Bookstruck

बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 35

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
"भो गर्ग मन्तानिपुत्र! या बौद्धधर्मामध्यें तूं सुखानें रहा. मीदेखील वस्त्रान्न देऊन तुझी यथायोग्य शुश्रूषा करीन.''

परंतु अंगुलिमाल दुसर्‍याचें अन्न ग्रहण करत नसे. तो अरण्यांतच रहात असे, भिक्षेवरच आपला निर्वाह करीत असे, आणि रस्त्यांतील चिंध्या गोळा करून त्यांची तीनच चीवरें धारण करीत असें. तो राजाला म्हणाला "महाराज, मजजवळ सर्व कांहीं आहे. माझ्याबद्दल आपण काळजी करूं नका.''

पसेनदिकोसल बुद्धाला म्हणाला, "भगवन्, आम्ही दंडाने आणि शस्त्रानें देखील अंगुलिमालासारख्या माणसाचे दमन करूं शकत नाहीं. पण ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे, कीं, भगवान् दंडावांचून आणि शस्त्रांवांचून मदमस्त माणसांचे दमन करितों; भ्रांत मनुष्याला शांत करितो; आणि सामान्य माणसाला निर्वाणाला पोहोंचवितो! भगवन्, आमच्यामागें पुष्कळ कामें लागलेली आहेत, तेव्हां आम्ही आतां जातों.''

बुद्ध म्हणाला, "जसे तुला योग्य वाटेल तसें कर.''

पसेनदिकोसल बुद्धाला नमस्कार आणि प्रदक्षिणा करून जेतवनांतून निघाला.

एके दिवशीं अंगुलिमालानें श्रावस्तीमध्यें भिक्षाटन करीत असतां गर्भवेदनेनें विव्हल झालेल्या एका स्त्रीला पाहिलें. तिची त्याला अत्यंत दया आली, व भिक्षेचे ग्रहण केल्यावर बुद्धाजवळ येऊन त्यानें ती गोष्ट सांगितली.

बुद्ध म्हणाला, "तूं त्या स्त्रीजवळ जाऊन असें म्हण, कीं, माझ्या जन्मापासून मीं जाणूनबुजून प्राण्याची हिंसा केली नाहीं. या सत्यवचनानें तुला आणि तुझ्या गर्भाला सुख होवो.''

"पण भगवन्, मी जर असें म्हणालों, तर माझ्यावर खोटें बोलल्याचा आरोप येणार नाहीं काय? भगवन्, मीं जन्मल्यापासून बुद्धिपुरस्सर पुष्कळ प्राण्यांची हिंसा केली आहे.''

बुद्ध म्हणाला, "असे तर तुला वाटत असेल, तर तूं असें ह्मण, कीं, जोंपासून आर्यजातीमध्यें उत्पन्न झालों, तोंपासून मीं जाणूनबुजून कोणत्याही प्राण्याची हिंसा केली नाहीं. या सत्यवचनानें तुला आणि तुझ्या गर्भाला स्वस्ति असो.''

बुद्धाच्या म्हणण्याचा मथितार्थ काय होता हें आतां अंगुलिमालाच्या लक्ष्यांत आलें. आपण आर्यजातीमध्यें जन्मल्यापासून (भिक्षु झाल्यापासून) बुद्धिपुरस्सर कोणत्याही प्राण्याचा वध केला नाहीं, याजबद्दल त्याला खात्री होती. अंगुलिमाल ताबडतोब ती स्त्री होती तेथें गेला, व त्यानें बुद्धानें सांगितलेले शब्द उच्चारले. तेव्हां ती स्त्री प्रसूतिवेदनांतून सुखानें पार पडली.

अंगुलिमाल मोठ्या सावधगिरीनें आणि शांतपणानें एकाकी राहून अर्हत्पदाला पोहोंचला. तो भिक्षु झाल्याचे वर्तमान श्रावस्तिनगरांत सगळ्यांना समजलें होतें. एके दिवशीं भिक्षेला जात असतां लोकांनीं त्याच्यावर दगडांचा, काठ्यांचा आणि वाळूचा वर्षाव केला. त्यामुळें अंगुलिमालाचें डोकें फुटून रक्त वाहूं लागलें व संघाटी (कंथा) फाटून गेली. तसाच तो बुद्धापाशीं आला.

त्याला पाहून बुद्ध म्हणाला "हे ब्राह्मण! सहन कर- सहन कर! ज्या क्रूरकर्माचा विपाक नरकामध्यें हजारो वर्षे तुला भोगावा लागला असतां, त्याचेंच फल तूं इहलोकी थोडक्यात भोगीत आहेस!''

लोकांकडून झालेल्या अपमानानें किंवा शरीराला झालेल्या वेदनेनें अंगुलिमालाचें चित्त यत्किंचित् विचलित झालें नाहीं. एकांतांत बसला असतां तो आपणापाशींच उद्गारला "जो पूर्ववयांत प्रमत्त होऊन उत्तरवयांत सावध होतो, तो ढगांतून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणें प्रकाशत असतो! ज्याचें पापकर्म कुशलकर्मानें बुजून जातें, तो ढगांतून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणें प्रकाशत असतो, जो भिक्षु तरुणपणी बुद्धधर्माचा अभ्यास करितो, तो ढगांतून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणें प्रकाशत असतो! माझे शत्रुदेखील बुद्धाचा धर्म ऐकोत, माझे शत्रुदेखील बौद्धधर्माचा अभ्यास करोत! माझें नांव अहिंसक ठेवण्यांत आलें होतें, पण त्या नांवाप्रमाणें माझी करणी नव्हती! मी सदोदित हिंसा करीत असें; परंतु आज माझें नांव खरें झालें आहे. कांकी, मी सर्व हिंसेंपासून निवृत्त झालों आहें.''
« PreviousChapter ListNext »