Bookstruck

अग्निपुत्र

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आपल्या सर्व अनुयायांना जगभरातील विविध ठिकाणी पाठविल्यावर रुद्रस्वामी पूर्वेच्या दिशेने जातात. प्रचंड अंतर पादांक्रांत केल्यानंतर रुद्रस्वामी आपल्या विश्वसु अनुयायी आणि काही विद्वानांसह  समुद्रमार्गे पूर्वेला पोहोचतात. ​बोटीतून किनाऱ्यावर उतरताच त्यांना तिथले लोकजीवन दिसते. अर्ध-भटकी जीवनशैली, शिकार करून जगणे, पाण्यावरील लाकडीघरे व अविकसित शेती ही तिथली जीवनपद्धत त्यांना स्पष्टपणे दिसत होती. बारीक डोळे असलेले आणि चेहऱ्यावर सतत आनंद असलेले मनुष्य पाहून सोबत असेलेले सार्वजन आनंदी झाले.

"स्वामी, आता आपल्याला काय करावयाचे आहे?" एक अनुयायी प्रश्न विचारतो.

स्वामी वर आकाशाकडे बघतात, पक्षी मोठमोठे थवे करून समुद्राहुन जमिनीच्या दिशेने उड़त होते. स्वामींना नैसर्गिक आपत्तीची कल्पना आधीपासूनच होती. ते आपल्या बरोबर असलेल्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करतात. सर्वजण एका उंच ठिकाणी जातात आणि काही क्षणातच त्या भागाला त्सुनामिची मोठी धड़क बसते. अनेक पशु, वनस्पती आणि मनुष्य आणि त्यांची घरे वाहून जातात. क्षणात होत्याचं नव्हतं होतं. सर्व अनुयायी हा प्रकार आपल्या डोळ्यांनी बघत असतात. थोड्या वेळापूर्वी आनंदाने आपली कामे करणारे आता मृतावस्थेत पडलेले होते.

"स्वामी, हे काय आहे? निसर्गाचं इतकं रौद्र रूप आम्ही कधी पाहिलं नव्हतं. आपल्याला याची कल्पना होती का?" एक विद्वान विचारतात.

"होय, आम्हाला या आपत्तीची पूर्ण कल्पना होती." रुद्रस्वामी त्याच्याकडे न बघतच उत्तर देतात.

"स्वामी, मग आपण त्या निष्पाप मनुष्यांना का नाही वाचवले? आपण त्या सर्वांना वाचवू शकला असता."

"आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ते ठिकाण म्हणजे मृत्यूचे माहेरच आहे.इथे पावलापावलावर तुम्हाला मृत्यू दिसेल. इथल्या मनुष्यांना मृत्यूची सवय आहे. भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ, हिंस्त्र पशुचा हल्ला अशी अनेक कारणे आहेत की जरी ह्या प्रदेशावर सर्वप्रथम सूर्यकिरणे पडत तरी सर्वात हिंस्त्र भूमी फक्त हीच आहे." स्वामी खाली बघतात तेव्हा त्यांना सर्व शांत झालेले दिसते. ते पुढे म्हणतात, "आता प्रत्येकाने कमीत कमी दोन व्यक्तींचे शव आपल्याबरोबर घेऊन चला. मला १०० मृत माणसे हवी आहेत."

विद्वानाला स्वामींच्या मनातील समजते. ते सर्व वाटेने मिळतील तितके शव घेऊन ज्वालामुखी पर्वताच्या दिशेने निघतात.

अनेक संकटांचा सामना करत स्वामी, त्यांचे अनुयायी ज्वालामुखी पर्वतावर पोहोचतात. लावारस गोठला होता म्हणून त्यांना उष्णता जाणवत नव्हती. त्याच ठिकाणी यज्ञ करत स्वामी मंत्रोच्चारास सुरुवात करतात. प्रत्येक मंत्रासह एक एक शव ज्वालामुखी कुंडात फेकले जात होते. जसजसे शव ज्वालामुखी कुंडात पडू लागले तसतसा गोठलेला ज्वालामुखी भडकू लागला. लावारस बाहेर येऊ लागला. गोठलेला भाग खाली जात लावारस मोठ्या प्रमाणात वर येऊ लागला. ज्वालामुखी कुंडामध्ये शव टाकणे सुरूच होते. सर्व शव संपल्यानंतर रुद्रस्वामी ज्वालामुखी कुंडाकडे बघत बोलू लागतात.

"हे अग्निदेवता... हे ज्वालादेवता... मनुष्य जातीच्या रक्षणासाठी आम्ही आपल्यासाठी अर्ध्यावर सोडलेला यज्ञ आज पूर्ण करत आहोत. आपल्याला १०० मनुष्यांचा बळी द्यावयाचा होता. आम्ही यज्ञ पूर्ण केला आहे, आमच्या रक्षणासाठी आता अग्निपुत्राला या पृथ्वीतलावर येऊ दे..."

आतमधून ज्वाला मोठ्याने बाहेर येतात आणि त्यातून आवाज येतो,"रुद्रा, तुला वाटतंय तू तुझा यज्ञ पूर्ण केला आहेस, पण ते साफ चुकीचे आहे. तू फक्त ९७ मनुष्यांचा बळी दिला आहेस. मनुष्याच्या हितासाठी अग्निपुत्राने जन्म घ्यावयाचा असेल तर १०० मनुष्यांचा बळी देणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी असेल तर अग्निपुत्र दुबळा असेल आणि जास्त असेल तर हाच पुत्रच मनुष्याचा संहार करेल. मला तुझ्या प्रामाणिकपणावर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच मी तीन बळींसाठी तुला एक संधी देत आहे."

स्वामींना आश्चर्य वाटले. पण अग्निदेवतेने संधी दिल्याने त्यांना दिलासा मिळाला. त्यांनी आपल्या अनुयायांकडे बघितले आणि विचारले,

"आपणा सर्वांनी सर्वकाही ऐकले आहे. आपल्यापैकी कोण तिघे पुढे येणार आहे?" स्वामींनी प्रश्न विचारला आणि सर्व अनुयायी पुढे सरसावले. स्वामी त्यांना समजावू लागले, फक्त तिघांनी पुढे यावयाचे आहे. पण कुणीही त्यांचे ऐकत नव्हते. प्रत्येक जन पुढे पुढे करत होता. स्वामी सगळ्यांना शांत करत होते, पण स्वामींच्या सेवेसाठी कुणीही त्यांचेच ऐकत नव्हते आणि बघता बघता एका अनुयायाने कुणाचेही न ऐकता ज्वालामुखी कुंडात उडी मारली. सर्व अनुयायी त्याच्याकडे बघू लागले. आता पुढे काय होईल हे रुद्रस्वमींना लक्षात आले आणि सर्व अनुयायी मुर्खाप्रमाणे ज्वालामुखी कुंडात उडी मारू लागले. अग्नीदेवतेला देखील याचे आश्चर्य वाटले. पण नियमानुसार मनुष्याचा संहार करणाऱ्या अग्निपुत्राचे शरीर आकार घेऊ लागले. संपूर्ण जमीन हलू लागली, अग्निदेवता अदृश्य झाले, पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी भेगा पडू लागल्या, समुद्र खवळू लागले, सोसाट्याने वारा वाहू लागला, पृथ्वीचा कायापालट होत होत एका युगाचा संहार होत होता.

ज्वालामुखीचा प्रचंड मोठा उद्रेक झाला आणि त्या उद्रेकातून अग्निपुत्र बाहेर आला. संपूर्ण नीळ शरीर असलेला, लाल डोळे आणि मोठ्या जटा असलेला तो रूद्रस्वामींच्या दिशेने चालून येत असताना त्या पर्वताला मोठा तडाखा बसला आणि अग्निपुत्रासह सर्वजण त्या ज्वालामुखी कुंडात पडले. त्यांच्यावर दरड कोसळून सर्वजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले पृथ्वीवरील एक संपूर्ण युग संपले.

« PreviousChapter ListNext »