाली उतरली, व इकडेतिकडे फिरूं लागली. त्या उद्यानांत एक अत्यंत सुंदर शालवृक्ष त्या वेळी खालपासून वरपर्यंत सारखा फुलून गेला होता. मायादेवी त्या वृक्षाखाली जाऊन उभी राहिली. तोच एक शाखा वांकून तिच्या हातांत आली; इतक्यांत तिला गर्भवेदना होऊं लगल्या. तिच्या दासीगणानें चारी बाजूंला कनात लावून मायादेवीला आंत ठेविले. तेथेंच आमच्या बोधिसत्वाचा जन्म झाला.

तेव्हा ब्रह्मलोकांतून चार ब्रह्मदेव (ब्रह्मलोकी असंख्य ब्रह्मदेव आहेत, अशी कल्पना होती.) तेथे आले. आणि मायादेवीला म्हणाले “देवि! तुझा हा पुत्र जगाचा उद्धार करणारा आहे. अशा पुत्राला जन्म दिल्याबद्दल तुला अत्यंत आनंद झाला पाहिजे.”
बोधिसत्व इतर प्राण्यांप्रमाणें गर्भमलानें माखलेला जन्मला नाही. रेशमी वस्त्रावर ठेवलेल्या उंची मोत्याप्रमाणें तो निर्मळ होता. तथापि त्याचा बहुमान करण्यासाठी आकाशांतून दोन उदकधारा खाली आल्या व त्यांनी बोधिसत्वाचे आणि मायादेवीचे अंग धुऊन टाकिले.
« PreviousChapter ListNext »