Bookstruck

बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
[८]
पांच गोष्टींचे सतत चिंतन करावें

श्रावस्तीमध्यें रहात असतां बुद्धगुरू भिक्षूंना म्हणाला “भिक्षुहो, मी जराधर्मी आहें, व्याधिधर्मी आहे. मरणधर्मी आहें, सर्व प्रिय वस्तूंचा आणि मनुष्यांचा मला वियोग घडणार आहे, व मी जें वाईट किंवा बरें कर्म करीन त्याचा दायाद होईन, कर्म हेंच माझें धन आहे आणि कर्मच माझा बांधव आहे.” या पांच गोष्टींचें प्रत्येकानें- मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, प्रव्रजित असो किंवा गृहस्थ असो- वारंवार स्मरण करावें.

“भिक्षुहो, ‘मी जराधर्मी’ आहें असा विचार केला असतां मनुष्याचा तारुण्यमद नष्ट होतो. या तारुण्यमदाच्या योगें मनुष्य कायेनें, वाचेनें आणि मनानें पाप करीत असतो; पण जो आपण जराधर्मी आहों, याची आठवण ठेवतो, त्याचा हा मद नाश पावतो किंवा निदान कमी तरी होतो. हा या गोष्टीच्या चिंतनापासून फायदा आहे. ‘मी व्याधिधर्मी आहें’ या चिंतनापासून असा फायदा आहें, कीं, ज्याच्या योगें मनुष्य त्रिविध पापें आचरितो, तो आरोग्यमद नष्ट होतो. निदान कमी तरी होतो. ‘मी मरणधर्मी आहें’ या गोष्टींचे चिंतन केलें असतां मनुष्याचा जीवितमद नष्ट होतो. हा या चिंतनापासून फायदा आहे. ‘सर्व प्रिय वस्तूंचा आणि मनुष्यांचा मला वियोग होणार आहे या गोष्टीचें स्मरण ठेविलें असतां मनुष्य प्रियवस्तूसाठी किंवा मनुष्यांसाठीं पापाचरणाला प्रवृत्त होत नाहीं, व वियोगदु:खाला बळी पडत नाहीं. ‘बर्‍या वाईट कर्माचा मी वाटेकरी होईन, कर्म हेंच माझे धन आणि कर्म हाच बांधव,’’ या गोष्टीचें चिंतन केलें असतां मनुष्य पापकर्मापासून निवृत्त होतो. हा या गोष्टींच्या चिंतनापासून फायदा आहे.’’

[९]
गेल्याचा शोक वृथा!

कोणे एके समयी बुद्धगुरू श्रावस्तीमध्यें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आश्रमांत रहात होता. एके दिवशी राजा पसेनदिकोसल जेतवनामध्यें येऊन बुद्धाला नमस्कार करून एका बाजूला बसला. इतक्यांत राजवाड्यांतून राजाची आवडती राणी मल्लिका परलोकवासी झाल्याचें वर्तमान आलें. तेँ ऐकून राजा शोकुकल झाला. तेव्हां बुद्ध म्हणाला “महाराज, जराधर्मी पदार्थाला जरा न यावी, मरणधर्मी पदार्थाला मरण न यावें, व्ययधर्मी पदार्थाचा व्यय न व्हावा, आणि नाशवंत पदार्थाचा नाश न घडावा, असें ब्रह्मदेव देखील करू शकणार नाहीं! पण महाराज, अशा प्रसंगी अज्ञजन असा विचार करीत नाहीं, कीं, ‘माझ्याच आवडत्या मनुष्याला जरा, मरण, व्याधि येतात असें नाहीं; हा सर्व जगाचा धर्म आहे. प्राणिमात्र जरामरणानें ग्रासिले आहेत.,’ आणि महाराज, अज्ञ मनुष्याला याप्रमाणें यथार्थतया विचार करितां न आल्यामुळें शोक उत्पन्न होतो, त्याला व्यवसाय सुचत नाहीं, अन्न रुचत नाहीं, त्याची अगंकाति नष्ट होते, कामकाज बंद पडतें, आणि त्याचे शत्रु आनंदित होत असतात. आर्यश्रावकाची गोष्ट याहून भिन्न आहे. तो जराधर्मी जीर्ण झाला असतां, व्याघिधर्मी व्याधित झाला असतां, मरणधर्मी नाश पावला असतां यथार्थतया विचार करतो. प्राणिमात्र या विकारांनीं बद्ध झाले आहेत, असें पाहून तो शोक करीत नाहीं. तो आपल्या अंत:करणांतील विषारी शोकशल्य काढून टाकतो- ज्या शल्यानें विद्ध झाला असतां मूर्ख मनुष्य आपलीच हानि करून घेतो- पण अशा वेळी आर्यश्रावक शोकरहित होऊन निर्वाणमार्गाचा लाभ करून घेतो.”
« PreviousChapter ListNext »