Bookstruck

बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 27

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
"भिक्षुहो, एकादा भिक्षु आपल्या चित्ताचें यथार्थतया अवलोकन करितो. आपलें चित्त सकाम आहे किंवा निष्काम आहे; सद्वेष आहे किंवा विगतद्वेष आहे; समोह आहे किंवा वीतमोह आहे; संक्षिप्त आहे किंवा विक्षिप्त आहे; समाहित आहे किंवा असमाहित आहे; विमुक्त आहे किंवा अविमुक्त आहे, इत्यादि सर्व तो जाणतो. अशा प्रकारें आपल्या किंवा परक्याच्या चित्ताचें त्याला ज्ञान होतें. चित्त चंचल आहे, हें तो जाणतो. चित्त म्हणून कांही आहे याची त्याला स्मृति असते. केवळ स्मृति आणि ज्ञान मिळविण्यासाठीं तो कोणत्याहि पदार्थावर आसक्ति न ठेवता वागतो. याप्रमाणें भिक्षु चित्ताचें यथार्थतया अवलोकन करितो.

"भिक्षुहो, एकादा भिक्षु आपल्या मनोवृत्तींचें यथार्थतया अवलोकन करितो. तो कामविकार, द्वेषबुद्धि, आळस, अस्वस्थता आणि संशय ही पांच ज्ञानाची आवरणें आपल्या अंत:करणांत आहेत किंवा नाहींत, हें नीट पहातो. या आवरणांची उत्पत्ति कशी होते, हीं उत्पन्न झालीं असतां त्यांचा विनाश कसा करतां येतो, आणि पुन: त्यांचा उत्पाद न होण्याविषयीं उपाय कोणता, हें सर्व तो जाणतो. याप्रमाणें या पांच मनोवृत्तींचे तो यथार्थतया अवलोकन करितो.

"आणखी तो पंचस्कंधांचें यथार्थतया अवलोकन करितो. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या पांच स्कंधांचा उदय कसा होतो आणि अस्त कसा होतो, हें तो जाणतो. याप्रमाणें आभ्यंतर किंवा बाह्यस्कंधांचें तो यथार्थतया अवलोकन करितो.

"आणखी तो चक्षु, रूप इत्यादी आभ्यंतर आणि बाह्य आयतनांचें यथार्थतया अवलोकन करितो. चक्षु आणि रूप, कर्ण आणि शब्द, नासा आणि गंध, त्वचा आणि स्पर्श, मन आणि मनोवृत्ति, यांच्या संयोगाने कोणकोणती संयोजनें उत्पन्न होतात, यांजपासून उत्पन्न झालेल्या संयोजनांचा विनाश कसा होतो, व पुन: हीं संयोजनें उत्पन्न न होण्यास उपाय कोणता, हें तो जाणतो.

"आणखी तो सात बोध्यंगांचे यथार्थतया अवलोकन करितो. स्मृति, धर्मप्रविचय, वीर्य़, प्रीति, प्रश्नब्धि, समाधि आणि उपेक्षा, हे सात धर्म आपल्या अंत:करणांत आहेत किंवा नाहींत, हें तो जाणतो. नसलेल्या संबोध्यंगांचा उत्पाद कसा करितां येईल, व उत्पन्न झालेल्या संबोध्यंगाला भावनेच्या योगें पूर्णतेला कसें नेता येईल, हेंहि तो जाणतो. याप्रमाणे आभ्यंतर आणि बाह्यमनोवृत्तींचें तो यथार्थतया अवलोकन करितो.

"आणखी तो चार आर्यसत्यांचे यथार्थतया अवलोकन करितो. हें दु:ख आहे, हा दु:खाचा समुदय आहे, हा सुखाचा निरोध आहे, आणि हा दु:खनिरोधाचा मार्ग आहे, हें तो यथाभूततया जाणतो. याप्रमाणें तो आभ्यंतर आणि बाह्यवृत्तींचें यथार्थतया अवलोकन करितो.

"भिक्षुहो, या चार स्मृत्युपस्थानांची वर सांगितल्याप्रमाणें सात वर्षें भावना केली असतां भिक्षूला अर्हत्पदाचा लाभ होईल; निदान तो अनागामी होईल. (इहलोकीं त्याला जन्म घ्यावा लागणार नाहीं.) भिक्षुहो, सात वर्षें राहूं द्या; पण जर कोणी या स्मृत्युपस्थानांचें मोठ्या कळकळीनें पांच-चार-तीन-दोन-एक वर्ष-सात महिने-सात दिवस यथार्थतया चिंतन करील, तर त्याला अर्हत्पदाचा लाभ होईल; निदान तो अनागामी होईल.''

या बुद्धगुरूच्या उपदेशाचें भिक्षूंनी मुदित अंत:करणानें अभिनंदन केलें.
« PreviousChapter ListNext »