Bookstruck

बुद्धचरित्र (भाग दुसरा) 36

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
उपालींनें विचार केला, कीं, “जर मी हे अलंकार घेऊन माघारा फिरलों, तर यानेंच भद्दियादिकांचा घात केला, अशा समजुतीनें शाक्य राजे आपणाला फाशी देतील. तेव्हां घरी न जातां यांच्याबरोबरच पुढें जाणें चांगलें.” त्यानें शाक्यकुमारांनी दिलेले अलंकार एका झाडाला टांगले व “जो पाहील तो घेऊन जावो” असे उद्गार काढून तो शाक्यकुमारांबरोबर अनुप्रिया गांवाला आला.

भद्दियादिक शाक्यांनी बुद्धाची भेट घेऊन आपणांला भिक्षुसंघांत घेण्याची विनंती केली व ती बुद्धानें मान्य केल्यावर ते म्हणाले “भगवन्, प्रथमत: आमच्या या उपालि न्हाव्याला प्रव्रज्या द्या. तो आमचा हितकर्ता मित्र असून मोठा बुद्धिमान आहे. त्याला आपण प्रथम भिक्षु केलें म्हणजे त्याच्यामागून झालेले भिक्षु या नात्यानें आम्हांला त्याला वंदन करावें लागेल व आम्ही थोर कुलांत जन्मलों याबद्दल आम्हांला गर्व वाटणार नाही.”

बुद्धानें त्यांची विनंति मान्य करून प्रथमत: उपालीला प्रव्रज्या दिली. उपाली पुढें मोठा विनयधर (विनय ग्रंथांमध्ये कुशल) झाला. अनुरुद्धाला दिव्यदृष्टीचा लाभ झाला. आनंद बुद्धाची शुश्रूषा करणार्‍या भिक्षुंत प्रमुख झाला. पण देवदत्त लौकिकसिद्धीच्या मागें लागला.

बुद्धगुरू एका काली कौशांबी नगरामध्यें घोषितारामांत रहात होता. तेथे देवदत्ताच्या मनांत असा विकल्प आला, कीं, “मी एकाद्या राजकुमाराला प्रसन्न करून मोठें नाव मिळवीन.”

तो कौशांबीहून एकटाच राजगृहाला आला व तेथें बिंबिसार राजाच्या अजातशत्रु कुमाराला योगसिद्धीचा चमत्कार दाखवून त्यानें वश केले. राजगृहाला आल्यावर बुद्धगुरूला असें वर्तमान समजलें, कीं, “देवदत्त अजातशत्रूपासून पुष्कळ लाभसत्कार मिळवीत आहे.” तेव्हा तो म्हणाला “भिक्षुहो, देवदत्त खोट्या मार्गाला लागला आहे. केळीचें फळ केळीचा नाश करतें; फळ वेळूचा नाश करते; आणि लौकिकसिद्धीच्या योगें मिळविलेला लाभ मूर्ख मनुष्याचा नाश करतो.”

एके दिवशी बुद्धगुरू मोठ्या सभेंत धर्मोपदेश करीत होता. त्या वेळीं देवदत्त बुद्धाला वंदन करून म्हणाला “भगवन्, आतां आपण वृद्ध झालां आहां, तेव्हा भिक्षुसंघाचें नायकत्व माझ्याकडे देऊन आपण शांतपणे कालक्रमणा करावी.”

बुद्धानें ही गोष्ट नाकबूल केली. तो म्हणाला “देवदत्ता, सारिपुत्तमोग्गल्लानांसारख्या समर्थ श्रावकांच्या हातीं देखील मी भिक्षुसंघाचा भार सोंपविला नाहीं. तूं तर या कामीं अगदीच नालायक आहेस; तेव्हां तुला भिक्षुसंघाचा पुढारी कसें करतां येईल?”

बुद्धानें आपणाला पुढारी होण्यास नालायक ठरविले, याजबद्दल देवदत्ताला अत्यंत विषाद वाटला. आतां बुद्धाचा सूड उगवण्यापलीकडे दुसरा विचार त्याच्या मनामध्यें राहिला नाहीं.
« PreviousChapter ListNext »