Bookstruck

एक पोपट व त्याचा पिंजरा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका श्रीमंत माणसाजवळ एक पोपट होता. त्या पोपटास त्याने एका मोठ्या व सुंदर पिंजर्‍यात ठेवले होते. तो त्याला चांगली फळे खायला घालीत असे. त्या पोपटाला तेथे सर्व सुखे अनुकूल होती तरीही तो नेहमी झुरत असे, 'माझे जातभाई जसे मोकळेपणे या जंगलातून त्या जंगलात जातात अन् या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारतात, तसं मला करायला मिळालं तर किती बरं होईल.'

एके दिवशी चुकून पिंजर्‍याचे दार उघडे राहिल्याने त्या पोपटाची इच्छा पूर्ण झाली. त्या पिंजर्‍यातून पोपट घाईने बाहेर पडून लांबच्या आंब्याच्या झाडावर जाऊन बसला. थोड्या वेळाने त्याला भूक लागली तेव्हा इकडेतिकडे पाहू लागला, पण कोणत्याही झाडावर त्याला एकही फळ दिसेना. रात्री विजांचा चमचमाट, ढगांचा आवाज होऊन पाऊस पडायला लागला. त्या बिचार्‍या पोपटाचे फारच हाल झाले. अशा गोष्टींची त्याला कधीच सवय नव्हती. शेवटी पावसात भिजून व थंडीने काकडून त्याचे तेथेच प्राण गेले. मरता मरता तो म्हणाला, 'मला जर पुन्हा त्या पिंजर्‍यात जाता आलं तर त्यातून बाहेर पडण्याची मी पुन्हा कधीही इच्छा करणार नाही.'

तात्पर्य

- परमेश्वराने आपल्याला ठेवले तसेच राहावे.

« PreviousChapter ListNext »