Bookstruck

*संघ 11

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
शुभा भिक्षुणी एके दिवशी जीवक वैद्याच्या आम्रवनास एकटीच जात होती. वाटेंत तिला एका लबाड मनुष्यानें गांठलें. तिच्या सुंदर रूपाकडे पाहून तो भुलून गेला, आणि आपली दृष्ट वासना तृप्त करण्यासाठीं तिचें मन वळवूं लागला. तिनें त्याला अनेक प्रकारें उपदेश केला; परंतु त्या कामांध माणसावर त्याचा कांहीएक परिणाम झाला नाहीं. शेवटीं तो बलात्कार करण्यास सुद्धां तयार आहे असें जेव्हां शुभेला दिसून आलें, तेव्हां ती त्याला म्हणाली “अरे, तूं मला कां अडवीत आहेस?” तो पुन: तिच्या नेत्रादि सुंदर अवयवांचे वर्णन करूं लागला, आणि म्हणाला “हे सुंदरि, हें तुझें सुंदर नेत्रयुग्म पाहून मी कामविकारानें पीडित झालों आहें. सुंदरि, तुझ्यावांचून प्रियतर असें मला या जगामध्यें कांही नाहीं.” शुभा म्हणाली, “एवढेंच ना? या माझ्या डोळ्यांचीच तुला गरज. कांही हरकत नाहीं. घे हा डोळा.” असें म्हणून बोटानें डोळा उपटून तो तिनें त्याच्या हातावर ठेवला. हें तिचें साहसी कृत्य पाहून तो मनुष्य घाबरून गेला, आणि त्यानें तिला साष्टांग प्रणिपात करून तिची क्षमा मागितली. भिक्षुणींवर अशा प्रकारचें प्रसंग येऊं नयेत एवढ्याचसाठीं त्यांनीं एकाकी राहूं नये, असा बुद्धानें नियम केला असला पाहिजे.

भिक्षुसंघात जसे सारिपुत्त, कात्यायनदिक थोर तत्त्वज्ञानी आणि धर्मोपदेशक होऊन गेले, तशाच भिक्षुणीसंघात क्षेमा, उत्पलवर्णादिक भिक्षुणी होऊन गेल्या. कित्येक प्रसंगी मोठमोठ्या विद्वान् पुरुषांनांहि त्यांनीं आपल्या अधिकारयुक्त वाणीने उपदेश करून सन्मार्गाकडे वळविल्याच्या गोष्टी त्रिपिटकांत आढळतात. त्यांतील एक गमतीची गोष्ट कांही पालिगाथांसह येथें सांगून आजचा हा लांबलेला विषय आटोपतों.

पण्णिका नांवाची भिक्षुणी पहाटेस उठून विहारांतील भिक्षुणींच्या उपयोगासाठीं पाणी आणण्यास नदींवर गेली होती. तेथें एक ब्राह्मण प्रात:स्नान करीत होता. त्याला पाहून ती म्हणाली:-

उदहारी अहं सीते सदा उदकमोतरिं।
अय्यानं दण्डभयं भीता वाचादोसभयट्टिता।।
कस्स ब्राह्मणं त्वं भीतो सदा उदकमोतरि।
वेधमानेहि गत्तेहि सीतं वेधयसे भुसं।।


या थंडीमध्यें भिक्षुणीसंघाच्या भयानें (मला दोष देतील या भयानें) पाणी नेण्यासाठीं मी या पाण्यांत सदोदित उतरतें. परंतु हे ब्राह्मणा, या तुझ्या थंडीनें आंखडून गेलेल्या गात्रांनीं तूं या पाण्यांत कोणाच्या भयानें सदोदित उतरतोस? थंडीनें तूं आंखडलेला दिसतोस?

ब्राह्मण म्हणाला:-

जानन्तीव तुवं भोति पुण्णिके परिपुच्छसि।
करोन्तं कुसलं कम्मं रुंधन्तं कम्मं पांपकं।।
यो च वुड्ढो दहरो वा पापं कम्मं पकुब्बति।
दकाभिसेचना सोपि पापकम्मा पमुच्चति।।

मी पुण्यकर्म करीत आहें, आणि पापकर्माचा निरोध करतों आहें, हें जाणत असतां, भवति पुण्णिक, तूं हा प्रश्न कसा विचारतेस? जो कोणी म्हातारा किंवा तरुण पाप करितो, तो प्रात:स्नानानें त्या पापापासून मुक्त होतो. (हें तुला ठाऊक नाहीं काय?)
« PreviousChapter ListNext »