Bookstruck

पोपट आणि पिंजरा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका माणसाने एक पोपट पाळला होता. त्याला त्याने एका सुंदर पिंजर्‍यात ठेवले होते. तो मनुष्य त्या पोपटाच्या खाण्यापिण्याची फार काळजी घेत असे. तसेच घरातली इतर माणसेही त्या पोपटाचे खूप लाड करीत असत. एक स्वातंत्र्य सोडले तर इतर सर्व सुखं त्या पोपटाला अनुकूल होती. पण असे असूनही तो पोपट नेहमी मनात म्हणत असे की, 'देवा ! दुसरे पक्षी रानात कसे स्वच्छंदपणे उडत असतात, ते किती भाग्यवान ! तसं भाग्य माझ्या वाट्याला कधी येणार ?'

एक दिवस नोकरांच्या हातून पिंजर्‍याचे दार चुकून उघडे राहिले. ती संधी साधून तो पोपट बाहेर पडून रानात उडून गेला. बरेच दिवस हवे असलेले स्वातंत्र्य मिळाल्यामुळे रानात आपण फार सुखी होऊ असे त्याला वाटले. पण झाले मात्र उलटेच ! तो बोलत असलेली माणसाची जी भाषा ऐकून लोकांना मोठा आनंद होत असे, तीच भाषा ऐकून इतर पक्षी त्याला विनाकारण टोचून छळू लागले. जे गोड गोड शिजवलेले अन्न खाण्याची त्याला सवय झाली होती ते त्याला मिळेनासे झाले. स्वतः कष्ट करून पोट भरावे तर त्याची त्याला सवय नव्हती. त्यामुळे उपासमारीने तो तडफडू लागला. पावसाने पंख भिजल्याने त्याला थंडीत कुडकुडत बसावे लागू लागले. या सर्व त्रासाने शेवटी तो आजारी पडून मरणोन्मुख झाला. प्राण सोडताना तो म्हणाला, 'हाय रे दैवा ! माझा जुना पिंजरा मला पुन्हा मिळाला असता तर मी तो सोडण्याचा मूर्खपणा कधीही केला नसता. पण आता काय उपयोग ?'

तात्पर्य

- उशिरा सुचलेले शहाणपण काय कामाचे ?

« PreviousChapter ListNext »