Bookstruck

मानवजातीचें बाल्य 37

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

- २ -

लाओत्से ख्रि. पू. सहाव्या शतकांत जन्मला.  कन्फ्यूशियसपेक्षां लाओत्से पन्नास वर्षांनी वडील.  अतिपूर्वेकडील भागातील लाओत्सें, बुध्द व कन्फ्यूशियस हे तीन परम थोर महात्मे.  मानवजातीचें हे सद्‍गुरू एकाच शतकांत झाले, ही महत्त्वाची गोष्ट ध्यानांत धरण्यासारखी आहे.  धन्य तें शतक !

जॉन दी बॅप्टिस्ट हा जसा ख्रिस्ताचें आगमन सुचविणारा होता, त्याप्रमाणें लाओत्से कन्फ्यूशियसचा जणूं अग्रदूत होता.  त्यानें कन्फ्यूशियससाठीं भूमिका तयार करून ठेवली.  त्यानें कन्फ्यूशियसच्या आगमनाचें जणूं शिंग फुंकिलें.  परंतु कन्फ्यूशियसची विचारसरणी जशी स्पष्ट असे, त्याची भाषा जशी साधी व सरळ असे तसें लाओत्सेचें नसे.  लोओत्सेच्या विचारांत विशदता नव्हती.  तो थोडा गूढवादी होता.  लाओत्से लोकांना उपदेशी, ''न्यायावर प्रेम करा, नेमस्त व संयमी बना, प्रमाण राखा, देहान्त शिक्षा रद्द करा, युध्दाचा धिक्कार करा, जगण्यासाठीं हें जग अधिक सुखाचें व आनंदाचें करा.''

ही ध्येयें अति सुंदर होतीं यांत शंका नाहीं.  परंतु प्राथमिक अवस्थेंतील राष्ट्राला हीं ध्येयें जरा अमूर्तच होतीं ; अर्थहीन, दूरचीं अशीं होतीं.  लाओत्से पुष्कळ वेळां रहस्यमय बोले, गूढ बोले.  त्याच्या म्हणण्याचा भावार्थ फारच थोड्यांच्या लक्षांत येई.  त्या बेबंदशाहीच्या काळांत चीनला जर कशाची खरोखर जरूर असेल तर ती व्यवहार्य व समजण्यास सोप्या अशा निश्चित आचारनियमांची होती.  दैनंदिन व्यवहारांत सर्वांनीं कसें वागावें तें सांगणारी व सर्वसंग्राहक अशी सोपी, सुटसुटीत स्मृति त्यांना हवी होती.  लाओत्सें हें करूं शकत नव्हता.  तो फार उंच पडे.  लोकांनीं लाओत्सेला देव बनविलें.  आणि भविष्यकालीन मोक्षप्राप्तीसाठीं ते त्याची प्रार्थना करूं लागले.  परलोकासाठीं लाओत्से, परंतु इहलोकीं कन्फ्यूशियसच त्यांचा खरा मार्गदर्शक होता.

- ३ -

कन्फ्यूशियस किंवा कुंग-फू-त्सी या नांवाचा, ''तत्त्वज्ञानी कुंग'' असा अर्थ आहे.  त्याच्या पित्याचें नांव शुहलिंग.  तो पित्याचें बारावें अपत्य होता.  शुहलिंग हा सैनिक होता.  कू प्रांतांत तो रहात असे.  चीनमध्यें सैनिकांना सामान्यत: मान कमी.  परंतु त्या वेळेस सैनिकांची किंमत जरा वाढली होती.  नैतिक मूल्यांचे जरा पुन्हा मूल्यमापन केलें गेलें.  त्या वेळेस सर्वत्र लष्करी धिंगाणे चालले होते.  गांवांचे, शहरांचें रक्षण करणें अगत्याचें असे.  कोण कधीं हल्ला करील याचा नेम नसे.  म्हणून सैनिकांची प्रतिष्ठा जरा वाढली होती.  शुहलिंग हा शूर शिपाईगडी होता.  त्याला खूप मानमान्यता मिळाली होती,  अनेक पदव्या मिळाल्या होत्या.  तथापि तो सुखी नव्हता.  त्याला नऊ मुली झाल्या,  परंतु मुलगा नव्हता.  त्याची एक रखेली होती.  तिच्यापासून त्याला दोन मुलगे झाले.  परंतु ते औरस नव्हते.  सनातनी चिनी मनुष्यास एक तरी औरस पुत्र असावा असें वाटे, जसें सनातनी ज्यूस अद्याप वाटतें.  मृत पित्यासाठीं जे विधी करावयाचे ते चिनी लोकांत व ज्यू लोकांत फक्त औरस पुत्रच करूं शकतो.

« PreviousChapter ListNext »