Bookstruck

बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 51

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
"आनंद, आतां तूं कुसिनारा शहरांत जाऊन मल्लांनां सांग, कीं, तथागत तुमच्या राज्यांत राजधानीच्या शेजारीं परिनिर्वृत होणार आहे; जर त्याचें शेवटचें दर्शन घेण्याची तुमची इच्छा असेल, तर चला. मागाहून आम्हांला ही बातमी समजली नाहीं, याजबद्दल पश्चात्ताप करूं नका.''

त्या वेळीं कुसिनारेंतील मल्ला कांही कारणासाठी आपल्या संथागारांत जमले होते. आनंदानें त्यांनां बुद्धाचा निरोप कळविला, तेव्हां ते आपल्या मुलांबाळांसह शोकसागरांत बुडून गेले. `बुद्धगुरु लवकर परिनिर्वृत होत आहे! धर्मसूर्य लवकर मावळत आहे!' असें जो तो म्हणूं लागला.

नंतर तेसर्व मल्ल आपल्या बायकांमुलांसह बुद्धाचें शेवटलें दर्शन घेण्यासाठीं शालवनांत गेले. प्रत्येक मल्लानें बुद्धाला क्रमश: नमस्कार केला असता, तर ती सारी रात्र त्यांच्या नमस्कारविधींतच गेली असती! तेव्हां आनंदानें मल्लाच्या कुळांतील जे मुख्य होते, त्यांनां पुढें आणून नमस्कार करावयाला लाविलें व `भगवन्, हा अमुक मल्ल आपल्या मुलांबाळांसह आणि चाकरनोकरांसह आपणाला नमस्कार करीत आहे,' अशा शब्दानें त्यांची बुद्धाला ओळख करून दिली.
त्या वेळीं सुभद्र नांवाचा एक परिव्राजक कुसिनारेंत रहात होता. त्या दिवशीं पहांटेला बुद्धाचें परिनिवार्ण होणार आहे, हें वर्तमान जेव्हां त्याला समजलें, तेव्हां तो तसाच शालवनांत आला, आणि आनंदाला म्हणाला "आनंद, तथागताचा उत्पाद इहलोकीं क्वचित् होत असतो, असें मी ऐकिलें आहे; आणि आजची रात्र संपण्यापूर्वी आपल्या गुरूचें देहावसन होणार, ही गोष्ट देखील माझ्या कानीं पडली आहे. तेव्हां थोडक्यांत जे काय सांगावयाचें तें सांगून गौतम माझी शंका निवारण करील काय?''

आनंद म्हणाला "हे सुभद्र, या वेळी तूं तथागताला त्रास देऊं नकोस. तथागत फार थकला आहे.''

हा सुभद्राचा आणि आनंदाचा संवाद ऐकून बुद्ध म्हणाला "आनंद, सुभद्राला प्रतिबंध करूं नकोस; त्याला तथागताचें दर्शन घेऊं दे. तो जिज्ञासु आहे. तो जे मला प्रश्न विचारणार आहे, ते मला त्रास देण्यासाठीं नसून आपणाला तत्त्वबोध व्हावा याच इच्छेनें विचारणार आहे; आणि माझ्या भाषणाचा इत्यर्थ तो ताबडतोब समजणार आहे.''

आनंदानें सुभद्राला बुद्धाजवळ जाण्यास मोकळीक दिली. तेव्हां बुद्धानें त्याला थोडक्यांत उपदेश केला. तो ऐकून सुभद्र बुद्धाला, धर्माला आणि संघाला शरण गेला, व आपणाला भिक्षुसंघांत घेण्यास त्यानें विनंति केली.

बुद्ध म्हणाला "हे सुभद्र, जो दुसर्‍या पंथाचा श्रमण असेल, त्याला चार महिनेपर्यंत आह्मी आमच्या संघांत न घेतां एखाद्या भिक्षूच्या स्वाधीन करितों, आणि त्याचें वर्तन जर समाधानकारक आहे असें वाटलें, तर चार महिन्यांनंतर भिक्षु त्याला प्रव्रज्या देऊन संघांत घेतात.''

सुभद्र म्हणाला "भगवन्, जर इतर पंथांच्या श्रमणाला चार मिहने वाट पहावी लागते, तर मी चार वर्षेपर्यंत प्रव्रज्या न घेतां भिक्षुपाशीं रहावयाला तयार आहें. माझें आचरण योग्य आहे, असें आढळून आल्यास चार वर्षांनंतर भिक्षु मला आपल्या संघांत घेवोत.''

तेव्हां सुभद्राला बुद्धानें आनंदाच्या स्वाधीन केलें, व यथाविधि त्याला प्रव्रज्या वगैरे देण्यास सांगितलें.
« PreviousChapter ListNext »