Bookstruck

*संघ 20

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
‘‘हे गृहपतिपुत्र! (१) घरीं आल्यावर कांहींना कांही घेऊन जाणारा, (२) शब्दांनीच उपकार करूं पहाणारा, (३) हांजी हांजी करणारा व (४) पापकर्मात साहाय्य करणारा, हे चार आपले हितशत्रु आहेत असें समजावें व त्यांचा बिकट मार्गाप्रमाणे दुरूनच त्याग करावा. (१) उपकार करणारा, (२) दु:खानें दु:खीं व सुखानें सुखी होणारा, (३)  सदुपदेश करणारा, व (४) अनुकंपा करणारा, असे हे चार आपले खरे मित्र असें समजावें, व आई जशी आपल्या मुलाची जोपासना करते, तशी या मित्रांची जोपासना करावी.

हे गृहपतिपुत्र! हें पूर्वकृत्य झाल्यावर तरुण गृहस्थानें सहा दिशांच्या पूजेस लागावें. त्या सहा दिशा कोणत्या तें सांगतों. आईबापांना पूर्वदिशा समजावें; गुरूला दक्षिणदिशा समजावें; पत्नीला पश्चिमदिशा समजावें; आप्तमित्रांस उत्तरदिशा समजावें; सेवकांना खालची दिशा समजावें, आणि श्रमण ब्राह्मणांला म्हणजे साधुसंतांना वरची दिशा समजावें.

‘‘पूर्वदिशा जे आईबाप त्यांची पांच गोष्टींनी पूजा करावी:-
(१) त्यांचे काम करावें; (२) त्यांचे पोषण करावें; (३) कुलांत चालत आलेलीं सत्कार्ये चालू ठेवावीं; (४) त्यांच्या वचनांत वागून त्यांच्या संपत्तीचे वांटेकरी व्हावें, आणि (५) जर त्यांपैकीं कोणी जिवंत नसेल, तर त्यांच्या नांवें दानधर्म करावा, या पांच गोष्टींनी जर आईबापांची पूजा केली तर ते पांच प्रकारांनी मुलांवर अनुग्रह करितात:- (१) पापापासून निवारण करितात; (२) कल्याणकारक मार्गास लावितात; (३) कलाकौशल्य शिकवितात; (४) योग्य स्त्रीशी लग्न करून देतात, व (५) योग्य वेळीं आपली मिळकत स्वाधीन करितात. याप्रमाणें केलेलीं पूर्वदिशेची पूजा कल्याणकारक होते.

‘‘दक्षिण दिशा जे गुरू त्यांची शिष्यानें पांच गोष्टीनीं पूजा करावी:-
(१) गुरू जवळ आले तर उठून उभें राहावें; (२) ते आजारी असले तर त्यांची सेवा करावी; (३) श्रद्धापूर्वक ते शिकवितील तें समजावून घ्यावें; (४) त्यांचे कांहीं काम पडल्यास तें करावें; आणि (५) ते शिकवितील तें उत्तम रीतीनें शिकावें. या पांच गोष्टींनी जर शिष्यानें गुरूंची पूजा केली, तर ते पांच प्रकारांनी शिष्यावर अनुग्रह करितात:- (१) चांगला आचार शिकवितात; (२) चांगल्या रीतीनें कलाकौशल्य शिकवितात; (३) जें कांहीं त्यांनां येत असेल तेवढें सारें ते शिष्याला शिकवितात; (४) आपल्या आप्तमित्रांत त्याची स्तुति करितात; आणि (५) त्याला कोठें गेला तरी पोटापाण्याची अडचण पडूं नये अशी विद्या शिकवितात. याप्रमाणें पांच गोष्टींनीं शिष्यानें केलेली गुरूंची पूजा पांच प्रकारांनी फलप्रद होते.

‘‘हे गृहपतिपुत्र! पांच गोष्टींनीं पतीनें पश्चिम दिशा जी पत्नी तिची पूजा करावी:- (१) तिला मान द्यावा; (२) कोणत्याहि तऱ्हेनें तिचा अपमान होऊं देऊं नये; (३) अन्य स्त्रीशी संबंध ठेवूं नये (एकपत्नीव्रत आचरावें); (४) घरचा कारभार तिच्यावर  सोंपवावा; आणि (५) तिला वस्त्राच्छादनाची कमतरता पडूं देऊं नये. या पांच गोष्टींनीं जर पतीनें पत्नीची पूजा केली तर ती पतीस पांच प्रकारांनीं उपकारक होते:- (१) घरात चांगली व्यवस्था ठेवते; (२) नोकरचाकरांला प्रेमानें संभाळते; (३) पतिव्रता होते; (४) पतीनें मिळविलेल्या संपत्तींचे रक्षण करिते (उधळेपणा करीत नाहीं); आणि (५) सगळ्या गृहकृत्यांत उद्योगी आणि दक्ष होते. याप्रमाणें जर पतीनें पश्चिमदिशा जी भार्या तिची पूजा केली तर ती त्याला सुखावह होते.
« PreviousChapter ListNext »