Bookstruck

गीता हृदय 42

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रजोगुणांत बुडाल तर ध्येयासाठी शक्ति उरणार नाही. म्हणून हा रजोगुण जिंकुन घ्या. वासना-विकारांचे वेग आंवरा. सर्वत्र गुराप्रमाणें धावूं पाहणारें उल्लू मन, त्याला आंवर. आणि सत्त्वगुणाकडे सारें लक्ष द्या.

परंतु सत्त्वगुणहि जिंकून घ्यायला हवा. तमोगुण व रजोगुम संपूर्णपणें नष्टच करावयाचें. सत्त्वगुणाचे तसें नाही करावयाचें. कैद्याला कमरेखाली गोळी घालून घायाळ करण्याचा अधिकार जसा पोलिसास असतो, त्याप्रमाणें सत्त्वगुणास घायाळ करावयाचें. म्हणजे काय? याचा अर्थ एवढाच की सत्त्वगुणाचा अहंकार होऊं द्यायचा नाही. सात्त्विक क्रियांची तर समाजासाठी, स्वत:साठी सदैव जरूरी. परंतु त्या सात्त्विक क्रिया हातून सहज होतील असें करावयाचें. आपलें नाक रात्रंदिवस श्वासोच्छवास करीत असतें. त्यांचे का आपण कौतुक करतों? त्याचें कौतुक करतों? त्याचे का आभार मानतों? श्वासोच्छवास करणें हा नाकाचा सहजधर्म. शाळा सुटली कीं मुलें आपोआप घराकडे वळतात. त्यांच्या पायांचा तो सहजधर्म झालेला असतो. अंधार दूर करणें हा सूर्याचा सहजधर्म. तो म्हणेल मी अंधार दूर नको करूं तर का मरूं? अशा प्रमाणें सत्कार्य हा सहजधर्म झाला पाहिजे. म्हणजे मग त्याचा अहंकार वाटणार नाही. दुस-याची सेवा करावयास  संत सहज धांवतात. त्यांना त्यांत आपण विशेष काहीं करतों असें वाटत नाही.

सत्त्वगुण जिंकून घेणें म्ङमजे त्याचा अहंकार जिंकावयाचा. अशा प्रकारें सत्ता स्थापावयाची. त्रिगुणातीत व्हावयाचें. चौदाव्या अध्यायाच्या शेवटी त्रिगुणातीताची लक्षणें दिली आहेत. दुस-या अध्यायाच्या शेवटी स्थितप्रज्ञाची लक्षणें; बाराव्या अध्यायांत भक्तांची लक्षणें; येथे चौदाव्यात त्रिगुणातीताची लक्षणें; ही सारी लक्षणें एकच आहेत. याचा अर्थ जो कर्मयोगी आहे, जो भक्त आहे ज्ञानी आहे, ते सारे एकच आहेत. कर्म, भक्ति, ज्ञान हीं. जणुं निराळी नाहीत.

दत्तात्रेय म्हणजे मूर्तिमंत ज्ञान. परंतु दत्तांचा जन्म कोणापासून? अत्रि व अनुसया यांच्यापासून ज्ञानस्वरूपी सदगुरू दत्तात्रेय यांचा जन्म होतो. अ-त्रि म्हणजे त्रिगुणातीत भाव व अनुसया म्हणजे निर्मत्सर वृत्ति यांच्यापासूनच ज्ञानाचा जन्म होणार.

त्रिगुणातीत होणें म्हणजे देहभाव गळणें. नारळाच्या आंत गोटा जसा गुडगुड वाजतो, त्याप्रमाणें या देहाच्या आसक्तीपासून आत्मा संपूर्णपणें अलग करणें. ख्रिस्ताला क्रॉसवर देत होते. ख्रिस्त म्हणाले “देवा, का रें हा छळ?” परंतु पुन्हां म्हणाले “तुझी इच्छा प्रमाण.” अशा रितीनें देहाची आसक्ति जिंकून घ्यावी लागते. त्रिगुणातीत होऊन प्रभुच्या हातांतील एक साधन म्हणून रहावयाचें. असें हें महान् ध्येय आहे. हा परम पुरूषार्थ प्राप्त करून घ्यावयाचा आहे. यासाठी अविरत परिश्रम करूं या.

« PreviousChapter ListNext »