Bookstruck

मानवजातीचें बाल्य 13

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

- २ -

जगांतील महान् प्रेषितांपैकीं पहिल्यानें होऊन गेलेल्यांत मूसा हा आहे.  मूठभर अर्धवट रानटी गुलामांना त्यानें जवळ घेतलें व त्यांना त्यानें धर्म दिला.  आणि त्यांची अशी एक प्राणमय संघटना बनविली, कीं तिच्यामुळें आज तीन हजार वर्षे लोटलीं तरीहि ज्यू-समाज टिकला आहे व आणखी तीन हजार वर्षे लोटलीं तरी टिकेल असें म्हणायला हरकत नाहीं.

मूसा झालाच नाहीं असें कोणी कोणी म्हणतात.  होमर झाला नाहीं, ख्रिस्त झाला नाहीं, शेक्सपीअर झाला नाहीं असेंहि म्हणणारे कांही आहेत.  जगांतील महापुरुषांचा अर्थ ज्यांना समजत नाहीं असे क्षुद्र लोक असे महापुरुष झालेच नाहींत असें म्हणून मोकळे होतात.  म्हणजे मग त्या महापुरुषांच्या जीवनाचा अर्थ समजून घेण्याची वा समजून देण्याची गरजच उरत नाहीं.  ईश्वरानें जर खरोखरच मूसाला जन्माला घातलें नसेल तर त्या काल्पनिक मूसाला निर्मून जुन्या बायबलाच्या निर्मात्यांनीं ईश्वराला त्याची चूक पटवून दिली हें बरें केलें.  त्या प्राचीन ज्यूंना एकत्र आणूं शकणार्‍या महापुरुषाची नितान्त आवश्यकता होती.  त्यांचें राष्ट्र बनवणारा राष्ट्रपुरुष त्यांना हवा होता.  आणि हें महान् कार्य ज्यानें यशस्वी रीतीनें पार पाडलें तो हा मूसा होय.  हा मूसा खरोखरचा, हाडामांसाचा असा इजिप्तमध्यें जन्मलेला असो वा लोकांच्या हृदयांत विराजमान असणारी ही एक काल्पनिक विभूति असो ; ज्यूंच्या हृदयांतील हा मूसा त्यांना निराकोच्या रानावनांतून पुन्हा पुन्हा नवीन देवांकडे नेतो ; नवीन नवीन आशा त्यांना देतो ; नवीन नवीन कर्मे त्यांना करायला लावतो.

मूसा ही काल्पनिक व्यक्ति असली तरी ज्यूंच्या भवितव्याला तिनें प्रत्यक्ष झालेल्या एकाद्या मूसा व्यक्तिपेक्षां कमी वळण दिलें आहे असें नाहीं.  काल्पनिक वा सत्यमय अशा या मूसानें ज्यूंचें भवितव्य बनविलें आहे.  ज्यूंच्या भवितव्यावर त्यानें अपरंपार परिणाम केले आहेत.  इतिहासांतील खरीखुरी एक व्यक्ति या दृष्टीनेंच त्याच्याकडे आपण पाहूं या.

जुन्या करारांतील कथेप्रमाणें ज्यू आईबापांच्या पोटीं मूसा जन्मला.  परंतु एका इजिप्शियन राजकन्येनें स्वत:चा मुलगा म्हणून त्याला वाढविलें.  राणी नील नदीवर स्नानास गेली होती.  त्या वेळेस तिला हा बाळ पाण्यावर तरंगतांना आढळला.  तिनें तो राजवाड्यांत आणिला.

« PreviousChapter ListNext »