Bookstruck

मानवजातीचें बाल्य 59

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

न्यायाधिशांनीं त्याला विचारलें, ''आम्हीं तुम्हांला कोणती शिक्षा द्यावी असें तुम्हांला वाटतें ?''  सॉक्रे़टीस म्हणाला, ''मीं तुमच्या व या शहराच्या हितासाठीं म्हणून जें कांही केलें त्यांत तुम्हीं मला पाठिंबा दिला पाहिजे.  मीं जी सेवा केली तिच्यासाठीं तुम्हीं मला उरलेल्या आयुष्यभर जनतेच्या तिजोरींतून पोसलें पाहिजे.''

परंतु न्यायाधिशांनीं निराळाच विचार केला, निराळाच निर्णय घेतला.  त्यांनीं त्याला मरणाची शिक्षा सांगितली आणि स्वत:च्या तोंडाला चिरंतन काळोखी फांसून घेतली.

सॉक्रे़टीस तीस दिवस तुरुंगांत होता.  त्याला शृंखलाबध्द करून ठेवण्यांत आलें होतें.  एकाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणें त्याला अंथरुणावर खिळवून ठेवण्यांत आलें होतें.  शेवटीं विषाचा तो पेला त्याला दिला गेला.  त्या वेळेस त्याच्या त्या कोठडीसमोर त्याचे जे निकटवर्ती परमप्रिय मित्र जमले होते, ते रडले, त्यांना शोकावेग आंवरेना, अश्रू आंवरतना.  परंतु शेवटपर्यंत सॉक्रे़टीस मात्र शांत व आनंदी होता.

- ३ -

सॉक्रे़टीस मेल्यावर अथेन्स शहर सोडून जाणें बरें असें प्लेटोस वाटलें.  तत्त्वज्ञानी लोकांनीं त्या वेळेस अथेन्समध्यें राहणें सुरक्षितपणाचें नव्हतें.  प्लेटो परिव्राजक बनला.  बारा वर्षे तो जगभर हिंडला.  तो इटलींत व सिसिलींत गेला.  तेथें पायथॅगोरसच्या संप्रदायाशीं त्याचा परिचय झाला.  पायथॅगोरसला ''माणसें पकडणारा'' असें म्हणत.  त्याच्या संप्रदायांत गूढता होती.  या पायथॅगोरसला अंकगणितांत उपनिषदें दिसत, भूमितींत दैवी सत्यें भेटत.  अशा या अध्यात्मवादी पंथाशीं परिचित झाल्यावर प्लेटो गलबतांत बसून इजिप्तमध्यें गेला.  इजिप्तमधील प्राचीन ज्ञानाचे मधुबिंदू त्यानें गोळा केले.  ज्यूडा व हिंदुस्थान या देशांतहि तो गेला होता असें म्हणतात ; परंतु याबाबत शंका आहे; कारण ज्यू वा हिंदु लोकांच्या प्रेषितांची, त्यांच्या आध्यात्मिक विचारांची किंवा न्यायासाठीं, सत्यासाठीं जी एक प्रखर व उत्कट अशी शोधक वृत्ति त्यांच्यामध्यें होती तिची प्लेटोला माहिती होती असें दिसत नाहीं.  प्लेटोला वाटत होतें कीं, ''न्यायासाठीं तहानलेले आपण या पृथ्वीवरचे पहिले.''  ज्या विषयावर आपण लिहीत आहों त्यावर तसें आजपर्यंत कोणींहि लिहिलेंलें नाहीं असें त्याला वाटे.  जे विचार आपण देत आहों ते या जगांत प्रथम आपणच देत आहों असा त्याचा विश्वास होता, अशी त्याची प्रामाणिक समजूत होती.  तो लिहितो, ''आजपर्यंत न्यायाची स्तुति कोणीं केली नाहीं.  अन्यायाचा धिक्कार कोणीं केला नाहीं.  आपल्या हृदयांत असणार्‍या असत्प्रवृत्तींतील सर्वांत दुष्ट प्रवृत्ति म्हणजे अन्यायाची आहे.  परंतु ही गोष्ट आजपर्यंत कोणाच्याच लक्षांत आली नाहीं.  ही अन्याय-प्रवृत्ति आपल्या हृदयांत कां दृढमूल होऊन बसली आहे, याचें संशोधन आजपर्यंत कोणींहि केलें नाहीं.  तसेंच मनुष्यांतील सर्वांत थोर सत्-प्रवृत्ति म्हणजे न्यायाची होय.  तिचाहि विचार कोणीं केला नाहीं.'' प्लेटोसारख्या थोर विचारवंताचा हिंदु वा ज्यू तत्त्वज्ञान्यांशी परिचय असता तर त्यानें असें लिहिलें नसतें.

प्रवासानंतर तो परत आला त्या वेळेस त्याचें वय चाळीस वर्षांचे होतें.  अथीनियन लोकांच्या भावना शांत झालेल्या होत्या, वातावरण पुन्हां स्वतंत्र विचाराला अनुकूल होतें.  भूतकाळांत प्राण अत्यंत स्वस्त झाले होते तसें आतां नव्हतें.  जीवनाची किंमत लोक पुन्हां समजूं लागले होते.  तत्त्वज्ञान शिकविण्यांत आतां धोका नव्हता.  परंतु फार क्रांतिकारक विचार सांगण्याचें काम अद्यापहि जरा जपूनच करायला हवें होतें.  नाजूक प्रवृत्तीच्या नागरिकांचें मन दुखावेल असें कांहीं केलें नाहीं म्हणजे झालें ; अगदींच पाखंडी मतें नसलीं म्हणजे झालें ; सनातनी मतांविरुध्द उघड बंड नसलें म्हणजे झालें.  तेवढी काळजी घेऊन विचारस्वातंत्र्य राखायला हरकत नव्हती.

« PreviousChapter ListNext »