Bookstruck

जेवायला गेलेला बोका

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका माणसाने दुसर्‍या एका माणसास आपल्या घरी जेवायला बोलाविले. त्यासंबंधी तयारी चाललेली पाहून त्या घरच्या बोक्याने विचार केला की, आपण फार दिवस आपल्या मित्राला जेवायला बोलावणार होतो, त्याला आजची संधी चांगली आहे. मग त्याने आपल्या मित्राला जेवणाचे आमंत्रण दिले. त्याप्रमाणे ठरल्या वेळी त्याचा मित्र तेथे आला अणि प्रथम स्वयंपाकघरात गेला. तेथे अनेक प्रकारची पक्वान्ने तयार करून ठेवली होती, ती पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. मग त्या पक्वान्नांकडे पाहात तो आपल्या मनात म्हणाला, 'असलं सुग्रास अन्न ईश्वराच्या कृपेनं आज प्राप्त झालं आहे, तर त्यावर असा हात मारून घ्यावा की पुन्हा निदान आठ दिवस तरी जेवणाची आठवण होऊ नये.' याप्रमाणे मनात विचार करीत व शेपटी हालवीत तो उभा आहे इतक्यात स्वैपाक्याची नजर त्याच्याकडे गेली व त्याने हळून मागून येऊन त्याचे मागचे दोन पाय धरून त्याला खिडकीतून बाहेर फेकून दिले. खाली असलेल्या दगडावर बोक्याचे डोके आपटून त्याला फार लागल्याने तो मोठमोठ्याने ओरडत गल्लीतून पळत असता, दुसरी काही मांजरे त्याच्याजवळ आली व त्याला विचारू लागली, 'अहो, आज तुम्हाला जेवणाचं आमंत्रण होतं, तिथला बेत कसा काय होता?' बोका त्यावर म्हणाला, 'मित्रांनो, जेवणाचा बेत किती चांगला होता म्हणून सांगू ? असं जेवण मी माझ्या जन्मात कधी जेवलो नाही. पण झालं काय की, बासुंदीपुरीचं जेवण एवढं झालं की, एक पाऊल चालणं मुश्किल झालं, अन् तोल जाऊन खिडकीतून मी एकदम खाली रस्त्यावरच पडलो.'

तात्पर्य

- मालकाच्या घरच्या मेजवानीत नोकराने आपल्या मित्रास आमंत्रण मूर्खपणाचे होय.

« PreviousChapter ListNext »