Bookstruck

मानवजातीचें बाल्य 31

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

या तामसी व रानटी विचारांची मोहिनी कांही दिवस बुध्दांच्या मनावर राहिली.  हळूहळू त्यांनीं आपलें अन्न कमी केलें.  शेवटीं शेवटीं तर केवळ चार शितकण ते खात.  त्यांच्या हातांपायांच्या केवळ काड्या झाल्या.  शरीर सुकलें.  केवळ हाडें राहिलीं.  मरण जवळ आलें.  परंतु सत्य अद्याप दूरच होतें.  मरणाची छाया जवळ आली तरी सत्यप्रकाश प्राप्त झाला नव्हता.

उपासतापास, ही शरीरदंडना म्हणजे ज्ञानाचा मार्ग नव्हे, जीवनाच्या अर्थाचा शोध अशा उपायांनीं लागणार नाहीं, असें बुध्दांना कळून आलें.  ते पुन्हा अन्नपाणी घेऊं लागले.  शरीर पुन्हा समर्थ झालें.  ते एका झाडाखालीं विचार करीत बसले.  एके दिवशीं सर्व रात्रभर ते ध्यानमग्नच होते.  सारें जग त्यांच्या पायापाशीं झोंपलेलें होतें.  आणि तिकडून मंगल उषा आली आणि त्याबरोबरच जीवन-मरणाचें कोडेंहि सुटलें.  मानवी दु:खांचा निरास करण्याचा मार्ग सांपडला.  अत:पर ते बुध्द झाले--म्हणजे ज्यांना ज्ञान-प्रकाश मिळाला आहे असे.

- ४ -

बुध्द काशी क्षेत्रीं आले.  तेथील उपवनांत ते राहिले.  त्यांना पांच शिष्य मिळाले.  त्या शिष्यांना त्यांनीं तें नवीन ज्ञान दिले.  नंतर ते त्यांना म्हणाले, ''आता हिंदुस्थानभर जा.  सर्वत्र हा धर्म द्या.'' त्या पांचांचे पुढे साठ झाले.  त्यांची कीर्ति हिंदुस्थानभर पसरली.  लोक त्यांची पूजा करूं लागले.  त्यांनीं नवीन ज्ञान दिलें म्हणून नव्हे, तर ते कांहीं चमत्कार करतात असें ऐकून.  ख्रिस्ताची अशीच पूजा होई.  ख्रिस्ताप्रमाणेंच बुध्दहि पाण्यावरून चालत जातात अशी कथा पसरली.  ते हवेंत उंच जातात, वाटेल तेव्हां अदृश्य होतात, इत्यादि चमत्कारकथा वार्‍यावर सर्वत्र गेल्या.  एके दिवशीं बुध्द आपल्या शिष्यांसह एका नदीजवळ आले.  ती नदी दुथडी भरून वहात होती.  प्रचंड पूर ! परंतु बुध्दांनीं मनांत आणलें आणि काय आश्चर्य ? सशिष्य ते एकदम पैलतीरास गेले.  अशा गोष्टी सर्वत्र पसरत होत्या.  बुध्दांची पूजा होऊं लागली.  त्यांनीं नवीन दृष्टि दिली म्हणून नव्हे, तर ते एक थोर जादूगार आहेत, अद्‍भुत चमत्कार करणारे आहेत म्हणून.

कांही थोड्यांनीं बुध्दांचें तत्त्वज्ञान समजून घेण्याची धडपड केली.  आणि फारच थोड्यांनीं त्यांचें जीवन आपल्या कृतींत आणण्याची खटपट केली.  बुध्द हे चांगले जीवन कसें जगावें तें शिकवणारे महान् आचार्य होते.

बुध्दांचें तत्त्वज्ञान व चांगल्या जीवनाविषयींचे त्यांचे विचार आपण थोडक्यांत पाहूं या.

« PreviousChapter ListNext »