Bookstruck

बुद्धचरित्र (भाग दुसरा) 11

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
बिंबिसारानें सिद्धार्थाचा निश्चय पाहून त्याने मन वळविण्याची खटपट सोडून दिली, आणि तो म्हणाला “हे राजकुमार! तुझ्या निश्चयाच्या आड मी येऊ इच्छित नाही, परंतु जर तुला जगदुद्धाराचा मार्ग सापडला तर प्रथमत: तूं माझें विहारदहन स्वीकारलें पाहिजे.”

सिद्धार्थाने ही गोष्ट कबूल केली, व तो तेथून आळारकालाम ऋषीच्या आश्रमांत गेला.

आळारकालाम हा मोठा नामांकित तपस्वी राजगृहाजवळ एका आश्रमांत रहात असे. योगशास्त्रांत तो पारंगत आहे, अशी त्याची फार ख्याति होती. या शास्त्राची तत्त्वें समजावून घेण्यासाठी त्याच्यापाशी दूरदरच्या प्रांतांतून पुष्कळ भाविक लोक येत असत, व त्यांपैकी कांहीजण त्याचे शिष्य होऊन योगाभ्यास करण्यासाठी तेथेंच रहात असत.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ विहार म्हणजे भिक्षूला रहाण्यासाठीं बांधिलेला आश्रम.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सिद्धार्थ कालामाच्या आश्रमांत शिरला, त्या वेळीं बरीच भाविक मंडळी तेथें जमली होती. कालामाच्या दर्शनासाठी मी आलो आहे, असें संगितल्यावर काही तपस्वांनी त्याला कालाम ऋषीच्या कुटीत नेले. कालाम एका दर्भासनावर बसला होता. सिद्धार्थ त्याला नमस्कार करून एका बाजूला तेथे मांडलेल्या एका दर्भासनावर बसला आणि कालामाला आपले पूर्ववृत्त निवेदित करून म्हणाला “भो कालाम, आपला शिष्य होऊन मोक्षमार्गाचा लाभ करून घेण्याच्या इच्छेने मी आपणापाशी आलो आहे.”

कालाम ऋषीच्या पुष्कळशा शिष्यांत एवढ्या मोठ्या राजकुलांत जन्मलेला एकदेखील शिष्य नव्हता. तेव्हा सिद्धार्थ आपलें शिष्यत्व पत्करण्यासाठी येथवर आला या गोष्टीनें त्याच्या मनाला संतोष झाला असला, तर त्यात विशेष आश्चर्य मानण्याजोगे नाही. तो सिद्धार्थाला म्हणाला “माझ्या पंथांत शिरून पुष्कळांचे समाधान झाले. तूं थोर कुलामध्ये जन्मला असल्यामुळे लहानपणांतच सर्व प्रकारचे शिक्षण तुला मिळाले असले पाहिजे. तेव्हा तू जर माझ्या मताचा अंगीकार करिशील, तर त्यातील रहस्य समजण्यास तुला आवकाश लागणार नाही.”

कालाम ऋषीच्या तत्त्वज्ञानामाध्ये सिद्धार्थाने अल्पावधीतच पटुत्व संपादिले. वाटेल त्या सिद्धांताची पूर्वपक्ष-उत्तरपक्ष करून चर्चा करण्याची त्याची तयारी होती, पण ती सारी पोपटपंची होती. दुसरेंहि कांही कालामाचे शिष्य सिद्धार्थाप्रमाणेच पोपटपंचीत प्रवीण असून आपण मोठे तत्त्ववेत्ते आहो, असे समजत असत. पण सिद्धार्थाचे या पोपटपंचीने समाधान झाले नाही. तो आपल्या मनाशीच म्हणाला “केवळ श्रद्धापूर्वक सर्व सिद्धांत तोंडपाठ केल्यानें आमच्या गुरूला धर्मरहस्यचा साक्षात्कार झाला नसावा, आणि साक्षात्कारावाचून आपल्या धर्माचा सर्व लोकांना त्याने उपदेश केला नसता. तेव्हा मी या पोपटपंचीत समाधान न मानतां कलाम ऋषीच्या धर्मरहस्याचा साक्षात्कार करून घेतला पाहिजे.”

असा विचार करून सिद्धार्थ कालामाजवळ आला आणि म्हणाला “भो आचार्य, आपण शिकविलेले सर्व सिद्धांत मला तोंडपाठ येत आहेत. कोणत्याहि सिद्धातासंबंधानें वादविवाद करण्यास मी तयार आहे; परंतु आपल्या धर्मरहस्याचा मला साक्षात्कार झाला नाही. तेव्हां आपल्या धर्माचें सारभूत अंग कोणते व त्याच्या साक्षात्कराचा मार्ग कोणता, हे कृपा करून मला सांगा.”
कालाम म्हणाला “सिद्धार्था, माझ्या सर्व धर्मांमध्ये मी ज्या समाधीच्या सात पायर्‍या सांगितल्या, त्या श्रेष्ठ होत, त्यांचा जर लाभ झाला, तर तुला माझ्या धर्मरहस्याचें तेव्हांच ज्ञान होईल.”

सिद्धार्थ म्हणाला “या समाधीच्या सात पायर्‍या जरी मला तोंडपाठ येत आहेत, तरी त्याचे मला यथार्थ ज्ञान झाले नाही. पण माझ्यावर दया करून पुन: एकवार त्यांचे स्पष्टीकरण करावें.”
« PreviousChapter ListNext »