Bookstruck

कुमारांकडून अपेक्षा 13

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पूज्य विनोबा वर्ध्यांच्या 9 ऑगस्टच्या मागील वर्षीच्या सभेत म्हणाले, 'कवींना नि कादंबरीकारांना कित्येक वर्षे पुरेल इतका मालमसाला ४२ च्या चलेजावच्या लढाईने दिला आहे.'  महाराष्ट्रातले किती प्रसंग! करूण नि गंभीर!  तो कोवळा शिरीषकुमार, तो भगवान भुसारी; ते वीरशिरोमणी भाई कोतवाल; ते वसंत दाते नि कमलाकर दांडेकर, ते नऊ गोळया खाऊन मरणारे परशराम पहिलवान, तो सातारचा आयुर्वेद निद्यार्थी पेंढारकर रानात अज्ञातवासात टायफाईडने देवाघरी गेला; रत्नागिरी जिल्ह्यातील सब-इन्स्पेक्टरच्या हातातील पिस्तुल धरणारी पुत्रवत्सल वृध्द माता! वसंत पाटील वगैरेचे सांगलीच्या तुरुंगातून ते रोमांचकारी निसटून जाणे!  तो सिंधमधील हेमू!  तो फांशी गेलेला नागपूरचा विष्णू!  पाटण्याचा तो युसुफ!  आणि चिमूर ! आणि आगाखान राजवाडयातील अनंत अर्थ मुकेपणाने सांगणा-या त्या दोन समाधी;  महात्माजींचा तेथील उपवास; सरकारने त्यासाठी जमवून ठेवलेले चंदन; आणि महात्माजी गेले तर तत्काळ लाखो गुप्त पत्रके काढून हिंदुस्थानला सांगता आले पाहिजे म्हणून डोळयांतून अश्रू ढाळीत जयप्रकाशांनी लिहून ठेवलेले ते बुलेटीन!  मित्रांनो, सारा रक्ताचा नि अश्रूंचा हा इतिहास तुमच्यासमोर आहे. एखादा ईश्वरी देण्याचा श्री. शंकरराव निकमांसारखा थोर शाहीर, एखादा उदयोन्मुख प्रतिभाशाली वसंत बापट या भावनांना वाचा देत आहे. परंतु तुमचे सर्वांचे काय ? उसळतात का सर्वांच्या भावना ? पेटते का हृदय ? ते भीषण दुष्काळ आणि नौखाली हत्याकांड-आणि आज आगीत अमृतकुंभ घेऊन तेथे गेलेले राष्ट्राचे प्राण महात्माजी !

आणि ती आझादसेना!  ते नेताजी! ती त्यांची वाणी, तो त्याग, ते कष्ट, ते ध्येयसमर्पण!  तो चलो दिल्ली, जयहिंद नाद!  माझे एक मित्र श्री. सितारामभाऊ चौधरी नुकतेच हिमालयांतून कैलास मानससरोवर वगैरे पाहून आले. ते म्हणाले,' कैलासावरही जयहिंद शब्द कोरलेला दिसला!'  जणु भारताचे रक्षण करणारा शिवशंकर डमरू वाजवून जयहिंद गर्जत आहे !

मित्रांनो, पृथ्वीमोलाचे प्रसंग. मढयांना उठवणारे, पाषाणांना  पाझर फोडणारे, पर्वतांचा वाचा देणारे, आकाशाला गहिवरणारे, विश्वाला हदरवणारे प्रसंग. परंतु कोण बघतो ? तंत्रीला बोटाचा स्पर्श होताच तिच्या तारात कंप उत्पन्न होऊन तिचे संगीत दूरवर जाते. ती लहानशी तंत्री विश्वाच्या हृदयाला भेटते. तुमच्या हृदयतंत्रीच्या हजारो तारांना या भावनांचा स्पर्श होतो का ? जेव्हा कलावानाच्या आत्म्यावर स्पंदने होतात, आघात होतात, तेव्हा त्या स्पंदनातून जे निर्माण होते ते जगाचे होते. ते व्यक्तीचे रहात नाही. ते उद्गार महान होतात. त्यांना अमरता येते. हेच सौंदर्य. सौंदर्य ही एकच गोष्ट दिक्कालातीत आहे. त्या त्या वेळची ध्येये बदलतात. परंतु त्या त्या वेळच्या ध्येयासाठी जे त्याग, जी बलिदाने, वनवास भोगावे लागतात, त्यातील भव्यता ही सदैव वंदनीयच असते. म्हणून रामायण, महाभारत आजही हृदयांवर सत्ता गाजवीत आहे.

परंतु लक्षात ठेवा की, रामायण-महाभारत एकदाच लिहिले जात नाही;  रचिले जात नाही. ते नेहमी रचिले जात असते. राष्ट्र स्वतंत्र असो वा परतंत्र. राष्ट्राचे चारित्र्य सतत घडत राहिलेच पाहिजे. आज पारतंत्र्यातही पृथ्वी मोलाची माणसे गेल्या शंभर-पाऊणशे वर्षात आम्ही  जितकी दिली, तितकी स्वतंत्र देशांनीही दिली नसतील. ज्या पारतंत्र्यात इतकी नररत्ने निर्माण झाली त्या पारतंत्र्यासही प्रणाम करावासा वाटतो.

« PreviousChapter ListNext »