Bookstruck

गीता हृदय 51

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रामानें रावणास मारलें, कृष्णानें कंसास मारलें; मग आम्ही कां मारूं नये, असें आपण म्हणतों. परंतु रामानें रावणांस मारलें आणि रावण उद्धरून गेला असें आहे. आपण पहिलें वाक्य वाचलें, पुढचें पाहिलें नाही. एक मुसलमान होता. तो दारू कां पितोस? हें धर्माविरूद्ध आहे.” तो म्हणाला “कुराणांत दारू पी असें आहे.” तो गृहस्थ म्हणाला “दाखव रे.” त्यानें कुराण आणलें व दाखवलें. तो गृहस्थ म्हणाला “अरे  पुढचें वाच की. ‘तूं दारूं पी म्हणजे नरकाचा धनी होशील’ असें आहे.” तो म्हणाला “त्या पुढच्या वाक्यापर्यंत अद्याप मी आलों नाही. जेवढें वाक्य वाचलें, तेवढ्याचा आचार सुरू केला !” तसें आपलें आहे. रामानें रावणांस मारलें. लगेच आपण मारूं लागलों ! परंतु रामचंद्रांचे ते निष्काम हात. ते परम कारूणिक हात. रावणाच्या कल्याणासाठी तडफडणारे ते हात. म्हणून त्या हातांनी मेलेला रावण तरला. आपले तसे हात आहेत का? आपल्या हातांनी मरणारा उद्धरून जाईल असें आपणांस म्हणतां येईल का ?

असो. जगाची सेवा करा. प्रेम करा. हें जग आनंदी होईल असें करा.

“अवघाची संसार सुखाचा करीन
आनंदे भरीन तिन्ही लोक”

हे ध्येय ठेवा. ज्ञानेश्वरांनी वर मागितला :

जो जे वांछिल तो ते लाहो । प्राणिजात ।।

असें आपणहि म्हणूं या. त्यासाठी लढूं या. धडपडूं या. अनासक्त वृत्तीनें उद्योगात रात्रंदिवस रमूं या.

असें हें सांगून भगवान् अर्जुनाला म्हणाले “अर्जुना, ऐकलेंस ना हें सारे गीताशास्त्र ? गेला का तुझा मोह ?”

“कच्चिदेतच्छुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा
कच्चिदज्ञानसंमोह: प्रणष्टस्ते धनंजय”।।

तेव्हां अर्जुन उचंबळून म्हणाला :

“नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाऽच्युत”


देवा, गेला हो मोह. जागृति आली. तुझी ही कृपा. भगवान् ही उदारता आहे. सर्व सांगून पुन्हां ते आचारस्वातंत्र्य देतात. विचारस्वातंत्र्य देतात. परंतु भगवंतांचें अर्जुनावर अपार प्रेम. त्यांना रहावत नाही. दिलेलें स्वातंत्र्य ते पुन्हां घेतात व म्हणतात:

सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज”

« PreviousChapter ListNext »