Bookstruck

गीता हृदय 28

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

स्त्रिया असोत, वैश्य असोत, शूद्र असोत, कोणीहि असो; आपापल्या सेवाकर्मानें सर्वांना मोक्ष मिळेल. जी स्त्री पति हाच परमेस्वर मानते, त्याच्या सुखदु:खांत स्वत:चें सुखदु:ख पाहते, पतीची इच्छा तीच स्वत:ची इच्छा असें जी करते, तिला मोक्ष नाही मिळवायचा तर कोणाला?

प्रश्न इतकाच आहे की जें कर्म तुम्ही करतां कोणत्या भावनेनें करतां? तें जनताजनार्दनाला, समाजरूपी भगवंताला अर्पण करावयाचें आहे या भावनेनें करतां, की केवळ स्वार्थानें करतां, या गोष्टीला महत्त्व आहे. नववा अध्याय फार थोर दृष्टी देत आहे. ती मिळाली तर जीवनांत क्रान्ति येईल. कबीरानें म्हटलें आहे:

“गुरूकृपांजन पायो
पायो मैने भाई
रामबिना कछु जानत नाहीं ।।
अंदर राम बाहिर राम
जहॉं देखों वहॉं रामहि राम ।।


मग सर्वत्र प्रभुदर्शन होईल. त्या प्रभुची सेवा करण्यासाठी तुम्ही धावाल. व्हिटमन या कवीला हिरवें हिरवें गवत पाहून हा त्या प्रभूचा हातरूमाल आहे असें वाटलें. शेक्सपिअर म्हणतो “मग त्या मनुष्याला पाषाणांतून प्रवचनें ऐकूं येतील, निर्झरांतून वेद मिळतील.” एकदां ही दृष्टी यायला दवी. सर्वत्र मांगल्य पाहण्याची दृष्टी. सर्वत्रच प्रभूचा साक्षात्कार.

ही थोर दृष्टी यावी म्हणून आपण धडपडूं या. ज्यांची ज्यांची सेवा करावयास आपण जाऊं ते प्रभूची रूपें आहेत असें मानून सेवा करूं या. मग कंटाळा वाटणार नाही. सेवेंत रस वाटेल. एक प्रकारची मुक्तावस्था जीवनांत येईल. हृदयांत अपार आनंद भरेल. मोक्ष तो आणखी काय?


« PreviousChapter ListNext »