Bookstruck

तरवारीचें व फांसाचें थैमान 13

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मरणाची भीति झुगारून द्या व या जीवनांत जे जे मंगल आनंद मिळतील त्यांकडेच लक्ष द्या.  एपिक्युरस व 'सर्वंसह'वादी स्टोइक लोक यांचे येथपर्यंत एकमत आहे.  दैव बलवत्तर असल्यामुळें जें जें होईल तें तें सहन करणें हे ध्येय सामान्य ; पण यापुढें मात्र दोघांत तीव्र मतभेत आहेत.  स्टोइक म्हणत कीं, ज्या सुखांमुळें आपली प्रवृत्ति सद्‍गुणांकडे होत नाहीं, जी सुखें सत्कर्मांस प्रेरक होत नाहींत, तीं त्याज्य होत.  सुखांनीं आपली समुन्नति व्हावी.  याच्याउलट एपिक्युरस म्हणे, ''जीं सत्कर्मे सुखावह होत नाहींत ती कुचकामी होत.'' प्रथम प्रथम केवळ सुखवादी लोकांप्रमाणें तोहि क्षुद्र शारीरिक सुखें वानी, वाखाणी व आपल्या विद्यार्थ्यांना सदैव शिकवी कीं, ''जें जें सुख मिळेल तें तें भोगा, जी जी सोन्याची संधि सांपडेल ती ती पकड.'' पण केवळ शारिरिक सुखांनीं कायमचें समाधान थोडेंच लाभणार ? क्षणभर जिभेचें सुख मिळवाल, शारीरिक सुख मिळवाल, पण कदाचित् एकादे वेळीं जीवनांत कायमचे रोगी अगर दु:खीकष्टी होऊन जाल.  क्षणिक सुखाचें पर्यवसान कायमच्या दु:खांत होणें शक्य असतें.  क्षणिक आनंदाच्या जीवनांत असणार्‍या प्रक्षुब्धतेपेक्षां, वाटणार्‍या जोमापेक्षां, सतत टिकणार्‍या सुखाची शांत स्थिति अधिक चांगली,  म्हणून स्थूल व क्षुद्र शारीरिक आनंदापेक्षां वेगळा असा एक नवीन शांत मनाचा आनंद तो शिकवूं लागला : या जीवनांतील गोंधळ व सुख-दु:खें यांकडे अनासक्त व अत्रस्त दृष्टीनें पाहणें, पाण्यांतील कमळाप्रमाणें अलिप्त राहणें.  एपिक्युरस म्हणे, ''हें जीवन म्हणजे एक कटु देणगी आहे.  ती इतकी कटु आहे कीं, जीवनांत आपण रडत ओरडत येतों व रडत ओरडतच जीवन सोडतों.  आद्यन्ती दु:खप्रद असें हें जीवन आहे.  पण आपल्या या दु:खांतूनहि सुख निर्मितां येईल.  म्हणून आपण दु:खाला सुखाची जननी करूं या.  गत दु:खांच्या आठवणी आपणांला मागाहून सुखप्रद वाटत नाहींत का ?

''म्हणून थोडा विनोद शिका ; विनोदी, मोकळी वृत्ति ठेवण्याचा यत्न करा.  जरा प्रमाणबध्दता शिकलां म्हणजे हें साधेल.  दु:ख आलें तर त्या दु:खाचेंच अति करित नका बसूं. 'यायचेंच कीं जरा दु:ख ! बदल नको का कांही !' असें गंमतीनें म्हणा.  आपणांसभोंवतालचें हें अनंत विश्व बघा,  म्हणजे आपल्या चिंता व आपलीं दु:खें हीं इतकीं क्षुद्र वाटतील कीं, तुम्हांला हंसूंच येईल.  स्वत:ला जीवनाच्या विराट् नाटकांतील एक पात्र समजून सुखदु:ख भोगावयाला, येवढेच नव्हे तर एकाद्या प्रेक्षकाप्रमाणें आपल्या दु:खांकडे बघून जर हंसावयाला शिका.

''वासना, इच्छा कमी करा.  त्यांना मर्यादा घाला,  गरजा कमी करा.  जें मिळालें आहे त्यांत समाधान माना.  महत्त्वाकांक्षा पूर्ण करणें शक्य नसेल तर जेवढें मिळणें शक्य असेल तेवढ्याचीच महत्त्वाकांक्षा धरा.  फार उच्च महत्त्वाकांक्षा बाळगून त्या फलद्रूप होणार नसतील तर त्या जरा कमी उंच करा.''  एपिक्युरस स्वत: अत्यंत साधा मनुष्य होता.  तो आपल्या कोणाहि अनुयायापेक्षां कमी एपिक्युरियन होता.  त्याला लालसा नव्हती, सुखाची ओढ नव्हती.  साधी ज्वारी-बाजरीची भाकरी त्याला पुरे होत असे ; पण ती कोणा मित्राबरोबर खावी असें त्याला वाटे.  खातांना एकादा मित्र बरोबर असला म्हणजे झाले ; मग त्याला आणखीं कांही लागत नसे. ''आपण काय खाणार यापेक्षां कोणाबरोबर खाणार हीच गोष्ट अधिक महत्त्वाची आहे'' असें तो म्हणे.

« PreviousChapter ListNext »