Bookstruck

सलाम अशा शिक्षकांना

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रात्रशाळेत उजेड आणता-आणता ‘त्यांच्या’ आयुष्यात काळोख!

शाळेचे मुख्याध्यापक, क्लार्क अन् साफसफाई करणारे शिपाईही तेच, अशी तिहेरी भूमिका पार पाडणारे महापालिका रात्रशाळेतील प्रभारी मुख्याध्यापक एस. एच. काझी हे गेल्या २० वर्षांपासून २३९६ रुपये इतक्या तुटपुंज्या पगारावर राबत आहेत. सध्या शासनाच्या वतीने शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धडपड सुरू आहे; तर दुसरीकडे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणारे काझी यांची मात्र महापालिकेच्या उदासीन भूमिकेमुळे परवड होत आहे.

कोल्हापुरात १९६१ मध्ये महापालिकेच्या राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या इमारतीत कर्मवीर भाऊराव पाटील रात्र प्रशालेची सुरुवात झाली. येथे आठवी ते दहावीपर्यंत सायंकाळी सात ते दहा वेळेत वर्ग भरतात. या शाळेत १९९५ ला एस. एच. काझी हे सहायक शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यावेळी शासनाच्या अनुदानासह आठवी ते दहावीपर्यंतच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या चांगली होती. एक मुख्याध्यापक, पाच शिक्षक, एक लिपिक, दोन शिपाई असा स्टाफ होता. मात्र, या शाळेकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत गेले. शाळेच्या खर्चाचे वेळेत कधी लेखापरीक्षणच केले गेले नाही. त्यामुळे अनुदानाची रक्कम जमा होणे बंद झाले. सर्व गोष्टींवर याचा परिणाम होऊ लागला. यादरम्यानच काही शिक्षक, लिपिक व शिपाईही निवृत्त झाले.

पर्यायाने २००८ ला एस. एच. काझी यांची प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, ते शाळेत एकमेव उरल्याने त्यांच्यावरच कामांची सर्व जबाबदारी आली. आपण शाळा सोडून गेलो तर शाळाच बंद पडणार, ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी गेली आठ वर्षे पडेल ते काम करीत शाळा टिकविण्यासाठी धडपड सुरू केली. त्यांनी प्रथम शाळेचे लेखापरीक्षण करून घेतले. त्यामुळे २८ लाखांचे अनुदान मंजूर झाले. मात्र, अनुदान घेण्यासाठी लागणाऱ्या काही अटींची पूर्तता महापालिका प्रशासनाने न केल्यामुळे अनुदान शाळेला मिळालेच नाही. महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने काझी नियमित महापालिका प्रशासनाकडे अनुदानाच्या अटींची पूर्तता करण्यासाठी धाव घेत आहेत. मात्र, त्यांची कोणीच साधी दखलही घेत नाहीत. यावर्षीच्या सुरुवातीपासून (२९ जानेवारी २०१५) सुभाषनगर येथील संत रोहिदास विद्यामंदिर येथे ही शाळा भरत आहे.

या शाळेत सध्या २२ विद्यार्थी आहेत. ८ वीमध्ये ६, ९वीमध्ये ११ व १० वीमध्ये ५ विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये हॉटेल, सेंट्रिंग कामगार व रिक्षाचालकांचा समावेश आहे. १९९४-९५ पर्यंत प्रत्येक वर्गात सरासरी ३८-४० विद्यार्थी असायचे. २०१०-११ दरम्यान ही संख्या १५ ते १६ वर येऊन थांबली. शिक्षकांची संख्या कमी झाल्याने विद्यार्थी संख्याही घटत गेली.

काझी यांनी मराठी, हिंदी आणि समाजशास्त्र या तीन विषयांतून एम.ए. पूर्ण केले आहे. तसेच एम. एड., एम. फिल. या पदव्युत्तर पदव्याही घेतल्या आहेत. तसेच पुणे येथून ‘हिंदी पंडित’ ही पदवीसुद्धा त्यांनी घेतली आहे. तरीही काझी यांना गेली वीस वर्षे महिन्याला फक्त दोन हजार ३९६ रुपये इतकाच पगार मिळतो. शाळा उघडण्यापासून ती झाडणे, विद्यार्थ्यांना शिकविण्यापासून त्यांची शैक्षणिक कागदपत्रे तयार करण्याचे काम ते एकटेच करीत आहेत.

काझी शाळेच्या अनुदानाच्या कामासाठी जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेतील कोणत्याही कार्यालयात गेल्यानंतर त्यांची ‘नाईट स्कूल आले’ असे संबोधून टर उडविली जाते. मात्र, काझी यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, गरीब विद्यार्थ्यांना काम करता-करता शिकता यावे, याच मुख्य हेतूने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आपले काम सुरूच ठेवले आहे.

समाजातील वंचित व उपेक्षित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने ही रात्रशाळा सुरू आहे. या ठिकाणी मी एकटाच शिक्षक कार्यरत आहे. शासनाचे अनुदान मिळण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न करण्यासाठी अनेक वेळा प्रशासनाची दारे ठोठावली; मात्र कोणीच माझी दखल घेत नाही.

- एस. एच. काझी, प्रभारी मुख्याध्यापक

प्रदीप शिंदे- कोल्हापूर ( लोकमत )

« PreviousChapter ListNext »