Bookstruck

Mulholland Drive

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

डेव्हिड लिंच ह्या अवलिया अमेरिकन दिग्दर्शकाबद्दल मी कधी तरी विस्ताराने लिहीन. कारण हि व्यक्ती आहेच तशी प्रतिभाशाली. डेव्हिड लिंच ह्यांनी अमेरिकन टीव्ही वर ट्वीन पिक्स नावाची एक मालिका आणली. मैलाचा दगड वगैरे विशेषणे आम्ही काही महत्वाच्या घटनांना वापरतो. पण ट्वीन पिक्स हा टीव्ही कलाक्षेत्रांतील मैलाचा दगड नव्हता तर डेविड लिंच ह्यांनी थिल्लर डेली सोप चा डोंगर फोडून त्यावर कथानक, चरित्र निर्माण ह्यांचा डांबर टाकून जो जबरदस्त एक्सप्रेस वे बनवला तो थेट आम्हाला आजच्या नेटफ्लिक्स, प्राईम इत्यादींच्या दुनियेत घेऊन आला. ट्वीन पीक ची स्तुति करताना मी थकत नाही म्हणून माझ्या अनेक आप्तस्वकीयांनी हल्ली काय बघतेस हा प्रश्नच मला विचारायचे टाळले आहे. ट्विन्स पिक्स चे एपिसोड्स मी वारंवार बघते. पण हा लेख ट्वीन पिक्स चा नाही.

डेव्हिड लिंच हे एक वेदांती आहेत. महेश योगी ह्यांच्या संपर्कांत ते आले आणि त्यांच्या ट्रान्स्डेनटल मेडिटेशन चे सिद्ध बनले. फक्त मेडिटेशन वर न थांबता त्यांनी वेदांताचा अभ्यास केला आणि मन, आत्मा, आपले अस्तित्व ह्याच्यावर खोल विचार केला. खरे तर त्यांना चित्रपट क्षेत्रांतील काहीही ठाऊक नव्हते. ते होते पेंटर. पण तिथे सुद्धा काही तरी भलतेच करायचा त्यांचा होरा. त्यांना हलणारी पेंटिन्स बनवायची होती, मग कुणी तरी त्यांना म्हटले कि अश्या पेंटिंग्स ना व्हिडीओ म्हणू शकतो ना ? अरेच्य्या हा विचार तर मी केलाच नाही म्हणून ते व्हिडिओ ह्या माध्यमाकडे हलणारी पेंटिंग्स म्हणून पाहू लागले. ह्या भलत्याच दृष्टिकोनामुळे सर्वसाधारण दिग्दर्शिका प्रमाणे कथा, स्क्रिप्ट, स्टोरीबोर्ड हे प्रकार त्याना विशेष नव्हतेच. सर्व काही ते आपल्या इन्स्टिंक्ट वर अवलंबून करायचे.

ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे त्यांच्या कलाकृती ह्या फक्त मनोरंजक किंवा भावनिक नाहीत, पण तुमच्या मनातील खोलवर दडलेल्या अंतर्मनाला, थेट आत्म्याला माझ्या मते एक अध्यात्मिक दृष्टिकोनातून हात घालतात. मी अतिशयोक्ती करते असे कुणाला वाटेल पण असे अजिबात नाही. ट्विन्स पिक्स आणि माझा काही तरी आत्मीय संबंध आहे हे त्याची क्रेडिट्स रोल होतानाच मला समजले होते ! त्यांच्या कलाकृती तुमच्या मनावर खरेखुरे गारुड करू शकतात असे माझेच नाही तर अनेकांचे मत आहे.

ह्या लेखात मी ज्या चित्रपटाचा वेध घेणार आहे तो आहे लिंच ह्यांचा लोकप्रिय आणि अवॉर्ड जिंकणारा "मुल्लाहलँड ड्राईव्ह".

वैधानिक सूचना : हा चित्रपट एकतर तुम्हाला आवडेल नाहीतर तुम्ही मला असंख्य शिव्या द्याल. मधली गोष्ट शक्यच नाही. चित्रपट तुम्हाला आवडला तरीसुद्धा नक्की का आवडला हे तुम्ही व्यक्तच करूच शकणार नाही.

चित्रपटाचे टायटल जे आहे ते हॉलिवूड मधील एका खऱ्या रस्त्यावरून घेतले आहे. ह्या चित्रपटाची खासीयत म्हणजे मी तुम्हाला स्पॉयलर्स देऊच शकत नाही कारण ज्यांनी हा चित्रपट १० वेळा पहिला त्यांना सुद्धा समजला नाही तर तुम्हाला वाचून डोंबल समजणार ? चित्रपट पाहायलाच असेल तर किमान ३-४ वेळा तुम्हाला पाहावा लागेल आणि तो सुद्धा विकिपीडिया वगैरेची मदत घेऊन.

चित्रपटाची सुरुवात होते एका कार अपघाताने. Mulholland Drive ह्या रस्त्यावर हा अपघात होतो आणि वाचते कोण तर फक्त काळ्या केसांची एक सुंदरी. तिची स्मरणशक्ती जाते आणि ती ह्या डोंगरावरील रस्त्याने खाली येत एका अपार्टमेंट मध्ये घुसते. हे अपार्टमेंट आहे बेट्टी हाय सुवर्णकेशी मुलीचं (नाओमी वॉट्स),. ती हॉलिवूड मध्ये नटी बनण्याचं स्वप्न घेऊन आली आहे. ती जिंव्हा परत येते तेंव्हा आपल्या घरांत एका भलत्याच मुलीला पाहून घाबरते. तिला फक्त आपले नाव रिटा ठाऊक असते.

गैरसमज दूर झाल्यावर बेट्टी आणि रिटा, रिटा नक्की कोण आहे ह्याचा छडा लावण्याचा निर्धार करतात. रिटा च्या पर्स मध्ये त्यांना एक गूढ अशी निळ्या रंगाची चावी आणि खूप पैसे सापडतात. रिटा हे तिचे खरे नाव नसते.

तुम्हाला वाटले असेल साधी सोपी कथा तर आहे. पण इतक्यांत ट्रॅक बदलतो. विंकीस डायनर मध्ये दोन व्यक्ती बोलत आहेत. त्यातील एक व्यक्ती सांगते कि मी एक भयानक स्वप्न बघितले जयंत एक भयानक व्यक्ती येते आणि त्याचा चेहरा पाहून मी इतका घाबरतो कि मी मरतो. दुसरी व्यक्ती त्याच्या बोलण्याला गांभीर्याने घेत नाही आणि पुढील काही मिनिटांत सर्व काही तसेच घडते आणि बोलणारी व्यक्ती मरण पावते.

https://www.youtube.com/watch?v=UozhOo0Dt4o

त्याच वेळी ऍडम ह्या दिग्दर्शकाला माफीया लोक सांगतात कि त्यांनी कामिला नावाच्या महिलेला नटी म्हणून घेतले पाहिजे. तो साफ नकार देतो. तो घरी येतो तेंव्हा पाहतो कि त्याची पत्नी आणखी कुणासोबत सेक्स करत आहे. ऍडम एका काव्बॉय ची मदत घेतो पण हा गूढ कॉवबॉय त्याला सांगतो कि माफिया लोकांचे ऐकण्यात त्याचे हित आहे. आणि ह्याच वेळी कुठेतरी एक डायरी मिळवण्यासाठी एक किलर अनेक लोकांचे खून करतो.

ह्या घटनांचा एकमेकांशी आणि कदाचित चित्रपटाशी सुद्धा काहीही संबंध नाही. कि आहे ?

रिटा आणि बेट्टी विंकीज मध्ये जेवण्यास येतात आणि रिटा ला आठवते कि तिचे नाव डीयान आहे. त्यावरून त्यांना फोन नंबर डिरेक्टरी मधेय सापडतो आणि त्या दोघी फोन करतात पण कुणी उचलत नाही. त्या दोघी पत्ता शोधून तिच्या घरी जातात. तिथे त्यांना सांगण्यात येते कि डियन ने आपले अपार्टमेंट शेजार्याला देऊन त्याचे अपार्टमेंट आपण घेतले आहे. ह्यावरून दोघी त्या शेजाऱ्याचे अपार्टमेंट मध्ये गुपचूप घुसतात. तिथे एक मृत महिलेचे शरीर कुजत पडले आहे. ते पाहून दोघेही घाबरतात आणि बेट्टीच्या घरी परत येतात. त्या रात्री दोघीजणी सेक्स करतात.

आता वर मी ज्या ऍडम ची गोष्ट लिहिली त्याच ऍडम च्या ऑडिशन साठी बेट्टी जाते आणि ती अत्यंत छान अभिनय करते पण ऍडम माफिया च्या सल्ल्याला धरून कामिला ला रोल देतो पण बेट्टी त्याच्या मनात भरते.

इथपर्यंत किमान चित्रपट समजतो तरी. पण ह्याच्या पुढे रोलर कोस्टर आहे. मला जितके समजले तितकेच लिहिले आहे.

रिटा अचानक उठते आणि म्हणते कि आम्हाला क्लब सिलेंसीओ मध्ये जायला पाहिजे. तिथे दोघी जातात. तिथे सर्व काही विचित्र आहे. तेथील निवेदक काहीतरी बडबडतो. तिथे विशेष ग्रिड सुद्धा नाही. एक गायिका गायन करते. त्याच वेळी बेट्टी आपली पर्स उघडते तर त्यांत तीला एक बॉक्स सापडते. गायिका अचानक जमिनीवर पडते.

दोघीजणी घरी येतात आणि रिटा ला बेट्टी च्या पर्स अधिक निळी पेटी सापडते आणि बेट्टी अचानक गायब होते. आपली चावी वापरून रिटा बॉक्स उघडते पण बॉक्स खाली पडतो आणि रिटा सुद्धा गायब होते. इथे घरमालिका रूथ आंत येते आणि तिला अपार्टमेंट मध्ये कुणीच सापडत नाही. म्हणजे रिटा आणि बेट्टी दोन्ही गायब.

अचानक डियन अचानक झोपेतून उठते. तिचे अपार्टमेंट तेच आहे जिथे आधी रिटा आणि बेट्टीला मृत शरीर सापडले होते. पण डियन रिता सारखी दिसत नाही तर बेट्टी सारखी दिसते. आणि तिचे प्रेम कामिला वर आहे जी हुबेहूब रिटा सारखी दिसते.

Mulholland Drive वर ऍडम चे घर आहे आणि इथे अचानक डियन पोचते. तिथे कामिला आणि ऍडम ने पार्टी ठेवली आहे आणि त्यांचे लग्नाची बातमी ते जाहीर करणार आहेत. इथे कामिला म्हणजे आधीची रिटा आहे. आणि आधीची कामिला सुद्धा तिथे आणखीन एका रूपांत आहे. ऍडम आणि कामिला ह्यांच्या लागणी घोषणा ऐकून डियन ला रडू कोसळते आणि ती विंकीस डायनर मध्ये जाऊन एका हिटमॅन ला म्हणजे जो आधी दाखवला होता त्याला भेटून त्याला कामिला ला मारण्याची सुपारी देते. काम होताच तुला मी एक निळी किल्ली देईन असे सांगून तो जातो.

आधी स्वप्नातील खुनाची गोष्ट जे दोघे लोक करत होते आणि त्यांत ते एका भयानक चेहेर्याची गोष्ट करत होते त्या चेहेऱ्याकडे निळे बॉक्स आहे.

आपल्या खोलीत डियन बसली आहे आणि तिथे तिची निळी चावी आहे. इतक्यांत कुणीतरी दार वाजवतो आणि डियांन घाबरून वेड्याप्रमाणे धावते आणि स्वतःला गोळी मारते. अचानक शॉट जातो आधीच्या क्लब मःध्ये जिथे ती गायिका कुजबुजत "सिलेंसीओ" .

आता ह्या सर्वांचा अर्थ कसा लावावा ? विविध तर्क आणि थेअरी आहेत. डेविड लिंच ह्यांनी ह्या सर्वांवर मौन पाळल्याने ते आणखीन गूढ झाले आणि जेंव्हा त्यांनी तोंड उघडले तेंव्हा सर्व काही आणखीन क्लिष्ट केले.

बेट्टी आणि रिटा एकच आहेत का ? कि दोन्ही पात्रें हि डियन च्या स्वप्नातील आहेत जिथे डियन स्वतःला बेट्टी आणि कॅमीला ला रिटा च्या रूपांत पहाते ? निळी चावी नक्की काय आहे ? आणि तो भयानक चेहेरा ?

सर्वांत चांगले स्पष्टीकरण असे आहे कि चित्रपटाचा पहिला ९० मिनिटांचा भाग हे डियन चे स्वप्न आहे. राहिलेली २० मिनिटे सत्य आहेत. डियन ने आपल्या प्रेयसीची खुनाची सुपारी दिली आहे. तिची प्रेयसी हि एक यशस्वी अभिनेत्री कामिला असून ती ऍडम कडे लग्न करणार आहे. डियान एक वैफल्यग्रस्त आणि असफल अशी मुलगी आहे.

खुनाच्या सुपारीनंतर डियन झोपायला जाते आणि ती एक स्वप्न पहाटे ज्यांत सर्व गोष्टी तिला पाहिजे तश्या आहेत. पण ते स्वप्न असल्याने सर्वच गोष्टी तिला पाहिजे तश्या आहेत असे नाही. त्यांत थोडी असंबद्धता आहे. ती जेंव्हा उठते तेंव्हा तिला ती निळी किल्ली सापडते ह्याचा अर्थ हिटमॅन ने काम केले आहे. आणि त्या गिल्ट ने ती आत्महत्या करते.

स्वप्नाचा अर्थ असा घ्यावा कि हॉलिवूड मध्ये यश आणि अपयश कुणाला मिळेल ह्याची काहीही शाश्वती नाही. बहुतेक गोष्टी नशिबावर असतात पण अपयशी लोक इतर गोष्टीवर त्याचे खापर फोडतात ( डियन च्या स्वप्नातील माफिया). यशाचे शिखर (विंकीज डायनर) आणि अपयशाची दरी (बाजूच्या कचऱ्याच्या पेटीच्या मागील तो भयानक चेहेरा) एका मेकांच्या बाजूला राहतात.

किंवा कदाचित तो भयानक चेहेरा एक अतींद्रिय शक्ती आहे, एक आत्मा आहे जो डियन च्या स्वप्नांत तिला काही तरी सांगू पाहत आहे.

कदाचित, कदाचित चित्रपटाची शेवटची २० मिनिटेच फक्त सत्य आहेत आणि आधीची ९० मिनिटे म्हणजे आत्महत्येच्या दरम्यान डियन चे सर्व आयुष्य तिच्या डोळ्यापुढून जात आहे.

पण मग तो कॉवबॉय कोण आहे ? त्याचा गूढ संवाद नक्की काय सांगतो ?

प्रत्येक सिन मागील गूढता समजावणार असंख्य youtube व्हिडिओस आणि लेख तुम्हाला सर्व नेट वर सापडतील. चित्रपटाची खरी मजा ती वाचण्यात आहे.

« PreviousChapter ListNext »