Bookstruck

मानवजातीचें बाल्य 39

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अशा रीतीनें सर्वत्र संचार करीत असतां संसाराला उपयोगी असें ज्ञान तो सर्वत्र पेरीत जाई.  ते विचार देशभर पसरले.  जे श्रीमंत असत त्यांच्याजवळून तो थोडी गुरुदक्षिणा घेई.  जे गरीब असत त्यांनीं मूठभर तांदूळ किंवा वाळलेला मांसखंड दिला तरी त्याला समाधान असे.  उदार व उदात्त जीवनाची शिकवण त्यानें सर्वत्र दिली.  तोच त्याचा अविरत उद्योग होता.  श्रेष्ठ अशा मानवांचा एक नवीन वंशच तो चीनमध्यें जणूं निर्मू पहात होता.  जणूं श्रेष्ठ पुरुषांचें प्रतिष्ठित असें राष्ट्रच निर्माण करण्याचें त्याचें ध्येय होतें.

लोकांना नीट वळण द्यायचें असेल तर आधीं न्यायी राज्यव्यवस्था हवी, ही गोष्ट कन्फ्यूशियसच्या लक्षांत आली.  तो हेतु मनांत धरून तो सर्व प्रांतांतून भटकला.  तो निरनिराळ्या राजांना भेटला व म्हणाला, ''मी तुमचा प्रधान होऊं का ? चांगला राज्यकारभार निर्माण करतों.  माझे विचार प्रत्यक्षांत आणतों.''  हा तत्त्वज्ञानी अशा राजाच्या शोधांत होता.  इतिहासांतील अत्यंत विचित्र व आश्चर्यकारक असा हा शोध होता.

कधीं कधीं वाटे, कीं त्याच्या शोधांत त्याला यश येईल, एकादा राजा त्याला प्रयोगाला वाव देईल.  त्या वेळचा 'चि' प्रांत म्हणजे अति बंडखोर प्रांत होता.  त्या प्रांताच्या राजानें आपल्या दरबारीं कन्फ्यूशियसला महत्त्वाची जागा देऊं केली.  परंतु एका मत्सरी मंत्र्यानें राजाचे कान फुंकले आणि आयत्या वेळेस राजानें नकार दिला.  कन्फ्यूशियस पुन्हा आणखी एकादें प्रयोगार्ह राज्यक्षेत्र शोधीत निघाला.

तो आपल्या स्वत:च्या लू प्रांतीं आला.  लू प्रांताच्या राजानें त्याला एका शहराचा मेयर म्हणून नेमलें.  नंतर त्यानें त्याला सर्व राज्यांतील मुख्य न्यायाधीश म्हणून नेमलें.  तो न्यायमंत्री झाला.  कन्फ्यूशियस सम्राटाला म्हणाला, ''लोकांना सदैव शांति दे व पोटभर अन्न दे.  पिता ज्याप्रमाणे मुलांबाळांची तरतूद ठेवतो, त्यांची सर्व काळजी घेतो, तसें राजानें प्रजेचें केलें पाहिजे.  एकाद्या महत्त्वाच्या खटल्यांत निकाल देण्यापूर्वी तो आधीं पुष्कळशा शहाण्या लोकांचा विचार घेई व मग न्याय देई.  पुढें भविष्यकाळांत जी ज्यूरीपध्दति जगात आली तीच जणूं कन्फ्यूशियसच्या डोळ्यासमोर होती.

गुन्हेगारांना शिक्षा देणें हें त्याचें मुख्य ध्येय नसून गुन्हे कमी कसे होतील हें तो आधीं मुख्यत: पाही.  त्या वेळेस सार्‍या चीन देशभर भुरट्या चोरांचा व उचल्यांचा बुजबुजाट झाला होता !  याला आळा कसा घालावा म्हणून प्रमुख नागरिक त्याला प्रश्न करीत.  तो म्हणे, ''चोरी बंद करायचा एकच मार्ग आहे.  आणि तो म्हणजे तुम्ही तुमचा स्वार्थ कमी करा, तुमची हांव कमी करा. तुम्हीं लोभ सोडला म्हणजे चोरांनीं न्यावें इतकें जास्त तुमच्याजवळ उरणारच नाहीं.''

« PreviousChapter ListNext »