Bookstruck

बुद्धचरित्र (भाग दुसरा) 40

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
[१२]
मागन्दिया ब्राह्मणकन्या

कुरुदेशामध्यें मागन्दिय नांवाचा एक ब्राह्मण रहात असे. त्याला एक सर्वलक्षणसंपन्न सुस्वरूप कन्या होती. पुष्कळ कुलीन ब्राह्मणांनीं तिला मागणी घातली; परंतु मागन्दियानें ते योग्य वर नाहींत असें म्हणून त्यांनां आपली कन्या दिली नाही. धर्मप्रसाराला आरंभ केल्यावर काहीं वर्षांनी बुद्धगुरू कुरुदेशाला गेला. तेथें गांवोगावीं उपदेश करीत करीत असतां त्याला मागन्दिय ब्राह्मणानें पाहिलें, व त्याच्या अंगावरील लक्षणें पाहून हाच आपल्या मुलीला योग्य वर आहे अशी त्याची खात्री झाली. तेव्हां तो बुद्धाला म्हणाला “हे श्रमण! आज कित्येक वर्षे मी माझ्या मुलीला योग्य वर पहात आहे; परंतु तुझ्यासारख्या सर्वलक्षणसंपन्न कोणी आढळत नाहीं. आतां माझी मुलगी मी तुला अर्पण करतों; तिचा तूं अंगीकार कर.”

बुद्ध म्हणाला “हे ब्राह्मण, या नाशवंत मनुष्यशरीराचा वीट आल्यामुळें मीं गृहत्याग केला. कामसुखांत मला आतां आनंद वाटत नाही; तेव्हां माझ्यासाठीं तुझ्या मुलीचा मीं परिग्रह कसा करावा?”

बुद्धाची नि:स्पृहता पाहून मागन्दिय ब्राह्मण आपल्या पत्नीसह बौद्ध उपासक झाला. पण त्याच्या कनेयाला मात्र बुद्धाचा फार राग आला. “माझ्यासारखी सुस्वरूप स्त्री या मुंडकाच्या पदरीं पडत असतां त्यानें माझी अवहेलना करावी व माझा अंगीकार करूं नये, हा मोठा चमत्कारच म्हटला पाहिजे! जर मागेंपुढें मला संधि सांपडली, तर मी याचा सूड उगवीनच उगवीन,”  असें आपल्या मनाशींच उद्गार काढून तिनें एकवार बुद्धाकडे तिरस्कारयुक्त दृष्टींने पाहिलें व मान खाली घालून ती चूप बसली.

मागन्दिय ब्राह्मणानें मुलीला भावाच्या स्वाधीन करून आपण प्रव्रज्या घेतली. तिच्या चुलत्यानें तिला दुसरा योग्य वर न मिळाल्यामुळे कौशांबी येथील उदयन राजाला दिलें. उदयनराजाला पुष्कळ राण्या होत्या; परंतु आपल्या सौंदर्यानें आणि शहाणपणानें मागन्दिया त्या सर्वांत पट्टराणी होऊन बसली.

पुढें काही वर्षांनी बुद्धगुरू कौशांबीला आला असतां तिनें त्याचा सूड उगविण्याचा बेत अमलांत आणिला. शहरांतील धूर्त लोकांनां तिनें लांच देऊन जेथेंजेथे बुद्ध भेटले, तेथेंतेथे त्याला शिव्या देण्यास लाविलें.

आनंद आणि बुद्ध भिक्षेसाठी कौशांबीमध्यें फिरत असतां त्यांजवर प्रत्येक गल्लीतून शिव्यांचा वर्षाव होऊं लागला. तेव्हा आनंद म्हणाला “भगवन्, या लोकांच्या शिव्याशापांपुढे आपण येथे रहाण्याची सोय राहिली नाहीं. चला आपण दुसरीकडे जाऊं.”

बुद्ध म्हणाला “आनंदा, जर तेथेंहि लोक आम्हालां शिव्या देऊं लागले, तर मग कोठें जाऊ या?”’

आनंद म्हणाला “दुसर्‍या कोठें तरी.”

“पण आनंदा, आपण असें करूं गेलों, तर विनाकारण क्लेशभागी होऊं. येथल्यायेथेंच जर आम्ही या लोकांचे शिव्याशाप सहन केले, तर आम्हांला यांच्या भीतीनें दुसर्‍या ठिकाणीं जाण्याचें प्रयोजन राहिलें नाही. हे लोक चारआठ दिवस आमच्यामागें लागतील, आणि आम्ही त्यांजकडे पूर्ण दुर्लक्ष्य करितों, असें पाहून आपोआप या शिवागाळीच्या व्यवसायापासून विरत होतील¡”

बुद्धाच्या म्हणण्याचा आनंदाला सातआठ दिवसांतच अनुभव आला.
« PreviousChapter ListNext »