Bookstruck

मानवजातीचें बाल्य 34

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

स्वत:च्या कृतीनें नेमस्तपणाचें, संयमाचें महत्त्व त्यांनीं पदोपदीं दाखवून दिलें आहे.  अत्यंत सुखसंपन्न अशा घराण्यांत ते जन्मले होते.  परंतु त्या सुखांना ते लवकरच विटले.  नंतर ते स्वत:च्या देहाला अत्यंत क्लेश देऊं लागले.  परंतु या आत्यंतिक देहदंडनेचाहि त्यांना वीट आला.  शेवटीं मध्यम मार्ग त्यांनीं पसंत केला.  मध्यम मार्गांत सुख आहे असें त्यांनीं सांगितलें.  अतिरेक कशाचाहि नको, अति तेथें माती, मनाचे लाड पुरविण्यापेक्षां मनावर अंकुश ठेवणें हेंच हिताचें, असें त्यांनीं शिकविलें.  भोगांध होणें, सत्तांध होणें, विजयांध होणें इत्यादींचा त्यांनीं धिक्कार केला.  या तिन्ही गोष्टींनीं मनुष्य शेवटीं बुध्दिभ्रष्ट होतो असें ते म्हणत.  अतिमहत्त्वाकांक्षा आत्म्याच्या रोगटपणाची खूण होय.  दुर्बलांवर सत्ता चालवूं पहाणें,  युध्दांत विजय मिळविण्याची इच्छा करणें, या सार्‍या आत्म्याच्या विकृति होत.  विजय म्हणजे मृत्यूची जननी ; विजयी होण्याची इच्छा करणें म्हणजे आपल्याच बंधूंचा हेवादावा करणें, त्यांचा द्वेष करणें ; आणि आपल्या भावांचा द्वेष करणें ही गोष्ट मृत्यूहूनहि वाईट होय.

परंतु मानवी मनांत विजयतृष्णा आहे. ही विजयतृष्णा कशीं जिंकायची ? बुध्द म्हणाले, ''सहनशीलतेनें.'' जो जिंकायला येईल त्याला क्षमा करा. त्या विजिगीषु माणसाची कींव करा. तें एक रोगी बालक आहे असें समजा. द्वेषाची परत फेड मैत्रीनें व स्नेहानें करा.  याच मार्गानें जगांतील हीं भांडखोर व रानटी मुलें एके दिवशीं सुसंस्कृत व शांतिप्रिय अशीं माणसें होतील. दुसर्‍याला दु:ख न देतां स्वत: सारें सहन करण्याचें शौर्य त्यांनीं शिकविले.  दुसर्‍याची हिंसा न करतां स्वत: मरण्याचें धैर्य त्यांनीं शिकविलें. एक गोष्ट खरोखर त्यांनींच शिकविली. ती म्हणजे सहनशीलपणा. सारें मुकाट्यानें सहन करा. पौर्वात्यांची ही सोशिकता निस्सीम आहे. तसेंच सहिष्णुताहि त्यांनीं शिकविली. बुध्द धर्मी मनुष्य म्हणजे पृथ्वीवरचा अत्यंत सहिष्णु प्राणी होय. मुसलमानांप्रमाणें किंवा ख्रिस्ती लोकांप्रमाणें धर्मयुध्द करीत बुध्द धर्मीयांनीं कधींहि रक्त सांडलें नाहीं. बुध्दांच्या नांवानें कोणाहि परधर्मीयाचा त्यांनीं कधींहि छळ केला नाहीं.

बुध्दांनीं परमेश्वरांचें वैभव शिकविलें नाहीं तर प्रेमाचें सामर्थ्य शिकविलें.  ''सारा संसार प्रेमानें आनंदमय करणें'' हें त्यांचें ध्येंय होते.  दु:खी, दरिद्री लोकांत रहाण्यासाठीं त्यांनीं राज्यत्याग केला.  बुध्दांची शांति देणारी परममंगल वाणी कानीं पडावी म्हणून एक भिकारी त्यांच्याकडे आला.  या भिकार्‍याला मंगल आशीर्वाद देणें हें जीवनांतील त्यांचें शेवटचें कर्म होतें.  ते आतां ८० वर्षांचे झाले होते.  लोहार जातीचा त्यांचा एक शिष्य होता.  त्या गरीब शिष्याकडे ते जेवले आणि त्यांना आजार जडला.  ते कसे तरी मोकळ्या शेतांत गेले.  ते आपल्या शिष्यांना म्हणाले, ''पर्णमय शय्येवर मला ठेवा.''  पुन्हा ते म्हणाले, ''मी आजारी पडलों म्हणून त्या लोहाराला नका हो नांवे ठेवूं.''

बुध्दांचे प्राण निघून जाण्याची वेळ आली.  बुध्दांजवळ कांही उपदेशपर शब्दांची भिक्षा मागण्यासाठीं एक अस्पृश्य आला होता.  त्या अतिशुद्राला त्यांनीं आपल्याजवळ बोलावलें.  त्या मरणोन्मुख महात्म्यानें, त्या आसन्नमरण राजर्षीनें त्या भिकार्‍याचा हात आपल्या हातांत घेतला.  त्या दु:खी बंधूजवळ प्रेमाचे व करुणेचे दोन शब्द तो बोलला आणि त्याचा प्राण गेला.

जवळजवळ दोन हजार वर्षे बुध्दांच्या शिकवणीचा निम्म्या मानवजातीवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम होत आहे.  भूतदया, सहनशीलता, सहिष्णुता, प्रेम यांची त्यांनीं दिलेली थोर शिकवण परिणाम करीत आहे.  आतां उरलेली निम्मी मानवजातहि बुध्दांची ती वाणी ऐकायला उभी रहात आहे, तो संदेश ऐकायला आरंभ करीत आहे.

« PreviousChapter ListNext »