Bookstruck

बुद्धचरित्र (भाग दुसरा) 15

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
त्या दिवसांपासून आसपासच्या गावांत भिक्षेला जाऊन सिद्धार्थ थोडेथोडें अन्न ग्रहण करूं लागला. तेव्हां त्याच्या शुश्रूषेला असलेल्या पांच तपस्व्यांनां त्याचा अत्यंत तिटकारा आला. ते परस्परांना म्हणाले “आजपर्यंत आम्हांला अशी आशा होती की, सिद्धार्थ तीव्र तपश्चर्येच्यायोगे बुद्ध होऊन आमचें अज्ञान दूर करील, व आम्हांला देखील आपल्या धर्माचा भागी करील; पण आमची आशा व्यर्थ झाली आहे. हा ढोंगी राजपुत्र मुक्तीचा खरा मार्ग सोडून पोटाच्या मागें लागला आहे? आतां याच्यापासून ब्रह्मज्ञानाची अपेक्षा करणें म्हटले म्हणजे निंबाच्या झाडापासून मधुर फळांची अपेक्षा करणें होय!”

अशा रीतीनें आपसांत सिद्धार्थाविषयी तिरस्कारव्यंजक उद्गार काढून ते पांच तपस्वी काशीला चालते झाले.

आपले साथीदार आपणाला सोडून गेले, या विचारानें सिद्धार्थाच्या मनावर काहीएक अनिष्ट परिणाम न होता त्यानें मोठ्या कळकळीनें धर्मचिंतनाचा क्रम पुढें चालविला. कांही दिवस नियमितपणे मिताहार सेवन केल्याने सिद्धार्थाच्या अंगी पूर्वीची शक्ति येत गेली, आणि निरामय समाधिमुखाचा तो अनुभव घेऊ लागला.

(४)
माराशीं युद्ध


उरुवेला प्रदेशांत सेनानी नांवाचा एक इनामदार रहात असे. तो ज्या गावांत रहात असे, त्याला सेनानीग्राम असें नाव पडले होते. त्या इनामदाराची सुजाता नावांची एक सुस्वरूप कन्या होती. आपणाला योग्य वर मिळून प्रथमत: पुत्रलाभ झाला, तर देवतेला दुधाच्या पायसाचा नैवेद्य करून मोठ्या सत्कारानें तिची पूजा करीन, असा सुजातेनें कौमारवयांत आपल्या गावाशेजारच्या वनदेवतेला नवस केला होता.

सुजातेचा मनोरथ संपूर्ण झाला होता. तिला मोठ्या कुळांतील सद्गुणी नवर्‍याचा लाभ झाला होता. व त्याच्या सहवासांत कांही काल घालविल्यानंतर तिला एक देखणा आणि तरतरीत मुलगा झाला होता. तिची जशी आपल्या पतीवर नि:सीम भक्ति होती, तसेच तिच्या पतीचेंहि तिच्यावर निरतिशय प्रेम होते, व ते पुत्रलाभामुळें द्विगुणित झालें होते.

सुजाता या आनंदाच्या भरांत आपल्या देवतेला विसरली नाही. वैशाख पौणिमेच्या दिवशी सकाळी तिनें आपल्या दासीला वनामध्ये जाऊन तेथे ती देवता ज्या वडाच्या झाडावर रहात होती, त्या खालील जागा साफसूफ करून पूजेची तयारी करण्यास सांगितले, व आपण स्वत: दुधाची उत्तम खीर करण्याच्या तयारीला लागली.

बोधिसत्वाला तपश्चर्येला आरंभ करून आज जवळजवळ सहा वर्षें होत आली होती. या दिवशी सकाळी, सुजातेची देवता रहात होती त्या झाडाखाली तो ध्यानस्थ बसला होता. कांही कालपर्यंत परिमित अन्नाचें ग्रहण केल्याने त्याच्या चेहर्‍यावर पूर्वीची टवटवी आली होती, आणि तीत तपश्चर्येने आलेल्या तेजस्वतेची भर पडल्यामुळे त्याची मुखकांति अत्यंत प्रसन्न दिसत होती.
सुजातेच्या दासीनें जेव्हा आमच्या बोधिसत्वाची ध्यानस्थ बसलेली गंभीर मूर्ति पाहिली, तेव्हां तिला वाटलें की, सुजातेची पूजा ग्रहण करण्यासाठी साक्षात देवताच त्या वृक्षाखाली येऊन बसली आहे! ती तशीच धांवत सुजातेपाशी गेली आणि म्हणाली “आर्ये! तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी वनदेवता वडाच्या झाडाखाली येऊन बसली आहे. दुधाचा पायस आणि पूजेचें सामान घेऊन आपण लवकर तेथें जाऊं, आणि देवतेची पूजा करूं.”

सुजातेंने आपल्या दासीजवळ पूजचे सर्व सामान देऊन एका सोन्याच्या ताटांत दुधाचा पायस घातला, व तो दुसर्‍या सोन्याच्या ताटानें झांकून आपण स्वत: शिरावर घेतला. त्या दोघीजणी जेव्हां त्या वडाच्या झाडाजवळ आल्या, तेव्हां दुरूनच बोधिसत्वाची गंभीर मुद्रा पाहून अत्यंत चकित होऊन गेल्या. ही वनदेवता आहे, अशी दासीची तर पूर्वीच खात्री झाली होती, पण आता सुजातेचा देखील संशय पार पळाला. तिनें थेट बोधिसत्वाजवळ ते खिरीनें भरलेले ताट ठेविले, व त्याला प्रदक्षिणा करून आणि नमस्कार करून ती बाजूला उभी राहिली. त्या भोळ्या दासीनें तर बोधिसत्वासमोर लोटांगणच घातलें. त्या मोठमोठ्याने वनदेवतेची स्तुति करू लागल्या. त्यांच्या त्या गडबडीमुळें बोधिसत्वाच्या ध्यानसुखांत व्यत्यय आला, व त्यानें डोळे उघडून त्यांजकडे पाहिलें.

तेव्हा ही देवता नसून हा कोणीतरी महान तपस्वी असवा ही गोष्ट सुजातेच्या लक्ष्यांत आली व ती बोधिसत्वाला म्हणाली “हे सत्पुरुषा! आम्ही वनदवतेची पूजा करण्यासाठी येथे आलो. आपणच वनदेवता आहां, अशा समजुतीनें मी हा पायस आणाला अर्पण केला आहे. त्याचा आपण स्वीकार करावा, अशी माझी विनंति आहे. आपल्यासारख्या साधुपुरुषांनी जर या नैवेद्याचे ग्रहण केले, तर माझी देवता माझ्यावर फार प्रसन्न होईल, यांत संशय नाही!’

बोधिसत्वानें आपल्या हातावर पाणी घेऊन ते अन्न स्वीकारले व आणि मितभोजन करून आणि सुजातेला आशीर्वाद देऊन नदीच्या कांठाने फिरतफिरत संध्याकाळी तो एका पिंपळाच्या झाडाडजवळ आला. तेथें सोत्थिय नावाच्या तृणहारकानें त्याला आठ मुठी गवत दिलें. ते घेऊन तो त्या झाडाखाली गेला आणि त्यानें आपणाला बसण्यासाठी त्या गवताचें आसन तयार करून झाडाच्या पूर्वेच्या बाजूला तो त्या आसनावर ध्यानस्थ बसला.

सिद्धार्थ राजकुमार बुद्ध होण्याच्या बेतात आहे, हे पाहून माराला अतिशय वाईट वाटलें. तो आपल्या मनाशी म्हणाला “आजपर्यंत कोणत्याहि श्रमणानें किंवा ब्राह्मणानें माझा अतिक्रम केला नाही; पण हा तरुण राजकुमार मोठा दृढनिश्चयी दिसतो. यानें माझा अपमान करून माझ्यापासून स्वतंत्र होण्याचा मोठा खटाटोप चलविला आहे! याच वेळी याचें दमन न केल्यास हा माझ्या हातून कायमचा सुटेल, व माझ्याविरुद्ध बंड करावयला लोकांना उत्तेजन देईल.”

असा विचार करून मारानें तत्क्षणी आपली सर्व सेना सिद्ध केली, व सिद्धार्थाला चारी बाजूंनी वेढून त्याजवर तुटून पडावयाला आपल्या योद्धांना हुकूम केला.
« PreviousChapter ListNext »