Bookstruck

तरवारीचें व फांसाचें थैमान 25

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पुन: एकदा खालीं मान घालून कार्थेजियनांनीं हीहि अट कबूल केली. शस्त्रागारें व दारूची कोठारें रिकामी करण्यांत आली.  खासगी घरांच्याहि झडत्या झाल्या.  बचावाचें प्रत्येक साधन हिरावून घेण्यांत आले.  दगड वगैरे फेंकण्याचीं तीन हजार यंत्रें व दोन लाख चिलखतें रोमन लोकांच्या स्वाधीन करण्यांत आली.  रोमनें जी जी मागणी केली ती ती कार्थेजनें मान्य केली.  कार्थेज अगतिक व दुबळें होऊन पडलें होतें.  पुन: एकदां कार्थेजचे वकील रोमन वकीलांकडे जाऊन विचारते झाले, ''रोमनांना अजून कांही पाहिजे आहे का ?''

कॉन्सल्सनीं उत्तर दिलें, ''आतां आणखी फक्त एकच गोष्ट पाहिजे : कार्थेजचा संपूर्ण नाश !'' हे शब्द ऐकून कार्थेजच्या वकिलांना अपार दु:ख झालें, सहस्त्र वेदना झाल्या.  पण त्यांनीं सारें दु:ख गिळून शांतपणें सांगितलें, ''ठीक, आम्हांला शहर सोडून जाण्यास थोडा वेळ द्या.  आम्हांला आमच्या घरांदारांतून हांकलून देण्यापूर्वी सामानसुमान बांधावयाला तरी थोडा अवसर द्या कीं !'' रोमन कॉन्सल्सनीं औदार्याचा मोठा आव आणून ही विनंती मान्य केली व त्यांना थोडा अवधि दिला.

कांही दिवसांनी कार्थेजच्या दरवाजासमोर रोमन फौजा येऊन दाखल झाल्या.  शहरांत शिरून विध्वंसनाचें काम सुरू करावयाला रोमन सैनिक फार अधीर झाले होते.  पण त्यांना तेथें जें दिसलें त्यामुळें ते दिङ्मूढ झाले ! शहराचे दरवाजे बंद होते व बुरुजाबुरुजाचे ठिकाणीं सशस्त्र थवे उभे होते.  कार्थेजियनांनीं आपल्या सर्व गुलामांना मुक्त केले होते.  शहराच्या रक्षणार्थ सारे स्त्री-पुरुष, सारीं मुलेंबाळे, लहानथोर सर्व जण हत्यारें घडवीत होते.  शस्त्रें बनविण्याचें काम रात्रंदिवस अखंड चालू होतें.  लोखंड वगैरे धातू मिळाव्या म्हणून मोठमोठ्या इमारती पाडून टाकण्यांत आल्या.  संरक्षक यंत्रें बनविण्यासाठी त्यांचें लाकूड घेण्यांत आलें.  त्या यंत्रांना बांधण्यासाठीं दोर्‍या हव्या होत्या म्हणून स्त्रियांनीं आपले लांब केस कापून त्यांच्या दोर्‍या वळून दिल्या ! आपल्या शहराचे प्राण ते विकणार होते ; पण शत्रूकडून जास्तींत जास्त किंमत वसूल केल्याशिवाय मात्र शहर ताब्यांत द्यावयाचें नाहीं असा निश्चय त्यांनी केला होता.

शहराचे तट भंगून रोमनांकडे कबजा जावयास तीन वर्षे लागलीं.  शहर घेतल्यावर त्यांतील सर्व नागरिकांना ठार करण्याला त्यांना सतरा दिवस लागले.  कित्येक लाखांची वस्ती ! पण अखेर त्यांतले केवळ मूठभरच शिल्लक राहिले ! शेवटीं त्यांनाहि गुलाम करून विकण्यांत आलें.  सार्‍या शहरांत एकहि उभी भिंत राहिली नव्हती.  शिपायांचे हें विध्वंसनाचें काम संपलें तेव्हां मारलेल्या पांच लाख कार्थेजियनांच्या शरिरांवर सर्वत्र सहा फूट उंचीचा राखेचा ढीग शहरभर पडला होता ! रोमच्या लष्करी भव्यतेचें हें केवढें थोर स्मारक !

- ३ -

मिळालेल्या विजयाचा समारंभ करण्यासाठीं रोमन फौजा परत आल्या.  पण त्यांचे स्वागत करण्याला समारंभाला तो स्वामी कॅटो तेथें नव्हता.  कार्थेजियनांची सबंध जातच्या जात नष्ट करून टाकण्याच्या अत्यंत दुष्ट कुकर्माचा तो मुख्य योजक होता.  त्या लाखों अगतिक लोकांच्या करुण किंकाळ्या त्याच्या वृध्द कानांना मधुर संगीताप्रमाणें वाटल्या असत्या.  पण त्याच्या अनंत खटपटींचें तें फळ देवांनीं त्याला पाहूं वा चालूं दिलें नाहीं.  ख्रि. पू. १४९ सालीं तो मरण पावला.  कार्थेजचा संपूर्ण नि:पात होण्यापूर्वीच तीन वर्षे तो मेला.

« PreviousChapter ListNext »