Bookstruck

गीता हृदय 36

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पुष्कळ वेळां असें वाटतें की सगुणाची पराकाष्ठा म्हणजेच निर्गुण. सर्वत्रच प्रभुरूप दिसूं लागलें की शेवटी डोळें मिटून आपण शांत बसूं. जणुं निर्गुणोपासक बनूं. सगुणोपासक असा शांत बसत नाही. तो समाजांत सर्वत्र वावरतो. तो कर्मयोगी होतो. सगुणरूपाची सेवा करायला तो धांवतो. विश्वरूपाचा हव्यास दूर करून या दोन-हाती छोट्या परमेश्वराच्या सेवेस तो उभा राहतो. आणि अशी सेवा करतां करतां तो उत्तरोत्तर अधिकाधिक निर्मळ होतो. केवळ ज्ञानरूप होतो. बाराव्या अध्यायांतील भक्तांची लक्षणें वाचा. सगुण ब्रह्माची उपासना करतां करतां, या आजुबाजूच्या परमेश्वराची कर्ममय पूजा करतां करतां ती लक्षणें त्याच्या अंगी येतात. तो प्रेममय होतो. केवळ निरंहकारी. कोणाला उगीच दुखवणार नाही. कोणाला कंटाळणार नाही. सदैव हातांत सेवा. डोळ्यांत प्रेम. असा तो सगुणभक्त म्हणजे सर्वांचा आधार होतो. सर्वांचा प्राण बनतो.

कधी क्षणभर एकान्तांत बसून निर्गुणात बुडावें. पुन्हां सगुणाची गोडी चाखण्यासाठी संसारात सेवा करीत रहावें आणि हा द्विविध आनंद लुटावा. दोहोंनी जीवन परिपूर्ण करावें.

अध्याय १३ वा


तेराव्या अध्यायापासून पुन्हां एक निराळें दालन उघडण्यांत आलें आहे. सहाव्या अध्यायाच्या अखेरीपर्यंत कर्माच ऊहापोह होता. बाराव्या अध्यायाच्या समाप्तीपर्यत भक्तीचा प्रपंच होता. तेराव्यापासून तों पंधराव्याच्या समाप्तीपर्यंत ज्ञानाचा विचार आहे.

ज्ञान म्हणजे काय ? ज्ञान म्हणजे सदगुण.

“अमानित्वमदंभित्वमहिंसा शांतिरार्जवम्”

इत्यादि गुणांची यादी भगवंत देतात व शेवटी म्हणतात:

“एवज्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोऽन्यथा”

हे गुण म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे पांडित्य नव्हे. ज्ञान म्हणजे पुस्तकी विद्या नव्हें. आपणांस हें शरीर मिळाले आहे. हे देवाघरचें शेत. विद्या नव्हें. बाहेरचे शेतभात मिळेल तेव्हां मिळेल. परंतु हें साडेतीन हातांचें शेत तर प्रत्येकास मिळालेलें आहे. बाहेरच्या शेतीत ज्याप्रमाणें आपण धान्य पिकवितों त्याप्रमाणें या जीवनाच्या शेतींत ज्याप्रमाणें या जीवनाच्या शेतीत आपणांस सदगुणाचे पीक घ्यावयाचे आहे.

भगवान् बुद्ध एकदां भिक्षा मागत एका श्रीमंत शेतक-याच्या अंगणांत येऊन उभे राहिले. त्यांनी आपले भिक्षापात्र पुढें केलें. तो शेतकरी म्हणाला “अशी भीक कशाला मागतां? माझ्यासारखे शेतकरी व्हा. ही पहा सोन्यासारख्या धान्याची येथें रास पडली आहे.” भगवान् बुद्ध म्हणाले “गड्या, मी सु्द्धां एक शेतकरीच आहे.”

« PreviousChapter ListNext »