Bookstruck

गीता हृदय 33

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका पर्शियन कवीनें म्हटलें आहे “ हे मृत्तिके, तूं माझ्या ओठाचें चुंबन घेऊं इच्छितेस का? तर मग पेल्याचा आकार घेऊन भट्टीत भाजून घे. मग तो पेला माझ्या ओठांला स्पर्श करूं शकेल. हे लांकडाच्या तुकड्या, माझ्या सुंदर केशकलापास स्पर्श करावा असें का तुला वाटतें ? तर स्वत:ला कर्वतून घे. कापून घे. कंगोरे पाडून घे. तूं फणी बन. मग ती माझ्या केसांत फिरेल, केसांशी खेळेल.”

त्यागानें, तपस्येनें मोल चढतें. आपण आंवळ्यांना टोचतो. त्यांचा मग मुरावळा होतो. तो मग सुंदर काचेच्या बरणीत बसतो. त्याची किंमत वाढते. रस्त्यावर पडलेला तो भिकारडा आंवळा, परहंतु तो शिंक्यात जाऊन बसतो. सा-या जीवनांत हा कायदा दिसून येईल

ईश्वराच्या हातांतील साधन होतां यावें म्हणून आपण तपस्या केली पाहिजे. निरहंकारी झालें पाहिजे. तुमच्या आमच्या जीवनाच्या बासरींतून प्रभुनें संगीत निर्मावें असें वाटत असेल तर ही जीवनाची बांसरी अंर्तबाह्य पोकळ करून ठेवूं या. तरच देवाचा वारा तिच्यातूंन फुंकिला जाईल, संगीत निर्माण होईल. परंतु आफल्या अहंकारानें, आपल्या क्षुद्र स्वार्थी वासना-विकारांनी जर आपली जीवनाची बांसरी भरून गेली असेल, ही बांसरी पोकळ न होतां भरून गेली असेल, तर प्रभु तिच्यांतून वारा कसा फुंकील ? संगीत कसें प्रकट होईल ?

“तुझ्या करांतील बनून पांवा
कृतार्थ हा जन्म मदीय व्हावा”


असें देवाजवळ ज्याला म्हमावयाचें आहे. त्यानें आपल्या जीवनाची बांसरी पोकळ करून ठेवावी. नम्रतेशिवाय कांहीएक नाही. नम्रता हा ज्ञानाचा आरंभ. नम्रता नसेल तर  जीवन वाढणार नाही. समर्थांनी एके ठिकाणी म्हटलें आहे:

“नेणतेपण सोडूं नये”

आपण नेणते आहोंत ही भावना कधीं सोडूं नये. विहिरींत अपरंपार पाणी असतें. परंतु विहिरीत सोडलेली घागर जर वांकणार नाही, तर तें पाणी तिच्यात कसें शिरेल ? ती अहंकाराने नाचत राहील, तर रितीच राहील. प्रभुचे संगीत सर्व विश्वांत भरून राहिलें आहे. तें तुमच्या आमच्या जीवनांतूनहि प्रकट होईल; परंतु आपण वांकूं तर. विनम्र होऊं तर. त्याच्या हातांतील आपण निमित्तमात्र साधनें आहोंत अशा भावनेनें वागूं तर. अहंकाराचा वारा लागूं न दिला तर. असें करूं तर आफलेंहि हें जीवन कृतार्थ होईल.

« PreviousChapter ListNext »