Bookstruck

तरवारीचें व फांसाचें थैमान 15

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

प्रकरण ३ रें
द्वेष-मूर्ति हॅनिबॉल : कार्थेजियन राजपुत्र
- १ -

ग्रीक व इतर आर्य युरोपच्या मध्यभागीं कर्मक्षेत्रांत उतरले असतां तिकडे फोनिशियन लोक फार अशांत व अस्वस्थ झाले होते.  टायर शहरांतील फोनिशियन स्त्री-पुरुष तेथील परिस्थितीला कंटाळले होते.  जरा सुरेख नवें घर मिळावें म्हणून त्यांची धडपड सुरू झाली ; नवें घर शोधावयाला ते बाहेर पडले.  गलबतांत बसून ते भूमध्यसमुद्रांतून पश्चिमेकडे निघाले.  आफ्रिकेंतल्या अगदीं उत्तरेच्या एका लहान प्रदेशावर ते उतरले.  तो टापू सुपीक होता.  फोनिशियन तेथें वसाहत करूं लागले.  त्यांनीं तेथल्या मूळच्या रहिवाशांची कत्तल केली.  हे मानवी बळी देऊन त्यांनीं आपल्या देवाची प्रार्थना केली व त्याचे आभर मानले.  समुद्राभिमुख अशी नवी वसाहत उभी राहिली व हळूहळू वाढूं लागली.  लवकरच तेथें भव्य व भरभराटलेलें कार्थेज नगर उभें राहिलें.

कार्थेजियनांनीं फोनिशियनांपासून दोन गोष्टी घेतल्या : व्यापारांतील कौशल्य व नरमेघांवरील विश्वास.  आफ्रिकेच्या उत्तर किनार्‍यावर तशींच फ्रान्सच्या दक्षिण भागांत व स्पेनमधेंहि त्यांनीं किती तरी व्यापारी ठाणी बसविलीं.  भूमध्यसमुद्राच्या अर्ध्या भागावर त्यांचे प्रभुत्व होतें व उरलेल्या अर्ध्या भागावरहि प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठीं ते आपले अधाशी गिधाडी डोळे फिरवूं लागले.  यज्ञप्रिय मोलोक्को देवाची सदिच्छा प्राप्त व्हावी, त्याची कृपादृष्टि असावी व त्यामुळें व्यापारांत व लष्करी साहसांत आपणांस यश यावें म्हणून ते पुन: पुन: नरमेघ करून त्याला मानवी मांसाची मेजवानी देत, लांच देत.  कांही असो, कांही होवो, मोलोक्कोला त्याचा पोटभर वांटा नेहमीं मिळे.  कार्थेजिनय लढाईंत विजय मिळवून परतले तर युध्दकैद्यांतल्या अत्यंत सुंदर कैद्यांचा नैवेद्य ते भीषण मोलोक्का देवाला अर्पण करीत व पराभूत होऊन परत आले तर आपल्यांतल्याच मोठमोठ्या घराण्यांतील मुलेंबाळें होळींत फेंकीत. जय, पराजय कांहींहि झालें तरी मोलोक्को देवाची चैनच होती.

राज्यासाठीं आपल्या मुलांबाळांचे बळी देण्याची पध्दत आजतागायत सर्वत्र सुरूच आहे.  कार्थेजियन जरी आपल्या मुलांबाळांना बळी देत तरी एकंदरींत ते सुसंकृतच होते.  त्यांची संस्कृति उच्च दर्जाची होती व म्हणून ज्या ज्या देशांशीं ते व्यापार करीत त्या सर्व देशांकडे ते तुच्छतेनें बघत.  विशेषत: रोमन लोकांच्या रानवट चालीरीती पाहून तर त्यांना गंमतच वाटे.  हे आडदांड व रांगडे रोमन इटलीच्या पश्चिम किनार्‍यावर भूमध्यसमुद्राच्या पलीकडे राहत.  कार्थेजमध्येंहि येऊन कांहीं रोमनांनीं दुकानें वगैरे घातलीं.  ते रस्त्यामध्येंच दुकानें मांडून बसत.  त्यांची वागण्याची पध्दत खेडवळ होती व त्यांचीं शरीरें बुटकीं होतीं.  पण त्यांचा रुबाब मात्र मोठा होता.  त्यांची ती शिष्टपणानें वागण्याची पध्दत व सुसंस्कृत भाषा पाहिल्यावर दोहोंतील विरोध चांगलाच डोळ्यांत भरे.  कार्थेजमध्यें रोमची पुढीलप्रमाणें टिंगल करण्यांत येत असे : संबंध रोमन शहरांत चांदीचें ताट एकच आहे व कोणा सीनेटरला कोणास मेजवानी द्यावयाची असली म्हणजे त्याला तें ताट उसनें आणावें लागतें !

« PreviousChapter ListNext »