Bookstruck

बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 46

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
सुनीध आणि वस्सकार यांना बुद्ध पाटलिग्रामाला आल्याचें वर्तमान समजल्यावर त्याजपाशीं जाऊन नवीन आवसथामध्यें त्याला व भिक्षुसंघाला त्यांनी आमंत्रण केलें. त्याप्रमाणें बुद्ध भिक्षुसंघासह तेथें गेला. सुनीध आणि वस्सकार यांनी स्वत: सर्व संघाचें संतर्पण केल्यावर बुद्धानें त्या दोघांच्या दानाचें अनुमोदन केलें, व तो पाटलिग्रामांतून कोटिग्रामाला जाण्यास निघाला. ज्या नगरद्वारानें बुद्ध बाहेर पडला, त्या नगरद्वाराला सुनीध आणि वस्सकार यांनी गौतमद्वार असें नांव दिलें.

त्या वेळीं गंगा तुडुंब भरून वहात होती. बुद्ध गंगेच्या कांठी येऊन पहातो, तर तेथें मोठी गडबड चालली होती. पार जाण्यासाठीं कोणी नौका शोधीत होते, तर कोणी होडी शोधीत होते, आणि कोणी ताफा बांधीत होते. बुद्ध या गर्दीत न शिरतां आणि ताफाबिफा बांधण्याच्या भानगडीत न पडतां आपल्या संघासह सुरक्षितपणें नदी पार उतरला, व परतीराला उभा राहून उद्गारला:-

*ये तरन्ति अण्णवं सरं सेतुं कत्वा विसज्ज पल्ललानि ।
कुल्लं हि जनो पबंधति तिण्णा मेधाविनो जना ।।
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*जे आर्याष्टांगिक मार्गाचा सेतु करून भवसमुद्र तरून जातात, त्यांनां पापकर्दमांत पडण्याची भीति नसते. हा भवसागर तरून जाण्यासाठीं पृथग्जन ह्मणजे सामान्य माणूस भलभलते प्रयत्न करितो. तो यज्ञयागादिक ताफ्यांचे किंवा देहदंडानादिक नावांचे स्तोम माजवितो; परंतु आर्यजन या मार्गाचें अवलंबन न करितां मध्यममार्गरूपी सेतूवरून सुखरूपपणें पार जातो, असा या श्लोकाचा भावार्थ आहे. त्याचें पद्यात्मक रूपांतर असें होईल:-
समुद्रसरितादिकां तरति सेतु बांधोनियां
अलिप्त जगतीं, नसे उदककर्दमें हानि यां;
पृथग्जन झटे, करी विविध नाव ताफा तरी,
भवाब्धि तरण्या, परी बुध न या पथां आदरी.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बुद्ध कोटिग्रामाला आल्यावर भिक्षूंनां म्हणाला "भिक्षुहो, दु:ख आर्यसत्य, दु:खसमुदय, आर्यसत्य, दु:खनिरोध आर्यसत्य, आणि दु:खनिरोधगामिमार्ग आर्यसत्य, या चार आर्यसत्यांचा बोध न झाल्यामुळें पुष्कळ काळपर्यंत आम्ही सर्वजण संसृतिपाशांत सांपडलों होतों; परंतु आतां या आर्यसत्यांचा बोध झाल्यामुळें आम्ही दु:खाचें मूळ खणून टाकिलें आहे, आणि आपण पुनर्जन्मापासून मपक्त झालों आहों.''

कोटिग्रामाहून बुद्धगुरु अनुक्रमें वैशालीला जाऊन पोहोंचला. वैशालींतील प्रसिद्ध गणिका आम्रपाली हिनें बुद्धाच्या आगमनाचें वर्तमान ऐकिलें, व मोठ्या लवाजम्यासह ती ताबडतोब बुद्धदर्शनाला गेली. बुद्धाची भेट घेऊन तिनें दुसर्‍या दिवशीं भिक्षुसंघासह त्याला आपल्या घरीं भोजनाला आमंत्रण करून ती निघून गेली.

बुद्ध आपल्या शहरांत आल्याचें वर्तमान ऐकून लिच्छवी देखील बुद्धदर्शनाला निघाले. वाटेंत त्यांनां आम्रपाली भेटली. त्यांनी विचारिलें "कायगे आम्रपाली, तूं आज घाईघाईनें कोठून येत आहेस?''
"आर्यपुत्रहो, मीं उद्यां माझ्या घरी बुद्धाला आणि भिक्षुंसघाला निमंत्रण केलें आहे. तेव्हां उद्यांची सिद्धता करण्यासाठी मी घाईनें जात आहें.'' आम्रपालीनें उत्तर दिलें.

लिच्छवी म्हणाले "आम्रपाली, उद्यां तुझ्याऐवजीं बुद्धाला आह्मीच भोजन देतों, व तूं केलेल्या आमंत्रणाबद्दल आम्ही तुला एक लाख कार्षापण देतों.''
« PreviousChapter ListNext »