Bookstruck

माणूस व सिंह

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक माणूस अरण्यात फिरत असता, तेथे त्याची एका सिंहाशी भेट झाली. त्या वेळी त्या दोघांनी निरनिराळ्या विषयांवर बर्‍याच गप्पा केल्या व त्यामुळे ते दोघे एकमेकास आवडू लागले.
शेवटी मात्र ते 'माणूस श्रेष्ठ की सिंह श्रेष्ठ' या विषयावर बोलू लागले व त्याचे वादात रूपांतर झाले. ते दोघेही भांडू लागले. नुसत्या बोलण्याने माणसाचे श्रेष्ठत्व त्या माणसास सिद्ध करता येईना तेव्हा त्याने आपल्याजवळ असलेले शिल्प त्यास दाखविले. सिंहाचे आयाळ हाती धरून त्याच्या पाठीवर एक माणूस आहे असे ते शिल्प होते.
ते पाहून सिंह त्याला म्हणाला, 'ज्यानं हे शिल्प तयार केलं तो मनुष्य होता, तोच जर सिंह असता तर माणसाच्या छातीवर बसून सिंह त्याला मारतो आहे असं त्यानं दाखविलं असतं.'
तात्पर्य
- प्रत्येकजण वाद घालताना स्वतःला अनुकूल असतील अशीच प्रमाणे पुढे मांडतो. दुसर्‍या बाजूची प्रमाणे समजून घेण्याचा प्रयत्‍न करीत नाही.
« PreviousChapter ListNext »