Bookstruck

तरवारीचें व फांसाचें थैमान 21

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

प्रकरण ४ थें
जगांतील कपटपटूंचा शिरोमणि कॅटो
- १ -

मार्कस पोर्सियस कॅटो हा रोममध्यें सार्वजनिक नीतीनें नियंत्रण करणारा मंत्री होता.  कार्थजचें वैभव त्याच्या हृदयांत शल्याप्रमाणें सलत असे.  तें त्याला पाहवत नसे.  जेव्हां जेव्हां कॅटो सीनेटमध्यें भाषण करी तेव्हां तेव्हां विषय कोणताहि असो त्याचा समारोप करतांना तो पुढील शब्द उच्चारल्यावांचून राहत नसे—''सभ्य गृहस्थ हो, म्हणून माझें निक्षून सांगणें आहे कीं, कार्थेजचा विध्वंस केलाच पाहिजे.''

विनवुड रीड यानें कॅटोचें पुढीलप्रमाणे उत्कृष्ट वर्णन केलें आहे : ''कॅटो हा एक अवाढव्य माणूस होता, त्याचे डोळे मांजरासारखे हिरवे-करडे होते,  केस कोल्ह्याच्या केसासारखे होते, दांत इतके मोठे होते कीं, ते जणूं हत्तीचे सुळेच वाटत. त्याचा चेहरा अति कुरूप व भीषण होता.  त्याचें तोंड पाहावें असें कोणासहि वाटत नसे.  त्याच्यावर जनतेनें शेंकडों काव्यचरण रचले होते.  त्यांत त्याची भीषण कुरूपता वर्णिलेली असे.  एका काव्यचरणांत म्हटलें होतें कीं, यमाची नरकपुरीहि कॅटोला आंत घ्यावयाला धजत नसल्यामुळें त्याला तेथील वैतरणीच्या तीरावरच भटकत फिरत राहावें लागलें.''

दुसर्‍याच्या सुखांत बिब्बा घालण्यांत त्याला परम सुख वाटे.  कांही रोमन लोक कंटाळले होते.  जरा विसांवा मिळावा, ग्रीक जीवनांतील सौंदर्योपासनेचा थोडा आस्वाद घ्यावा, असें त्यांना वाटत होतें.  पण कॅटो त्याला तयार नव्हता.  ग्रीक तत्त्वज्ञान, सौंदर्योपासना व कलापूजा यांचा तो पक्का द्वेष्टा होता.  त्यानें ग्रीक तत्त्वज्ञान्यांना हद्दपार केलें, ग्रीक बुकें आक्षिप्त ठरविलीं व प्रतिष्ठित रोमनांनीं पोरकट ग्रीक पध्दतीचा अवलंब करूं नये असें जाहीर केलें.  करमणुकीचीं ग्रीक साधनें क्षुद्र व अश्लील आहेत असें त्यानें प्रतिपादिलें.  प्रत्येकाचें—प्रत्येक रोमनाचें—जीवन म्हणजे जणूं मरणयात्रा, त्यात ना आनंद ना करमणूक, ना उत्साह, ना कला, असें त्यानें करून टाकलें.  जन्मल्यापासून मरेपर्यंत कंटाळवाणी व दीर्घ अशी स्मशानयात्रा म्हणजे जीवन असें त्यानें केलें.

सर्व रोमनांना स्पार्टन शिस्त शिकवावी असें त्याचें मत होतें.  स्पार्टन क्रूरता व निष्ठुरता रोमनांच्या अंगांत याव्या, रोमन राष्ट्र स्पार्टन राष्ट्राप्रमाणें व्हावें, सर्व रोम म्हणजे जणूं एक लष्करी छावणी असें व्हावें असें त्याला वाटत होतें.  स्पार्टन लोकांचे गुण-अवगुण दोन्ही त्याच्या स्वत:च्या ठायीं पराकाष्ठेनें होते.  तो पुरा पुरा शिपाईवृत्तीचा होता.  त्याच्या नसांनसांत शिपाईगिरी भरलेली होती.  त्याला युध्दविषयीं मनोरम भ्रम नव्हते.  युध्द म्हणजे गंमत नसून मरण-मारण आहे हें तो जाणून होता.  युध्दांत धीरोदात्तता वगैरे गुण प्रकट करावे, असलें काव्य त्याच्याजवळ नव्हतें.  शत्रूचे लोक व त्यांचीं बायकामुलें यांस जितक्या लवकर व जितक्या अधिक संख्येनें मारतां येईल तितकें चांगलें असें त्याचें मत होतें.  कार्थेजियनांविरुध्द स्पेनमध्यें जी रोमन लढाई झाली तीत आपण रोज एक शहर धुळीस मिळवीत होतों अशीं फुशारकी तो मारीत असे.

तो इतक्या साधेपणानें वागे कीं, तो कंजूष आहे असें लोकांस वाटे.  आपल्या शेतांतील एका लहान झोंपडींत तो राही व वकिली करण्यासाठीं रोज घोड्यावर बसून तो जवळच्या शहरांत जाई व तिसरे प्रहरीं घरीं परत येई.  नंतर तो कमरेपर्यंत उघडा होऊन घामाघूम होईपर्यंत शेतांतील मजुरांबरोबर काम करी व त्याच्यासारखेंच साधें अन्न—कांदाभाकर—खाई व त्याचेंच साधें पेय—द्राक्षासव—पिई.  रात्रीं तो आपलें अन्न स्वत:च शिजवी.  तो ओटच्या पिठाची लापशी करी व त्याची बायको भाकरी भाजून देई.

« PreviousChapter ListNext »