Bookstruck

मानवजातीचें बाल्य 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

- ५ -

ज्या प्रदेशाला पुढें नील नदीचें खारें असें नांव मिळालें, त्या प्रदेशांत कित्येक हजार वर्षांपूर्वी केवळ सर्वत्र चुनखडीचे दगड होते.  शेवटच्या हिमयुगांतील बर्फ जेव्हां वितळलें, तेव्हां या प्रदेशावर सर्वत्र पाणीच पाणी झालें, तीस मैल रूंदीची एक खाडीच जन्मली.  हळूहळू पाणी ओसरलें.  या खोर्‍यांत एक सुपीक टापू तयार झाला.  भटक्या लोकांना येथें पृथ्वीवरचां स्वर्गच जणूं मिळाला.  येथें रानबाजरी व इतर खाद्य पदार्थ भरपूर होते.  हवा सुंदर होती.  पाणी विपुल होतें.  हिमयुगांत निराधाराप्रमाणें सर्वत्र भटकणार्‍या मानवास अत:पर भटकण्याची जरूर राहिली नाही.  अन्न शोधीत भ्रमन्ती करण्याची कटकट उरली नाहीं.  या नील नदीच्या खोर्‍यांत या लोकांनी वसाहत केली. आणि त्यांची लोकसंख्या भराभरा वाढली.  नील नदीचा प्रवाह हा जणूं जोडणारा धागा.  या प्रवाहानें त्या सर्व मानवांना एकत्र जोडलें.  त्यांचा एक समाज बनला.  ते परस्परांशी प्रेमानें वागूं लागले.  सुमारें सहा हजार वर्षांपूर्वी ही गोष्ट घडली.

नील नदीच्या खोर्‍यांतील हें जीवन एकंदरींत सुखकर होतें.  परंतु मधून-मधून आपत्ती येत.  कांही काळ गेला म्हणजे नील नदीला आपला पूर यावयाचा.  अद्याप कालगणना शोधली गेली नव्हती.  नदी नेहमींच प्रेमळ मैत्री दाखवील असें दिसेना.  पृथ्वींतून नेहमींच धनधान्य वर येईना.  अशीं संकटें येत.  आणि या वेळेस त्यांच्यांत एक प्रतिभावान् पुरुष जन्मला.  आलौकिक बुध्दि त्याची असली पाहिजे.  अन्न आपोआप उगवतें असें नव्हे ; तर जमिनींत बीं पेरून आपणांस तें वाढवतां येणें शक्य आहे असा शोध त्या माणसानें लावला.  कसा लावला देव जाणें.  अकस्मात् तो शोध दैवयोगानें लावला असावा.  त्याबरोबर दुसराहि एक विचार त्यांच्या डोक्यांत डोकावला कीं, सारें अन्न एकदम खातां आलें नाहीं, तर तें आपण पुढच्या काळासाठीं सांठवून ठेवूं शकतों.

हा शोध फार महत्त्वाचा होता.  कारण शिल्लक पडलेलें धान्य सांठवून ठेवण्यासाठीं म्हणून ते मातीचीं मडकीं करूं लागले.  कोठारें बांधून ठेवण्याची कल्पना सुचली.  या कुंभारकामांतून पुढें स्वयंपाकाची भांडींहि तयार होऊं लागलीं.  धान्यासाठीं कोठारें बांधता बांधतां मोठमोठीं घरें व राजवाडे ते पुढें बांधूं लागले.

प्रथम स्वत:चे विचार ते तोंडानें सांगत.  परंतु एक प्रकारची चिन्हलिपि त्यांनीं शोधून काढिली.  हीं चिन्हें पवित्र चित्राचीं असत.  लोकांना आपलीं शासनें अधिक बंधनकारक वाटावींत म्हणून पवित्र चित्रांची ही चिन्हलिपि शोधिली गेली.

« PreviousChapter ListNext »