Bookstruck

मानवजातीचें बाल्य 21

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

जेरिमियाला आणखी एक गोष्ट दिसून आली ती ही, कीं या धर्मप्रेषितांना शांतीचा ध्यास होता.  ते धर्माचे प्रेषित नि:शंकपणें पुढील भविष्यवाणी बोलत. ''असा एक दिवस येईल, कीं ज्या वेळेस तुम्ही तुमच्या तरवारी मोडून त्यांचे नांगर बनवाल ; भाले मोडून त्यांचे विळे कराल ; शेतीचीं व बगीच्यांची हत्यारें, अवजारें बनवाल.'' असें बोलणें म्हणजे साधी गोष्ट नव्हती.  ती एक धीरोदात्त अशी गोष्ट होती.  अति मंगल व गंभीर अशी ती वाणी असे.  परंतु तें शांतीचें उपनिषद् कोण ऐकणार ?  राष्ट्रानें दुसर्‍या राष्ट्राविरुध्द कधींहि तरवार उपसूं नये, कोणत्याहि राष्ट्रानें युध्द कसें करावें तें अत:पर शिकूं नये.'' ही त्याची शिकवण.  थोर उदात्त शिकवण.

पुरेत आतां युध्दें ; पुरेत हेवेदावे ; पुरेत द्वेषमत्सर ; आतां हल्ले नाहींत ; वेढे नाहींत ; रक्तपात नकोत ; दुष्काळ नकोत ; दुर्भिक्ष नको ; रोग नकोत ; सांथी नकोत हें त्या धर्मप्रेषितांचें निश्चित ध्येय होतें.  यासाठीं त्यांना जगायचें होतें.  यासाठीं मरायचें होतें.  जेरिमियाला स्पष्टपणें वाटे कीं, हें प्रेषित खरोखर दैवी प्रेरणेनें संस्फूर्त झालेले आहेत.

एक दिवस स्वत: जेरिमियाहि असाच संस्फूर्त कशावरून होणार नाहीं ?  जसजसा तो या विचाराकडे अधिकाधिक लक्ष देऊं लागला, तसतसा तो जरा वेड्यापिशासारखा वागूं लागला.  त्याला स्वप्नें पडत.  त्याला नाना दृश्यें दिसत.  अद्‍भुत साक्षात्कार घडत.  ईश्वर आपणांस नवीन दर्शनें घडवीत आहे, नवीन दृष्टि देत आहे असें त्याला वाटूं लागलें.  ईश्वराची ही इच्छा जेरुसलेमच्या रहिवाशांना नीट समजावून सांगितली पाहिजे असें त्याला वाटूं लागलें.  दैवी उन्मादानें तो जणूं मस्त झाला.  थोर थोर कवी, जहाल विचारसरणीचे क्रांतिकारक लोकनायक दिव्य प्रेरणेनें असेच वेडे होत असतात.  जेरिमिया प्रभुमत्त व शांतिमत्त झाला.

- ३ -

प्रथम प्रथम तो लहानसहान वाईट गोष्टींविषयीं बोले.  बारीकसारीक गोष्टींवर तो टीका करी.  आपले देशबांधव दुसर्‍या बलाढ्य राष्ट्रांचें कौतुक करीत आहेत असें त्यानें पाहिलें.  त्या बलाढ्य राष्ट्रांप्रमाणें आपलें राष्ट्रहि बलाढ्य व्हावें, असें त्याच्या देशबांधवांना वाटत होतें.  जेरिमिया त्यांना म्हणाला, ''दुसर्‍यांचे अनुकरण नका करूं.  स्वत:शीं सत्यनिष्ठ रहा.''  पूर्वी होऊन गेलेल्या प्रेषितांप्रमाणें तोहि लोकांची क्षुद्र गोष्टींविषयींच्या त्यांच्या आसक्तिसाठीं खरडपट्टी काढी.  राजाला त्याच्या जुलमाविषयीं स्पष्ट शब्दांत तो सांगे.  एकदां तेथील मुख्य मंदिरांत महोत्सव होता.  मोठमोठे अधिकारी उपस्थित होते.  स्वत: राजाहि तेथें हजर होता.  इतक्यांत एकदम तो तरुण जेरिमिया तेथें आला.  त्याचे केस पिंजारलेले होते ; डोळे जणूं तेलानें पेटलेले होते ; तो एकाद्या उन्मत्ताप्रमाणें हातवारे करीत होता ; तो एकदम तेथील समारंभात घुसला व तेथील प्रार्थनांना त्यानें अडथळा आणला.समजा, आतां चर्चमध्यें प्रार्थना चाललेली असावी आणि एकाद्या समाजसत्तावादी माणसानें तेथे येऊन धर्मावर तोंडसुख घ्यावें.  मग तेथें किती गडबड व प्रक्षोभ होईल त्याची कल्पना आपण करूं शकतों.  तोच जसा अधिक तीव्रतेने तेथें झाला.  ते धर्मोपाध्याय रागावले.

« PreviousChapter ListNext »